Wednesday, 1 March 2017

गटातील ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ – संवाद गट

मित्रांनो, आता तुम्ही आता म्हणाल, “गप्पा तर आम्ही नेहमीच मारतो. मग त्या गप्पांत आणि गटात मारलेल्या गप्पांत फरक तो काय?” तर मित्र-मैत्रिणींसोबत ज्यावेळी आपण गप्पा मारतो त्यावेळी आपल्याकडे विषय तर भरपूर असतात म्हणजे अक्षय कुमारचा जॉली एल.एल.बी. एकदम भारी होता बरका,” इथपासून ते अरे परवा विराट कोहलीने कसली मस्त फिफ्टी मारली आणि तरी पण आपण हरलो रे!  इथपर्यंत खूप विषयांवर आपण कितीही वेळ गप्पा मारू शकतो.  पण त्या गप्पांचा ठराविक असा काही उद्देश मात्र कधीच नसतो.  बऱ्याच वेळा त्यामुळे आपला नुसताच वेळ मात्र वाया जाण्याची  शक्यता असते. म्हणजे या गप्पा मारायच्याच नाहीत का? तर नक्की मारायच्या पण याहीपेक्षा वेगळ्या गप्पा आपल्याला गटात मारता येऊ शकतात आणि त्याचा फायदाहीहोतो.
याचं एक छोटसं उदाहरण बघा. मन्याळीच्या एका गटातील आपल्या एका छोट्या मैत्रिणीला शाळेत जाताना रस्त्यावर एक छोटीशी चिमणी मरून पडलेली दिसली. तिला खूपच वाईट वाटलं. कशामुळे बरं ही चिमणी मेली असेल?’ असा विचार दिवसभर तिच्या मनात येत होता. शाळेत गेल्यावर तिने त्यांच्या निमंत्रक सरांना हा प्रश्न विचारला. सर म्हणाले की कदाचित खूप उन असल्याने तिला प्यायला पाणी मिळालं नसेल आणि म्हणून ती मेली असेल. पण हिने पुन्हा प्रश्न विचारला, “पण जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपण काय करू शकतो?” सरांनी हा प्रश्न सगळ्या गटासमोर मांडला. आणि त्यादिवशी सगळे एकत्र येऊन यावर विचार करू लागले. प्रत्येकाने आपापलं मत मांडलं, चर्चा केली आणि सगळ्यात शेवटी उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शाळेत, घराच्या गच्चीत, गॅलरीत छोट्या छोट्या भांड्यात पाणी भरून ठेवायचं असं सगळ्यांनी ठरवलं आणि तसं केलंही.
या संपूर्ण चर्चेमुळे दोन गोष्टी घडल्या:
· बऱ्याच जणांना पक्ष्यांना पाणी मिळालं नाही तर ते मरतात ही नवीन माहिती मिळाली.
· प्रत्येकाने खूप विचार केला. खूप गप्पा मारल्या पण त्या गप्पांचं चर्चेत रुपांतर होऊन त्याचा फायदाच झाला.
यानंतर मात्र या गटाने ठरवलं की आपल्या गटाची कृती ठरवताना सगळ्यात आधी सर्वांचं मत विचारात घ्यायचं, सगळ्यांनी त्यावर चर्चा करायची आणि मगच काय ते ठरवायचं. याचा आणखी एक फायदा असा की नियम असो अथवा कृती; ती सगळ्यांनी मिळून ठरवलेली असल्याने प्रत्येक जण त्याचं पालन करतो. आता या चर्चेसाठी काही नियम जर आपण सगळ्यांनी मिळून ठरवले आणि पाळले सुद्धा तर आपल्यात भांडणही होणार नाही आणि आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायलादेखील मिळतील. तुम्हाला नियम ठरवायला मदत म्हणून काही सोप्पे नियम उदाहरण म्हणून देत आहोत.
·         कुठल्या विषयावर यावेळी आपण चर्चा करणार आहोत हे गटातल्या सगळ्या       सदस्यांना २ दिवस आधी सांगून ठेवा. म्हणजे प्रत्येकाला त्यावर विचार करायलाथोडा वेळ मिळेल. (याची जबाबदारी गट प्रमुखाने घ्यावी)
·         चर्चेदरम्यान कुणीच कुणावर ओरडणार नाही आणि चिडणार सुद्धा नाही.
·         आपल्या गटातले सगळे जण बोलतायेत ना याची काळजी घ्यायची. एखादा जण जर बोलायला घाबरत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याला धीर द्यायचा आणि बोलायला प्रोत्साहन सुद्धा.
·         तसंच आपल्या पैकी जर एखादा मुलगा किंवा मुलगी जास्त बोलत असेल आणि इतरांना त्यामुळे संधी मिळत नसेल तर त्याला/तिला थोडा वेळ शांत बसायला लावून इतरांना बोलायची संधी मिळेल याची काळजी घ्यावी.
·         आपल्या मित्र किंवा मैत्रिणीचं मत आपल्याला पटत नसेल तरी ते पूर्ण ऐकून घ्यायचं आणि मगच आपलं मत मांडायचं. आणि जरी प्रत्येकाला आपलं मत पटलं नाही तरी तिच्याशी/ त्याच्याशी कट्टी करायची नाही.
या चर्चेत अजून मजा येण्यासाठी जर तुमच्याकडे या विषयाशी संबंधित एखादा व्हिडियो असेल तर तो, गोष्ट, कविता असेल तर ती तुम्ही वाचू शकता. कुणाला त्या संबंधात काही आठवणी असतील किंवा विषयाशी संबंधित काही कुठे वाचलं ऐकलं असेल तर ते देखील तुम्ही या चर्चेत सांगू शकता. याची जबाबदारी आपण आपल्या निमंत्रक ताई, दादा किंवा शिक्षकांकडे देऊया.

आम्ही तुम्हाला अगदी सोप्पे नियम सांगतिले, तुम्ही सगळे मिळून याहीपेक्षा भारी आणि बरेच नियम ठरवू शकता. चला तर मग आपल्या गटातील सगळ्यात पहिल्या गप्पा-गोष्टी-चर्चा सत्राला आपल्याच ‘गप्पा-गोष्टी-चर्चा’ कट्ट्याचे नियम ठरवण्यापासूनच सुरुवात करूया !

No comments:

Post a Comment