Monday 31 August 2015

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला

दि. २२ ऑगस्ट २०१५


पहिल्या दिवसाची सुरवात ही विनायक कदम यांच्या ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या सुंदर गीत गायनाने झाली. या गीतानी उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली.

१.    विविध खेळ व परिचय सत्र - सायली तामणे आणि सनत गानू
गीत गायनानंतर निमंत्रकांसोबत सायली व सनत या निर्माण युवांनी वेगवेगळे खेळ घेतले. यात सुरवातीला सायलीच्या ‘लंबी दाढीवाला बाबा’ या गाण्याने सर्वांना उल्हासित केले. यानंतर एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठीचे काही खेळ तिने घेतले. जसे की, विविध गटांमध्ये फिरून एकमेकांना धम्माल हाय-हेल्लो करणे, ‘अरे यहाँ कैसे?’ असे विचारणे, स्वतःचा एक गुण लिहून तो आपल्या गटातील जोडीदाराला समजून सांगणे, ई. यानंतर सनतने मोकळ्या अंगणात काही खेळ व गाणे घेतले. 

पहिला खेळ होता पत्त्यांचा. या खेळात त्याने सर्वांना वेगवेगळे पत्ते वाटून एकमेकांशी न बोलता एका क्रमाने उभे राहावयास सांगितले व नंतर हाच खेळ तीन वेगवेगळ्या प्रकारे घेतला, यानंतर हा खेळ खेळताना काय झालं यावर निमंत्रकांची मतं घेण्यात आली. या खेळातून मुलांसोबत काम करताना पूर्वापार चालत आलेली विचारांची तसेच वृत्तीची साचेबद्ध चौकट मोडून मुलांच्या सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करायला हवी हे समजले. यानंतर सनतने टीमवर्क या पार्श्वभूमीवर एक मजेदार असा विटांचा खेळ घेतला. ज्यात निमंत्रकांचे गट करून त्यांना एका जादुई विटेच्या सहाय्याने काल्पनिक दलदल पार करावयाची होती. या खेळातून सर्वांना सहकार्याची भावना व सांघिक कार्य याचे महत्व समजले. यासोबतच सनतच्या ‘हरियाली इधर उधर’ या गाण्यावर नाचून सर्वांनी खूप धम्माल केली.
       शेवटी त्याने ‘सहकार व असहकार’ यास अनुसरून ‘जितो जीतना जीत सको’ हा खेळ घेतला. यातून सर्वांना सहकार - असहकार व त्यातून होणारे फायदे व नुकसान हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेता आले. सायली व सनतने घेतलेल्या या सत्रांनी कार्यशाळेच्या सुरवातीलाच प्रचंड उर्जा निर्माण केली, सर्व निमंत्रक खेळीमेळीच्या वातावरणात बोलू वागू लागले. याचा पुढील सत्रासाठी खूप फायदा झाला. 

२.    उत्क्रांती, सहकार्याची भावना आणि कुमार निर्माण - धनंजय मुळी
सनतच्या व सायलीने घेतलेल्या ‘जितो जीतना जीत सके!’ या खेळाचा धागा पकडून निर्माण युवा धनंजयने पुढील सत्र घेतले. यात त्याने लघुपटांच्या सहाय्याने मुंग्या व चिंपांझी यांच्यात उपजतच असलेली सहकार्याची भावना ही त्यांनी केलेल्या कामांतून कशाप्रकारे दिसून येते हे दाखवले. याच लघुपटांच्या माध्यमातून प्राण्यांत व माणसात उपजतच सहकार्याची, सामंजस्याची व परोपकाराची भावना असते याची त्याने सर्वांना जाणीव करून दिली. या सत्राच्या शेवटी या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध प्रश्नांवर बराच उहापोह करण्यात आला.

