Monday, 31 August 2015

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा

दि. २३ ऑगस्ट २०१५

१.    रिफ्लेक्शन शेअरिंग
पहिल्या दिवशीच्या विविध सत्रांमधून व एकमेकांपासून निमंत्रकाना नवीन काय शिकायला मिळाले, काय भावले ई. गोष्टींबाबत निमंत्रकांनी व्यक्तिगत भावना व्यक्त केल्या. आपापल्या गटासोबत काम करताना वेळोवेळी मुलांचे असे शेअरिंग घेणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

२.    कुमार निर्माण – प्रफुल्ल शशिकांत
कुमार निर्माण शिबिरातील सर्व सत्रातून कुमार निर्माण सुरु करण्यामागील विचारांची पार्श्वभूमी टप्प्याटप्प्याने निमंत्रकांना उलगडून सांगण्यात येत होती पण हे करताना कुमार निर्माण म्हणजे नेमकं काय याचे कुतुहूल अजूनही सगळ्यांना होतच.
ह्याचा उलगडा प्रफुल्लच्या सत्रात झाला. कुमार निर्माणची सुरुवात, त्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, शैक्षणिक प्रक्रिया, गेल्या २ वर्षातील वाटचालीचा आढावा, विविध गटांनी केलेली कामे ह्या बद्दल प्रफुल्लने त्याच्या सत्रात सविस्तर माहिती दिली. या सत्रांनंतर कुमार निर्माण म्हणजे नेमक काय, विद्यार्थ्यांनी काय करणे अपेक्षित आहे, तसेच निमंत्रकाची भूमिका या बद्दल सर्वांना स्पष्टता आली. या सत्रातच केदार आडकर, रज्जाक पठाण, निलेश राठोड या निमंत्रकांनी त्यांच्या गटाने केलेल्या उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती दिली.

३.    एक आदर्श निमंत्रक – सुदाम भोंडवे
लौकिकार्थाने जास्त शिक्षण नसलेले पण ऊस तोड कामगारांच्या मुलांनी शिकले पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून बीडजवळ डोमरी येथे एक अनोखी शाळा (गुरुकुल) चालवणारे सुदाम भोंडवे (काका) ह्यांची मुलाखत निर्माण युवा व निमंत्रक वृंदन बावनकरने घेतली. मुल हे अनुभवातून शिकते. शाळेतील चार भिंतींच्या आत छडीच्या धाकाने दिलेल्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सानिद्ध्यात राहून, अनुभवातून घेतलेले शिक्षण हे कधीही जास्त चांगले असतें असे त्यांनी सांगितले. ह्याचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या शाळेतील एक घटना सांगितली - वृक्षारोपणासाठी शाळेतील विद्यार्थी माती जमा करण्यासाठी खड्डा खणत असताना त्यांना अचानकपणे मानवी सापळा आढळला, सुरुवातीला मुले घाबरली पण नंतर एकेकाने धीर धरून जवळ जाऊन सापळा बघायला सुरुवात केली. त्यावेळी मुलांनी निरीक्षणातून, स्वतः हाताळून पाहिलेल्या त्या सांगाड्यातून मुलं जे मानवी शरीराबद्दल शिकली ते ती कधीही विसरणार नाहीत. अनुभवातून आलेलं शिक्षण हेच खरे शिक्षण असते व तेच मुलांच्या जास्त चांगले लक्षात राहते असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी गुरुकुल व तेथे चालत असलेले इतर उपक्रम यांचीही माहिती दिली.

४.    कौतुक सोहळा
कुमार निर्माणच्या केंद्रीय शिबिराच्या समारोप प्रसंगी मा. डॉ. अभय बंग तसेच MKCLचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निर्माण कार्यकारी समितीचे प्रमुख श्री. सुनील चव्हाण व महाराष्ट्र नॉलेज फाऊनडेशनचे श्री. उदय पंचपोर व श्री. नरेंद्र खोत हे देखील उपस्थित होते.

ह्यावेळी सुरुवातीला मागील वर्षी कुमार निर्माणमध्ये सहभागी काही गटांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र तसेच पुस्तकांचा संच देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले. 

डॉ. अभय बंग यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला फक्त पहिला येण्याच्या उद्देशाने मुलांना दावणीला बांधले जाते. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांच्या पुढे जायचे याच्या अट्टाहासात मग शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी न राहता, नकोशी-कंटाळवाणी होत जाते. मात्र आज हीच प्रक्रिया आनंददायी करण्याची गरज आहे, शिक्षणाला चार भिंतीत न अडकवता, निसर्गाच्या सानिद्ध्यात घेऊन जाण्याची गरज आहे. अनुभवातून आलेले शिक्षण आणि शहाणपण हे एका खोलीत बसून नुसती पुस्तके वाचून मिळत नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी एका विद्यार्थ्याने  त्यांना कुमार निर्माणची प्रक्रिया सुरु करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली असे विचारले असता, कुमार निर्माणच्या मागची प्रेरणा ही तुम्ही, लहान मुले आहात, असे सुंदर उत्तर त्यांनी दिले


या कौतुक सोहळ्यानंतर लहान मुलांसाठी सामोसे, वेफर्स, आईस्क्रीमची व्यवस्था केलेली होती ज्यावर मुलांसमवेत निमंत्रकांनी देखील ताव मारला.
ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यामागे निर्माणच्या अनेक युवा मित्रांचा सहभाग होता.  ज्यात केदार अडकर, सम्मित वर्तक, निरंजन तोरडमल, शैलेष जाधव, संतोष गवळे (सुत्रसंचलन), अमोघ पांडे (फोटोग्राफी) हे मित्र होते.
यांच्यासोबतच वयाने मोठे असणारे परंतु मनाने तरुण असणारे आपले सर्वांचे आवडते मित्र व आयकॉन श्री. नंदा खरे (नंदा काका) श्री. सुनील चव्हाण (सुनील काका) व श्री. उदय पंचपोर हेही कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

अशाप्रकारे अतिशय उत्साहपूर्ण, आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात ‘कुमार निर्माण’ ची कार्यशाळा पार पडली.


No comments:

Post a Comment