Wednesday, 1 March 2017

न्याय—एक उपक्रम


मित्रांनो आणि मैत्रिणींनो या भरारीचं मुखपृष्ठ बघून तुम्हाला काय वाटलं ? कशाचं चित्र आहे ते ? अगदी बरोबर ! न्यायदेवतेचा पुतळा आहे तो! सिनेमामध्ये, बातमीपत्रातून, मालिकांमधून आणि इतरही अनेक ठिकाणी आजपर्यंत तुम्ही हा पुतळा बघितला असेलच. न्याय म्हटलं की आपल्याला पहिले हा पुतळा आठवतो. भरारी मधील चित्र चर्चा आणि गोष्ट बघून एव्हाना तुम्हाला कळलं असेलच की यावेळेस आपण भरारी मध्ये न्याय म्हणजेच JUSTICE बद्दल चर्चा करणार आहोत. त्यासाठी सर्व प्रथम तुम्ही चित्रचर्चा सदरातील पहिल्या चित्राकडे बघून गटात चर्चा करा आणि ठरवा की दोन्ही पैकी कोणत्या भागात सगळ्यांना न्याय मिळाला आहे. असं तुम्हला का वाटतं ? त्याच्या कारणांची पण चर्चा करा आणि सगळ्यांची मतं जाणून घ्या.
त्यानंतर दोन नंबरच्या चित्राकडे बघून त्यावर चर्चा करूया. त्यात काही मुलं-मुली शाळेत प्रार्थना म्हणण्यासाठी रांगेत उभे आहेत आणि दोन मुली बाहेरून त्यांच्याकडे बघत आहेत. इथे काय होतंय न्याय मिळतोय का ? तसं बघितलं तर शाळेतील मुलांच्या आई वडिलांकडे शाळेची फी भरायला पैसे आहेत आणि या बाहेर उभ्या असणाऱ्या मुलींच्या घरच्यांकडे ते नसावेत म्हणून त्या बाहेर उभ्या राहून शाळेतील मुला-मुलींकडे बघताय. कायद्याच्या दृष्टीने बघता यात काहीही चूक नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं त्यांच्या सोबत न्याय होतोय का ? न्याय होत असेल तर कसा आणि जर अन्याय होत असेल तर तो कसा यावर गटात चर्चा करा.
उदाहरण म्हणून गटाचे दोन भाग करून यावर आपण वादविवाद करूया. एक गट म्हणेल की यात काहीही अन्याय नाहीये तर दुसरा गट म्हणेल की हा अन्याय आहे.
सुरुवातीला आपल्या चर्चेत न्यायदेवतेच्या पुतळ्याचा उल्लेख आलाय. त्या पुतळ्याच्या एका हातात तराजू आहे तर दुसऱ्या हातात तलवार आहे आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. असं का असेल यावर देखील गटात चर्चा करा, मोठ्या जाणत्या लोकांकडून, इंटरनेटवरून माहिती मिळवा, शिक्षकांना विचारा आणि ती माहिती संपूर्ण गटाला सांगा. विशेष करून डोळ्यावरील पट्टीचा अर्थ आणि महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा.
जसं आपण म्हटलं की कृतिकार्यक्रम सुचण्यासाठी निरीक्षण केलं पाहिजे तसं आता न्याय आणि अन्याय हे मुद्दे डोळ्या समोर ठेवून आपण आपल्या परिसरात निरीक्षण करूया आणि कुठे अन्याय नजरेस पडतोय किंवा कुठे बरोबर सर्वांना न्याय मिळतोय अशा काही घटना किंवा परिस्थितीची नोंद करूया. प्रत्येकाने कमीतकमी दोन न्यायाच्या आणि दोन अन्यायाच्या घटना नोंदवूया. पुढील बैठकीत आपण सर्वांनी नोंदवलेल्या घटना ऐकून त्यावर गटात चर्चा करू आणि काय केलं असतं तर तिथे न्याय झाला असता याचा विचार करू. आणि हे सगळं करून झालं की तुम्ही आमच्याशी शेअर करालच!
आता आपण कृतीकार्यक्रमांकडे वळूया. तिकडे जाण्याआधी वरील सर्व चर्चा तुम्ही गटात केली असेल असं आम्ही अपेक्षित ठेवतोय.
 ही चर्चा झाल्यावर त्यातील तुम्हाला आवडलेल्या एखाद्या घटनेवर आणि त्यात न्याय काय आहे यावर एक छोटसं नाटक तुम्ही लिहा आणि बसवा. प्रयत्न करा की नाटकात गटातील सर्वांना काहीतरी काम मिळेल. ते लिहलेलं नाटक आम्हाला पाठवा.
तुम्हाला शक्य असल्यास एखाद्या अन्याय होणाऱ्या ठिकाणी आपण काही करून कुणाला न्याय मिळणार असेल तर नक्की प्रयत्न करा. हे सगळं करतना तुम्हाला नक्कीच खूप भन्नाट अनुभव येतील. ते अनुभव आम्हाला नक्की कळ्वा. त्यासाठी आमचे फोन नंबर दुसऱ्या पानावर दिलेले आहेतच. चला तर मग हात पाय झटकून कामाला लागुया!

(न्याय हा विषय घेऊन प्रत्येक गटाने परिसरातील एखाद्या घटनेवर छोटे नाटक बसवायचे आहे. नाटक शक्यतो गटातील मुला-मुलींनी लिहावे.)

No comments:

Post a Comment