Monday, 30 November 2015

पुरवणी क्र. १ - सर्वेक्षणाची गोष्ट

सर्वप्रथम कुमार निर्माण च्या दोन गटांनी केलेल्या कृतीची उदाहरणे आपण पाहूया.

१.       एका गटातील मुलांनी एक छोटी फिल्म पहिली किंवा एक व्याख्यान ऐकले ज्यामधून त्यांना कळाले कि भारतावर विजेचे खूप मोठे संकट आहे, वीज महाग होत चालली आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर वीज बचत करू शकतो. अणूउर्जेची गरज भासते आहे पण ती धोकादायक आहे. ई.
हे सर्व ऐकल्यावर गटाला वाटले कि आपल्या गावात आपल्या परिसरात आपण याबाबत जनजागृती केली पाहिजे. त्यातून लोकांचा व गावाचा फायदा होईल. मग सर्व मुले गावातील प्रत्येक घरी गेली व त्यांनी वीज बचत, अणूउर्जा ई बाबतचे सामान्य ज्ञान लोकांना सांगितले. व त्यांना विनंती केली कि त्यांनी वीज कमी वापरावी.

२.       दुसऱ्या गटातील मुलांनी एक छोटी फिल्म पाहिली किंवा एक व्याख्यान ऐकले ज्यामधून त्यांना कळाले कि भारतावर विजेचे खूप मोठे संकट आहे, वीज महाग होत चालली आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर वीज बचत करू शकतो. ई.

हे सर्व ऐकल्यावर गटाला वाटले कि आपल्या गावात आपल्या परिसरात आपण याबाबत जनजागृती केली पाहिजे. पण मग त्यांना वाटले कि आपल्या गावाला याची गरज आहे का हे आधी तपासावे लागेल. ते कसे ठरवणार? मग त्यांनी प्रत्येक घरासाठी एक प्रश्नावली तयार केली. त्यात विविध प्रश्न होते, जसे कि, घरात किती बल्ब आहेत, किती पॉवर चे आहेत, ते किती वेळ वापरले जातात, टीव्ही आहे का, तो किती वेळ वापरला जातो, स्वयंपाकाला सरपण वापरतात कि शेगडी, महिन्याचे विजेचे बिल किती येते ई.

मग गावातील लाईनमन ला भेटून त्यांनी हे शिकून घेतले कि आपल्याला येणारे बिजेचे बिल कसे मोजतात. व त्यानुसार मुलांनी गावातील प्रत्येक घराचा विजेचा वापर नेमका किती होतो ते शोधून काढले, मग सर्वांकडून गोळा झालेली प्रश्नावलीची उत्तरे एकत्र करून, पूर्ण गावातील विजेचा वापर व खर्च किती होतो हे त्यांनी शोधून काढले. त्यावरून मग सरासरी प्रत्येक घराचा विजेचा वापर काढला. त्यांच्या हे लक्षात आले कि गावात १०० watt चे बल्ब खूप आहेत व त्यांची गरज नाही. कमी क्षमतेचे बल्ब देखील चालतील.

मुलांनी बैठकीत चर्चा केली कि गावातील लोकांना हे कसे पटवून द्यायचे. व हे सर्व केल्यावर मग मुलांनी प्रत्येक घरी जाऊन लोकांना समजून सांगितले कि त्यांच्या घरचा विजेचा वापर कसा कसा होतो आहे, सरासरीपेक्षा जास्त आहे कि कमी आहे, कुठे कुठे बचत करता येईल व ती किती रुपयांची असेल, सर्वांनी बचत केली तर गावाचे किती पैसे वाचतील ई.

आपण पाहिले असेल, पहिल्या गटातील मुलांचे काम खूपच सोयीस्कर होते. त्यांनी कुठेतरी, काहीतरी ऐकलेली माहिती स्वत: न तपासून पहाता, लोकांना त्याची गरज आहे का हे तपासून न पहाता लोकांवर माहितीचा भडीमार केला. म्हणजे त्यातून लोकांना देखील काही ठोस मिळाले नाही व मुलांच्या ज्ञानात देखील भर पडली नाही. या उलट दुसऱ्या गटातील मुले जेव्हा लोकांमध्ये जागृती करतील तेव्हा लोक त्यांचे ऐकतील व चांगला बदल घडू शकेल, व त्यांनी प्रया श्नाचा केलेला अभ्यास त्यांना पुढे देखील कामी येईल.
ही सगळी कमाल आहे मुलांनी केलेल्या संशोधनाची! व संशोधनामध्ये सर्वेक्षणाचे महत्व खूप आहे.

चला तर मग जाणून घेऊया सर्वेक्षण म्हणजे काय?

सर्वेक्षण म्हणजे एखाद्या विषयाचा शास्त्रशुध्द अभ्यास करणे, त्या विषयासंबंधी माहिती संकलित करणे आणि संकलित माहितीचे विश्लेषण करून त्या माहितीची लिखित स्वरुपात मांडणी करणे.
उदा.
 •  एखादी घटना घडली तिचे परिणाम समजून घेण्यासाठी त्याच्या आधीचे व नंतरचे सर्वेक्षण
 •  एखाद्या विषयाचा तुलनात्मक अभ्यास
 • विश्लेषणात्मक अभ्यास

सर्वेक्षण हे मुख्यतः एखाद्या व्यक्तीचे / समुहाचे विचार, मत किंवा भावना जाणून घेण्यासाठी किंवा आकडेवारी, माहिती संकलित करण्यासाठी केले जाते. त्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग केल्या जातो.

