Monday, 30 November 2015

औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण!

शिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्यासाठी ते आठवणं (आकलन) आणि शक्य असल्यास माहिती झालेल्यात काही अधिकची भर घालणं यालाच आपण ‘शिक्षण’ म्हणतो.  ते सारं माणसातच नव्हे तर सर्व जीवनमात्रात उपजत असतं.  त्यामुळे शिकणं ही एक खरी नैसर्गिक प्रक्रिया आहे.   जे मुद्दाम न घडवता नैसर्गिकपणे घडतं, त्यातून आनंद मिळत असतो. म्हणूनच शिक्षण ही एक खरंच एक आनंददायी घटना आहे.

आज शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की ‘गाव तेथे शाळा’ ही म्हण पूर्णत्वास गेलेली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.  विजेच्या सोयीअभावी गाव अंधारात असेल पण निदान महाराष्ट्रापुरता विचार केला तरी शाळा नाही असं गाव दुर्मिळच.  एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण खात्याने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  शिक्षणाचं महत्व प्रत्येकालाच पटलं आहे. त्यामुळे शिक्षण मिळावं म्हणून लोकं धडपडत असतात.

पण दुर्दैवाने म्हणा की अन्य कारणानं म्हणा, शिक्षण घेण्यातला आनंद मात्र हरवला आहे.  हल्ली मुलगा/ मुलगी १०वी – १२ वीत गेले की त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांच्याच छातीचे ठोके वाढतात. मुलांपेक्षा त्यांच्याच चेहऱ्यावर जास्त ताण जाणवतो.  आणि घरातील वातावरण अगदी सुतक असल्यासारखं होतं.  आजच्या शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी घरोघर चिंतेची जणू घरघरच लागलेली आढळते.  याला कारण म्हणजे आजची जीवघेणी स्पर्धा.  प्रत्यके वर्षी ०.१ ने गुणवत्ता यादी बदलत असते. आणि अशा परिस्थितीत एखाद्याला कमी गुण मिळाले की त्याला कोणाकोणाकडून काय काय बोलणी खावी लागतात हे आपण सर्व जाणताच. पण खरंच परीक्षेतील गुण हे मुलांची गुणवत्ता मोजण्याचे एकमेव साधन आहे का?

गणितात कमी गुण मिळणारा अशोक हा उत्तम चित्रं काढतो पण कुणीच त्याच्या चित्रांचे कौतुक करत नाहीत. विज्ञानात कमी गुण घेणारी रूपा सुंदर गाते पण आपण त्याकडे लक्षच कुठे देतो?  आज समाजाला शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी तो चिंताग्रस्त दिसतो. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. यासाठी शिक्षण ओझे न वाटता मुलांच्या कलाने जाणारं  आणि आनंददायी झालं पाहिजे.

मुळात शिकण्याची प्रक्रिया माणसाच्या जन्मापासूनच सुरु होते. जन्मापासून मूल जसजसं मोठं होतं, तसतसं ते नवं काहीतरी शिकत असतं. बोलायचं कसं, चालायचं कसं, वागायचं कसं अशा अनेक बाबी शिकताना मुलांना कधीही आपण मुद्दाम एका ठिकाणी बसवून शिकवत नाही. ते त्याला आवडतं म्हणून अनुकरणातून, अनुभवातून नकळतपणे मूल हे सर्व शिकत असतं.  यालाच ‘अनौपचारिक शिक्षण पद्धती’ असे म्हणतात.   आई जेव्हा मुलाला/ मुलीला स्वयंपाक शिकवते तेव्हा त्याचे काही वेळापत्रक, गृहपाठ, चाचण्या, पास – नापास अशा कुठल्याही बाबी नसतातच. पण तो/ ती केव्हा शिकते हे त्या मुलाला/ मुलीलाही कळत नाही आणि आईलाही आपण कधी शिकवले हे कळत नाही. हे सर्व अगदी सहजपणे घडत जातं.

पण हल्ली मूल अडीच-तीन वर्षाचं झालं की त्याला नर्सरी प्ले ग्रुपमध्ये घातलं जातं. म्हणजे अडीच-तीन वर्षापर्यंत मूल घरी असतं. यानंतर ते चार भिंतींच्या आत शिक्षकाने शिकवलेली गाणी, गोष्टी, खेळ अगदी तिच्याप्रमाणेच शिकण्यात गढून जातं. त्याची इच्छा असो वा नसो पण त्याला इतर मुलांप्रमाणे ते शिकावंच लागतं. ही आपली औपचारिक पद्धत. शिकणं हे शाळेत घडतं किंवा पुस्तकातून घडतं असं नाही. पूर्वी पाच - सहा वर्षापर्यंत मुलं घरीच असायची नी त्या वातावरणातच ऐकून, पाहून, निरीक्षणातून, अनुकरणातून शिकायची. मानसशास्त्र असं सांगतं की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांवर झालेल्या संस्कारातून घडणारं व्यक्तिमत्व हे कायमस्वरूपी असतं आणि ते अपवाद वगळता अपरिवर्तनिय असतं. त्यामुळे निदान या वयात तरी त्यांना अनौपचारिक पद्धतीने निसर्ग सानिध्यात जास्तीत जास्त अनुभवातून शिक्षण मिळावं हे फार गरजेचं आहे.

