Wednesday, 30 September 2015

‘चोरी’

गोपूला वडील नव्हते. शाळेत पोचवायला आणि न्यायला त्याची आईच येई.  आजही ती आली, पण सरळ घरी न जाता ती गोपूला शेताकडे घेऊन गेली. भाताची कापण झाली होती आणि जमिनीवर सांडलेले भात गोळा करून आणायचे होते. छोटा गोपू आईला मदत करू लागला...

कितीतरी भातगोटे तेथे सांडलेले होते. पिवळेजर्द आणि रसरशीत तांबूस चिखलावर सोनेरी नक्षी काढावी तसे. उकिडवे बसून मायलेकरे ते बेवारशी पीक गोळा करू लागली. गोपूची मुठ भरली की तो आईकडे साठवलेले भात देई. आई पदराच्या वेगळ्या शेवात ते बांधून ठेवी. दाण्यामागून दाणे, मुठीमागून मुठी – गोपूला आश्चर्य वाटले. हे एवढे धान्य खाली सांडते कसे? मग शेताच्या मालकाने कापून किती नेले असेल? त्याच्या घरी किती मुठी गेल्या असतील? त्याच्या आईचा अख्खा पदर मग भातगोट्यांनी भरून गेला असेल? – हे शेत कुणाचे बरे असेल? आपल्याला का नाही एखादे शेत? – मग आपल्याला असे दाणे वेचावे लागले नसते. कोयती घ्यायची आणि उंच वाढलेली भातकेसरे सपसप कापत जायचे.  वाऱ्यावर सळसळणारी साळीची शेती किती सुंदर दिसतात. ती कधी कुणी कापलीच नाहीत तर किती मजा होईल? पिवळेधमक शेत नुसते बघायला किती सुंदर वाटते. तो आईला म्हणाला,

“आई -”
“काय रे, दमलास?”
“दमलो नाही, पण आई, शेत कुणाचं ग?”
“असेल कुणातरी खोताचं, इनामदाराचं.”
“एखादं शेत कापलंच नाही तर?”
“वेड्या, शेतं कापण्यासाठीच पिकवतात.”
“शेत कापलं नाही तर वाऱ्यावर ते एकसारखं सळसळत राहील – त्याच्यात उभं केलेलं बुजगावणं नुसतं बघत हसत राहील आणि बांधावरून शाळेतली मुलं जाऊ लागली म्हणजे त्यांना मोठी गंमत वाटेल – खरं की नाही? कशाला लोकं कापतात एवढी सुंदर शेतं - ”
आई मान वर करून हसली. पुटपुटत म्हणाली,
“तू किनई अगदी नादिष्ट मुला आहेस.”
गोपू निमुटपणे गोटे निवडीत राहिला.

लवकरच त्याला कंटाळा आला. सारखे आपले मान खाली घालून निवडायचे. डोळे दुखू लागले. पिवळे भात रंगीबेरंगी खड्यांसारखेच दिसू लागले. मग त्याच्या जागी तांबड्या-लाल गुंजा दिसू लागल्या. हातात भाताऐवजी बारीक दगड येऊ लागले. गोपू कंटाळला, आईला न सांगता उठून उभा राहिला. आईला जागच नव्हती. ती निवडता निवडता बरीच दूरवर गेली होती. गोपूने डोळे चोळीत आजूबाजूला पाहिले. बापरे! किती दुपार झाली होती. लखलखीत उन्हे पडली होती. ओल्यागार भातखाचरांवर उन्हे पडल्यामुळे वाफेच्या लाटा उठत होत्या. मोकळ्या मळ्यात पिवळी फुलपाखरे स्वच्छंद बागडत होती. त्यांना वरच्यावर मटकावणारया मुठीएवढ्या रानचिमण्या इकडे तिकडे उडत होत्या.

गोपू ती मौज पाहण्यात गुंतला. त्याला आईचे भानच उरले नाही. तो चालत चालत खूप लांबवर आला. तेथे अद्याप न कापलेले एक शेत उभे होते. भाताच्या ओंब्यानी गच्च भरलेले, वाऱ्यावर डुलणारे. आणि त्यावर पोपटांचे थवे भरारत होते. लांब शेपट्याचे हिरवेगार पोपट पलीकडच्या झाडीतून बाणासारखे धावत येत नि त्या शेताला भिडत. चोचीत एकेक ओंबी पकडून पुन्हा माघारी जात. गोपू डोळे विस्फारून बघत होता. त्या शेतात राखण नव्हती. बुजगावण्याचे हात मोडून पडले होते आणि पोपटांचे थवे भाताच्या केसरांची बेबंद लूट करीत होते. त्यांच्या चित्कारांनी सगळे वातावरण भरून गेले होते –

