Wednesday, 1 March 2017

संवादकीय


हॅल्लो मित्रांनो!!!
 कसे आहात? मजेत ना?  आम्हीही मजेत आहोत.
मित्रांनो तुम्ही बघितलं असेल या वेळेस आपण या सदरालासंपादकीयन म्हणतासंवादकीयम्हटलं आहे. कारण भरारी हे कुमार निर्माणच्या विविध गटांमधील संवादाचं माध्यम आहे. त्याचसोबत आमचा आणि तुमचा देखील संवाद या माध्यमातून होत असतो. असं हे संवाद साधण्यासाठीसंवादकीय!
आम्हाला खात्री आहे की आपल्या बैठका नियमितपणे चालू असतीलच, तुमच्या परीक्षा देखील जवळ आल्या असतील, तुम्ही मन लावून अभ्यासही करत असाल. कुमार निर्माणच्या बैठकीला येऊन तुम्ही अभ्यास देखील करू शकता, कुमार निर्माण ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. त्यामुळे अभ्यासाचं काही आपल्याला वावडं नाहीये. आपण कुमार निर्माणच्या बैठकीत अजून काय-काय करू शकतो यावर आपण मागील अंकात आणि प्रत्यक्ष भेटीतही चर्चा केली आहे.
कुमार निर्माणच्या तुमच्या यावर्षीच्या गटात काही नवीन मित्र मैत्रिणी देखील सहभागी झाले असतील. त्यांना कुमार निर्माण म्हणजे काय ? कुमार निर्माण मध्ये आपण काय करतो हे समजावून सांगायची आणि त्यांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी मागच्या वर्षी गटात असणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील आहे.
तुम्ही सगळे यावर्षी उत्साहाने कृतिकार्यक्रम करता आहात हे बघून खूप आनंद झाला. तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांचे चांगले फोटो काढून तुम्ही आम्हाला पाठवले देखील आहेत. काही गटांचे असे फोटो आमच्या पर्यंत पाठवायचे राहिले आहेत तर ते लवकरात लवकर आम्हाला पाठवा. त्यासोबतच तुम्हा मुला-मुलींना हे कृतिकार्यक्रम कसे सुचले,  बैठकीत त्यावर काय चर्चा झाली, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करताना काय अनुभव आले, हे देखील तुम्ही लिहून आम्हाला पाठवलं पाहिजे. तुमचे असे अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून इतरांना व आम्हाला देखील खूप काही शिकायला मिळू शकेल. तर मग उचला पेन आणि लागा कामाला. तुमच्या अनुभवांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.
गेल्या दोन महिन्यांत तुमच्यापैकी बहुतांश गटांना आम्ही भेटी दिल्या. तुमच्यासोबत खेळलो, गाणी म्हटली, गप्पा केल्या, आपण सर्वांनी मिळून कुमार निर्माण पुन्हा एकदा समजून घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली भारी दोस्ती देखील झाली!
आपण ठरवल्याप्रमाणे चर्चेतून तुम्ही तुमच्या गटाला एक छानसे नावही दिले असेल, गटप्रमुखही नेमले असतील आणि गटाची एक वहीदेखील बनवली असेल; ज्यात तुम्ही बैठकीचा वृत्तांत आणि अनुभव लिहित असाल. ( ज्या गटांनी अजून हे केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर करावं.)
मित्रांनो, भरारी हे तुम्हा मुलांचं आहे तर यात तुम्हाला काही बदल हवे असल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासोबतच जर तुमच्यापैकी कोणी छानशी गोष्ट रचत असेल, कोणी गाणे/ कविता करत असेल तर तेही आमच्यापर्यंत पोचवा.
आता परीक्षेनंतर येईल ती म्हणजे तुम्हा मुलांना मनापासून आवडणारी उन्हाळी सुट्टी! या सुट्ट्यांत कायकाय करायचं याबद्दलचं तुमचं प्लानिंगही झालं असेल. तुमच्यापैकी काही जण मामाच्या गावाला जातील, काही फिरायला जातील तर काही घरीच मित्रांसोबत खेळायची मज्जा घेतील. तुम्ही सर्वजण सुट्ट्यांत खुप मजा करा, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, अवांतर वाचन करा आणि खुप खुप खेळा!
सुट्ट्या सुरु झाल्या की तुम्ही असे इकडे-तिकडे जाणार तर काही ठिकाणी कुमार निर्माणचे गट विस्कळीत होतील; तर अशावेळी गटाचे काम बंद नको पडायला म्हणून तुम्ही काय बरं करू शकता यावर गटात बैठक घेऊन जरूर विचार करा. गेल्या वर्षी काही गटांनी सुट्ट्यांना जाण्याआधी गटाची बैठक घेतली आणि त्यात आपापसांत चर्चा करून असे कृतिकार्यक्रम सुचवले जे त्यांना गावाला जाऊनही करता येतील. अशा काही कृतींची मुलांनी यादीच बनवली होती आणि सगळ्याच मुलांनी त्यानुसार खुप भन्नाट कृती केल्यादेखील. तुम्ही आपल्या गावी राहणार असाल तर तुम्ही या कृती आपल्या गटासोबत करू शकता, बाहेर जाणार असाल तर एकेकटे तर करूच शकता पण त्या पेक्षा जिथे जाणार असाल तिथे नवीन मित्र बनवून त्यांना सोबत घेऊन देखील तुम्ही काही कृती करू शकतात. सुट्ट्या संपवून परत आल्यावर पुन्हा भेटूच. परत आल्यावर गटांना पुन्हा पूर्ववत काम चालू ठेवता येईलच.
तर बघा तुम्हालाही असं काही सुचतंय का !

सुट्ट्यांत खुप मजा करा... 

No comments:

Post a Comment