३.    शिक्षण म्हणजे काय? – सायली तामणे
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे का? ह्या मूळ प्रश्नापासून सायलीच्या सत्राची सुरुवात झाली. योग्य शिक्षण कुठले? अनुभव माणसाला शहाणे करतो की शिक्षण? असे प्रश्न घेऊन सायलीने चर्चेच्या स्वरुपात सद्य परिस्थितीतील शिक्षण हे जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान देण्यास कसे कमी पडत आहे ह्याची जाणीव करून दिली. सद्य परिस्थितीतील शिक्षण हे फक्त मानवाच्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पूरक ज्ञान देणे एवढेच काम करत आहे पण हे करताना एक जबाबदार व संवेदनशील नागरिक बनवण्याकडे मात्र दुर्लक्ष करते आहे ह्याची जाणीव निमंत्रकांना झाली.

४.    वैश्विक मानवी मूल्ये - अमोल फाळके
माणूस हा सामाजिक प्राणी आहे व समूहात राहण्याकडे आपला त्याचा कल असतो. पण समूहात राहताना काही मूल्य त्यांनी जपली तर त्याचे तसेच तो राहत असलेल्या समूहाचे जगणे सुसह्य होते, सोपे होते. बंधुभाव, सहकार्य, प्रेम, मैत्री, समता, न्याय, पर्यावरणपूरकता, श्रमप्रतिष्ठा, अहिंसा,  वैज्ञानिक दृष्टीकोन हीच ती मूल्ये ज्यांना वैश्विक मानवी मूल्ये मानले जाते. समाज, देश, धर्म, भौगोलिक रचना ह्याच्या पलीकडे ही मूल्ये आहेत, जे लोक ह्या मुल्यांचा स्वीकार करतात त्यांचे आयुष्य सुकर होते, अन्यथा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैश्विक मूल्यांचे महत्व त्यांनी विविध ध्वनी-चित्रफितीतून विषद केले.

५.    सामजिक बुद्धिमत्तेची ओळख आणि कुमार निर्माण - नरेंद्र खोत
समाजात आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी काही किमान कौशल्ये आणि बुद्धीमत्तांची गरज असते ज्यात संवेदनशीलता, संयम, नेतृत्व, कृतिशीलता यासारख्या घटकांचा अंतर्भाव असतो. ही सर्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तसेच विकसित करण्यासाठी आवश्यक असते ती सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता. हे दोनही घटक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेचा योग्य विकास होणे गरजेचे असते. मात्र मुल्यांचा आणि संस्कारांचा अभाव असला तर बुद्धिमत्ता जशा तारक असतात तशाच त्या मारक देखील ठरू शकतात. त्यामुळे या बुद्धिमत्ता विकसिक करतानाच त्यांचा योग्य वापर करण्याची शिकवण मुलांना देणे गरजेचे असते यावर नरेंद्र खोत यांनी त्यांच्या सत्रात भर दिला.
सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येकाला एका कागदावर आवडत्या व नावडत्या व्यक्तींचे नाव व त्या मागील करणे लिहायला सांगितली. त्यानंतर प्रत्येकाला आवडणारी / नावडणारी व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे स्वभावदोष आणि गुणविशेष सारखेच असतात याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

६.    सिनेमा - The gods must be crazy II  - केदार आडकर
रात्रीच्या जेवणानंतरच्या सगळ्यांसाठी एका चित्रपटाचे आयोजन केलेले होते. जंगलात अडलेले 2 वैज्ञानिक, एकमेकांवर पाळत ठेवणारे नंतर अचानकपणे समोर आल्यानंतर एकमेकांचा जीव घेण्याच्या प्रयत्न करणारे आणि नंतर स्वतःचाच जीव वाचवण्याची धडपण करणारे 2 सैनिक, जंगलातील वन्य प्राण्यांची चोरी करणारे तस्कर, हरवलेल्या मुलांच्या शोधात निघालेला आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासी, त्यांच्या प्रथा, संकटात सापडलेलं असतानाही मदतीची, सहकार्याची भावना ह्या सगळ्यामुळे The God must be crazy इंग्रजी सिनेमा भाषेची बंधने मोडून सर्वांच्याच हृदयाला जाऊन भिडला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एखादा चित्रपट कसा पहावा, त्यातील बारीक सारीक गोष्टींचा कुमार निर्माण मधील मुलांच्या कृती व विचारांना चालना देण्यासाठी कसा उपयोग करता येतो याचे प्रात्यक्षिक पार पडले. 

No comments:

Post a Comment