गोपूने मागे वळून पाहिले.
त्याची आई खूप दूर राहिली होती. तिथून ती एखाद्या काळ्या ठिपक्याएवढी दिसत होती. गोपूला आईची दया आली, आईपेक्षा पोपट अधिक शहाणे. आईला तासभर निवडून जेवढे दाणे गोळा करता येणार नाहीत, तेवढे हे पोपट एका भरारीत गोळा करतात. आईला दाखवले पाहिजे. उगीचच रिकाम्या शेतातले खाली पडलेले दाणे वेचण्यापेक्षा या पिकलेल्या शेतात येऊन ओझेभर केसरे कापून नेली तर किती तरी भात मिळेल –

तेवढ्यात शेताचा मालक कुठूनतरी उगवला. बुजगावण्याच्या पायाशी ठेवलेले पत्र्याचे डबे त्याने बडवण्यास सुरवात केली, त्यासरशी पोपटांचे थवे भिऊन झाडीत पळाले. शेत ओकेबोके दिसू लागले. गोपू पोपट गेले त्या दिशेने पाहत होता. मग तो त्याच दिशेने चालू लागला. कुठे राहतात हे पोपट? त्यांनी किती भात जमवले असेल? पाहू या का? आणि तो हा हा म्हणता बांध्यापालीकडील त्या आंबराईत येऊन पोचला –
आंब्याच्या झाडावर फांदीफांदीवर पोपट बसले होते. आपापसांत मोठमोठ्याने गोंगाट करीत होते. गोपूने बारकाईने एका झाडाकडे पाहिले. तेथे एक पोपट एका ढोलीतून तोंड बाहेर काढून पाहत होता – अरेच्चा, या ढोलीत राहतात काय पोपट? तिथे तर आपणास सहज चढून जाता येईल –

गोपू मागचा पुढचा विचार न करता त्या झाडावर चढू लागला. ढोल फार उंचावर नव्हती. तो एका दुबेळक्यात बसला नि त्याने ढोलीत वाकून पाहिले. ढोल हातभर खोल होती नि आत भाताची केसरे तोंडापर्यंत ठासून भरली होती. डोलीत उडालेला पोपट दूर बसून वाकड्या मानेने पाहत होता –

गोपूने ढोलीत हात घातला आणि पोपटाने साठवलेले सगळे भात आपल्या खिशात कोंबायला सुरुवात केली. त्याचे दोन्ही खिसे तुडुंब भरले. ओरबडलेली पिवळीजर्द भातकेसरे. कितीतरी जातीची – जिरेसाळ, कामोद आणि आंबेमोहोर. गोपूचा चेहरा उजळून निघाला. त्याने ती ढोल रिकामी केली नि पलीकडच्या झाडाकडे पाहिले. प्रत्येक झाडाला एक-दोन लहान-मोठ्या ढोली होत्या. या प्रत्येक ढोलीत किती भात असेल? त्याला अंदाज करवेना –
तोच त्याच्या कानावर हाका येऊ लागल्या -  दुरून त्याची आई त्याला हाक मारीत होती –

“गोपूss – रे, गोपूsss !”
गोपू भराभर खाली उतरला नि चालू लागला. बोल बोल म्हणता आईपाशी जाऊन पोचला. आई त्याचे पाटीदप्तर धरून त्याला हाका मारीत होती. तिच्या पदरात शेरभर भाताची मोटली बांधली होती –
“कुठे होतास रे इतका वेळ-”
गोपू खुशीने हसला. त्याचे डोळे लुकलुकले. त्याने आईच्या पदारातील मोटली पहिली. मग विचारले.
“इतका वेळ निवडून एवढेच भात?”
“मग काय करू? तू गेलास मला एकटीला सोडून.”
गोपू पुन्हा हसला.
“मी बघ तुझ्यापेक्षा अधिक भात जमवले,” आणि त्याने आपले गच्च फुगलेले दोन्ही खिसे दाखवले. खिशात हात घालून मुठभर ओंब्या बाहेर काढल्या.
“कुठून आणलेस हे भात? कुणाच्या शेतातून चोरून तर नाही आणलेस?”
“उंs हूं” गोपुचे डोळे अधिकच लुकलुकले.
“मग?”
“त्या तिकडून - ” त्याने पलीकडील झाडीकडे बोट दाखवले. आई तिकडे पाहू लागली. तिला काही कळले नाही. गोपूने म्हटले.
“आणखी पण खूप आहे भात तिकडे – निवडत बसायला नको काही – आमची गंमत आहे ती.”
“मेल्या, सांग आधी कुठून आणलीस ही केसरे, नाहीतर मार खावा लागेल – चोरीबिरी करून आणली असशील तर - ”
गोपूच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. चोरी करणे म्हणजे पाप आहे हे त्याला ठाऊक नाही का? तो कसा चोरी करेल? आईला एवढा पण विश्वास नाही. कधी केली होती का आम्ही चोरी – गोपुचे ओठ वेडेवाकडे झाले. तो हिंपुटी झाला!
“तसं नाही रे वेड्या – चल, असा रडवेला नको होऊस –पण खरं सांग, कुणी दिली तुला ही साळीची केसरे?”
“पोपटांनी”