सर्वेक्षणाची अनेक उद्दिष्टे असू शकतात. उदा. सरकारला शाळेसाठी असणाऱ्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी विषयीची माहिती हवी असते. एखादी योजना शाळेत कशाप्रकारे राबविली जात आहे या संबंधीची माहिती सामाजिक सर्वेक्षण करूनच मिळवणे शक्य असते.
किंवा उदा. जर आपल्याला आपल्या गावातल्या मुलांची शैक्षणिक स्थिती समजून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण दोन मुख्य प्रश्नांचा अभ्यास करू शकतो.

·         आपल्या गावातील किती मुले नियमित शाळेत जातात?
·         जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांच्या शाळेत न जाण्यामागची नेमकी कारणे काय?

प्रश्नावलीचा उपयोग करून अशा कुठल्याही विषयासंबंधीची शास्त्रशुद्ध व विश्वसनीय माहिती गोळा करता येऊ शकते व त्यावरून अधिक चांगले उपाय सुचवता येऊ शकतात. अन्यथा संशोधनाच्या अभावी  बऱ्याच वेळा ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी परिस्थिती असते.

सर्वेक्षणाचे टप्पे

       १.       सर्वेक्षणाचा विषय ठरवणे
  
       २.       सर्वेक्षण कुठे, कधी आणि कसे करायचे हे ठरवणे
   
       ३.       प्रश्नावली बनवणे

       ४.       मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण

        ५.       प्रश्नावलीत काही बदल हवे असल्यास ते बदल करणे

        ६.       काही बदल नसतील तर माहितीचे संकलन व विश्लेषण

        ७.       अहवाल लेखन

प्रश्नावली कशी बनवावी?
 • प्रश्नावली काळजीपूर्वक तयार करावी लागते. प्रश्नांचा क्रम व त्यांची एकमेकांशी संगती, त्यांचे शब्दस्वरूप, उत्तराकरिता सोडलेली जागा इ. गोष्टींचा निट व आधीच विचार करावा.
 • काही प्रश्न ‘होय’, ‘नाही’ या स्वरूपाचे, तर काही प्रश्नांची लांब उत्तरे असतात, त्यासाठी योग्य जागा ठेवावी.
 • प्रश्नावलीच्या सुरवातीलाच ही सर्व माहिती खाजगी व गुप्त ठेवली जाईल अशी हमी स्पष्टपणे छापलेली असावी.
 • प्रश्नांचे उत्तर समोरच्याला सहज देता येईल इतका तो स्पष्ट असावा. 
 • प्रश्नावली लांब व कंटाळवाणी नसावी, कारण त्यामुळे माहितीची विश्वसनीयता कमी होते.
 •  नमुना सर्वेक्षणातील अनुभव येथेही उपयोगी पडतो.
       सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीच्या काळात आवश्यक वाटल्यास एक मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण लहान प्रमाणावर घेतले जावे. नमुना सर्वेक्षण म्हणजे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्या आधी लहान प्रमाणावर ते करून पाहणे. त्याचे मुख्य दोन फायदे असतात.

       १.      कोणत्या प्रश्नांस समाधानकारक उत्तरे मिळतात, कोणास मिळत नाहीत हे कळते. कोणत्या प्रश्नात बदल करण्याची गरज आहे, कोणते नवे प्रश्न घालावेत किंवा दिलेल्या प्रश्नांचा क्रम बदलावा हे समजते

        २.           आपल्याकडून अधिक सुधारणेची काय गरज आहे हे देखील कळते

माहिती मिळवण्याचे नियम

-    दिलेली सर्व माहिती गुप्त व खाजगी समजली जाईल, ती इतर कोणालाही समजणार नाही याबद्दल उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रथमच हमी द्यावी.

-    सर्वेक्षणाचे उद्दिष्ट समजावून देऊन त्या व्यक्तीला विश्वासात घ्यावे.

    -    उत्तर देण्यार्याच्या सोयीने व कलाने घ्यावे. आपल्या वागणुकीमुळे तो नाराज होऊन माहिती नाकारण्याचा धोका तलाव.

    -    त्याचबरोबर माहिती विश्वसनीय मिळेल याची काळजी घ्यावी.
  
       विश्लेषण व अहवाल:

       संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून व त्याची निट मांडणी करून अहवाल लिहावा. व योग्य व्यक्तींपर्यंत तो अहवाल पोचवावा त्यामुळे अहवालातून आलेल्या निष्कर्षाचा प्रत्यक्ष उपयोग होईल.. 

कृती:

 • आपल्या परिसरामध्ये एखाद्या विषयावर सर्वेक्षण करण्याची गरज आहे का यावर गटात चर्चा करा.
 • जर तशी गरज असेल तर सर्वेक्षण कधी, कुठे, कुणाचे आणि कसे करायचे, प्रश्नावलीत काय प्रश्न असावेत इ. गोष्टी मुलांनीच ठरवाव्या.
 •  मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण करावे
 • माहितीचे संकलन करून त्यावर अहवाल तयार करावा.
 • हा अहवाल व सर्वेक्षण कसे केले याची गोष्ट आम्हाला लिहुन पाठवा, भरारी च्या माध्यमातून ती आपण सर्वांशी शेअर करू व त्या गटाला मिळेल एक छानशी भेट! No comments:

Post a Comment