माझं ४ थी पर्यंतचं शिक्षण हे असंच औपचारिक पद्धतीतून झालं. मला आजही मराठी बाराखडी न चुकता म्हणता येते. पण माझ्या बालमित्रांना ती म्हणताना मधली अक्षरं गळतात. माझे मित्र रोज न चुकता वृत्तपत्रं वाचतात. पण त्यांची बाराखडी मात्र चुकते. मला आठवतं की मला शाळेत जाण्यापूर्वीपासूनच बाराखडी येत असे. ती मला कुणी मुद्दाम शिकवली नाही. पण माझ्या मोठ्या भावंडांचा अभ्यास करतेवेळी किंवा मला म्हणायला आवडे म्हणून मी ती शिकलो. आणि आजपर्यंत ती मला अचूक पाठ आहे.

माझा भाषाविकास हा पूर्णतः माझ्या मित्र मंडळी आणि मी वावरत असलेल्या लोकांच्या सानिध्यात झाला हे अगदी खरं आहे. शालेय वातावरणात मी भाषा शिकलो पण तिला धार ही शाळाबाह्य, अनौपचारिक वातावरणातूनच आली. मला वाटतं की भाषा विकासासाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती ही मलाच नाही तर इतरांनासुद्धा उपयुक्त अशी पद्धत आहे.

मी ५ वीत असताना आम्हाला प्रथम सत्र परीक्षेत चित्र पाहून शब्द लिहा असा प्रश्न होता. त्यामध्ये एक चाकाचं चित्र होतं आणि पुढे फक्त डब्ल्यू अक्षर होतं आणि पुढची अक्षरे त्यात लिहायची होती. आमची इंग्रजीची सुरवात ही ५वी पासूनच असायची आणि तो शब्द शाळेत कधीही शिकवला नव्हता, त्यामुळे त्याचे स्पेलिंग कुणालाही आले नाही. पण मी ते अचूक लिहिलं होतं. माझ्या शिक्षिकेनं विचारलं की तुला हे कसं आलं? त्यावेळेस मी सांगितलं की आमच्या घरी कपडे धुण्याचा व्हील साबण वापरतात. त्यामुळे त्यावर असलेलं चित्र आणि त्याचं स्पेलिंग मी अनेकदा वाचलं होतं आणि ते पाठ झालं होतं. त्याचा वापर मी इथे केला होता.

स्किनर या मानसशास्त्रज्ञाने म्हटलं आहेच की, प्रत्येक माणसाची शिकण्याची विशिष्ठ अशी गती असते. ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ याप्रमाणे न जाता प्रत्येकाला त्याच्या गतीनुसार शिकण्याची संधी असावी. हे अनौपचारिक पद्धतीनेच शक्य आहे. कारण त्यात प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवानुसार स्वकलाने शिकत असतो. औपचारिक पद्धतीत अभ्यासक्रम पूर्ण होण्यापेक्षा पुस्तक पूर्ण करण्यावर भर असायला हवा. पण तसे दृष्टीस मात्र क्वचितच पडते. त्यामुळे या पद्धतीत शिकणे हे रंजक होण्याऐवजी निरस बनते आणि गळती व नापास होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

खरं तर शिक्षणातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. हा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक, सामाजिक, भावनिक, अध्यात्मिक या घटकांचा विकास होय. सध्याच्या औपचारिक पद्धतीतून बौद्धिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर मारा करून ‘घोका आणि ओका’ या पद्धतीचाच वापर सर्वत्र आढळतो. बालवयामध्ये मुलांची हार्डडीस्क  रिकामी असते. ऐकणं, बोलणं, निरीक्षण करणं, अनुभवणं या इनपुटमुळे हार्डडीस्कमध्ये ज्ञानसंचित केलं जातं. म्हणून आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी वरीलपैकी किती घटकांचे इनपुट त्यांच्या हार्डडीस्कमध्ये सेव्ह होते आहे याकडे लक्ष घालणं फारच गरजेचं झालं आहे.

राजू भडके (प्रथम फौंडेशन, मुंबई)

९५९४४२४८४१

No comments:

Post a Comment