आई त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली. मग तो म्हणाला, “चल दाखवतो तुला खरं वाटत नसेल तर.”
तो पुढे नि आई त्याच्यामागून अशी दोघे चालू लागली. आता ऊन कडक झाले होते. आईला कधी एकदा घर गाठीनसे झाले होते. आता याच्यानंतर घरी जायचं. हे गोळा केलेलं भात खापरात भाजायचं मग उखळात कांडून त्याची पटणी करायची मग तिचा भात नाहीतर भाकरी. ती थकली होती. पाउल पुढे टाकण्याचीही ताकद अंगात उरली नव्हती. पण तरीही वाटत होते, कुठून या मुलाने आणले हे एवढे भात – चोरीबिरी न करता आणले असेल, कुणी आपण होऊन दिले असेल, तर बरेच झाले. तेवढीच भर – लहान पोरगा चोरी करायचा नाही. काय डोके लढवले असेल देव जाणे--!

गोपू आईला आंबराईपाशी घेऊन आला. एका आंब्याच्या झाडाकडे हात करून म्हणाला. “त्या तिथे पोपट राहतात. त्यांनी गोळा केलेलं भात मी आणलं.”
आईने एकवार त्या ढोलीकडे पाहिलं. एकवार आपल्या हडकुळीत पण तरतरीत मुलाच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांकडे पाहिलं नि ती घट्ट आवाजात बोलली,

“नि त्या पोपटांनी काय खावं रे -”
खरेच, हा विचार आलाच नाही आपल्या डोक्यात. आपण त्यांचे धान्य आणले तर त्यांनी काय खावे? पोपटांची झाली तरी ती चोरीच. क्षणभर विचार करून तो उत्तरला,
“ते आणतील दुसरं भात. त्यांना कोण अडवणार आहे? बोलून चालून ते पक्षी.”
“म्हणजे पुन्हा चोरीच – पक्षांनी माणसाची चोरी करायची. माणसांनी पुन्हा पक्षांची चोरी करायची – म्हणजे माणसांनी माणसांची चोरी केली – नाही का?”
गोपूला काही कळले नाही. आईच्या  मते आपण चोरीच केली एवढे त्याच्या ध्यानात आले. “मग हे भात तू घेणार नाहीस? याचे तांदूळ बनवणार नाहीस?” त्याने हात खिशाकडे नेत विचारले.
“अंs हं-”

गोपू क्षणभर घुटमळला. मग तरातरा चालत आंब्याच्या झाडापाशी गेला नि दोन्ही हात खोडाभोवती वेढून तो झपाझप वर चढला. ढोलीपाशी गेला. दोन्ही खिशांतले भात त्याने पुन्हा त्या ढोलीत टाकले. खिसे रिकामे करून तो खाली उतरला.

“चला आता घरी,” आई म्हणाली.

मायलेकरे उन्हातून घराची वाट चालू लागली. वाटेत मघाचे शेत पुन्हा लागले. राखणदाराला चुकावून एखादा चुकार पोपट शेतावर झेपावत होता. चोचीत ओंबी पकडून ढोलीच्या दिशेने उडत होता- गोपू पाहत होता. अद्याप त्याच्या कानात आईचे शब्द घुमत होते, ‘पक्षांनी माणसाची चोरी करायची, मग माणसांनी पक्षांची चोरी करायची – म्हणजे पुन्हा माणसाने माणसाचीच चोरी करायची – पाप करायचे -’ आई काय म्हणाली, हे त्याला अद्यापही नीटसे उमगले नव्हते, पण डोक्यावरून निर्भरपणे उडत जाणारे ते हिरवेगार पोपट पाहून त्याला वाटत होते – आपणही पोपट व्हावे का? –

-    मा. मधु मंगेश कर्णिक

No comments:

Post a Comment