Saturday 31 October 2015

पुरवणी क्र. १ - क्षेत्रभेट


क्षेत्र भेट म्हणजे काय?

क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस्था, मंदीर ई. यांना भेट देणे असा समज होतो. पण हे सर्व तर आपण सहलीतही करतोच. क्षेत्रभेट व सहल यामध्ये खूप सारे फरक करता येतील. जेव्हाही आपण एखादी जागा पहायला (SEE) जातो. त्या भेटीतून आपल्याला कशाची माहिती मिळते हे आपण तिथे जाऊन काय बघतो (LOOK) यावर अवलंबून असते. तर मिळणारे ज्ञान हे आपण तिथे कशाचे निरीक्षण (OBSERVE) करतो यावर अवलंबून असते.
म्हणजेच या तीनही गोष्टी निरनिराळ्या आहेत व त्यांचे फायदे निरनिराळे आहेत.

उदा. समजा आपण ताडोबाचे जंगल पाहायला गेलो आहोत. आता आपण जंगल पाहायला गेलो म्हणजे जंगलात खूप साऱ्या गोष्टी आहेत. झाडे आहेत, इतर प्राणी आहेत, तलाव आहेत पण आपण जर फक्त वाघ शोधत असू तर इतर गोष्टी आपल्याला अगदीच ओझरत्या दिसतील. व वाघदेखील आपण फक्त बघितलेलाच असेल.

पण जेव्हा आपण त्या दिसलेल्या वाघाचा अभ्यास करू, त्यावर विचार करू तेव्हा अगणित गोष्टी शिकायला मिळू शकतील. उदा. वाघ एकटा दिसला म्हणजे वाघ एकत्र राहत नसावेत. मग या वाघाच्या परिसरात दुसरा वाघ आला तर काय होईल हे शोधलं पाहिजे. किंवा हा वाघ लंगडत चालत होता म्हणजे त्याला काही इजा झाली असेल का हे शोधता येईल. ई. ही माहिती आपल्याला खाली दिलेल्या तक्त्यात मांडता येईल.

काय केले
त्यातून होणारे शिक्षण
See / पहाणे
आम्ही ताडोबा जंगल पाहून आलो. जंगलात खूप झाडे व प्राणी असतात. जंगल हिरवे व दाट असते. तिथे फिरायला खूप मजा येते
Look / बघणे
हिरव्यागर्द जंगलात खराखुरा वाघ आहे, तो आम्ही प्रत्यक्ष पाहिला. तो खूप मोठा होता. खूप मजा आली. आणखी वाघ पाहायला मिळाले असते तर अजून मजा आली असती.
Observe / निरीक्षण
जंगलात हिरडा, तेंदू, मोहाची झाडे जास्त आहेत. त्यामुळे जंगल हिरवेगार व घनदाट आहे. वाघांसाठी ताडोबा हे अभयारण्य घोषित केले आहे कारण जगात वाघांची संख्या कमी होत आहे. तेथे एकूण ४३ वाघ आहेत. आम्ही पाहिलेला वाघ नर होता. तो थोडासा लंगडत चालत होता, कदाचित त्याच्या पायात काटा घुसला असेल. ही गोष्ट आम्ही वनरक्षकांना सांगितली, त्यांनी त्यावर लवकरच इलाज करू असे सांगितले. तिथे राहणारे आदिवासी किती साधे पण समाधानी जीवन जगतात, माझ्याकडे इतक्या वस्तू असूनदेखील मी खुपदा हट्ट करतो. मी यापुढे तस करणार नाही.
म्हणून क्षेत्रभेटीमध्ये निरीक्षण होणे खूप महत्वाचे आहे.

क्षेत्रभेटीचे इतर फायदे
-       नियोजन कसे करावे हे कळते
-       नेतृत्वगुणांचा विकास होतो
-       एकमेकांची अधिक चांगली ओळख होते, मैत्री वाढते.
-       नवनवीन मित्र मैत्रिणी मिळतात
-       जबाबदारपणा येतो
-       परिसराशी ओळख होते/ निसर्गाशी नातं/ जवळीक तयार होतं
-       दृष्टीकोण विकसित व्हायला मदत होते

कृती  -

क्षेत्रभेटीसाठी काही सूचना

  1. भेटीचे स्थळ मुलांना सुचवता आले तर खूप छान.
  2.   भेटीचे स्थळ मुलांना सुचवता आले तर खूप छान. 
  3.  भेटीसाठीचा दिवस, वेळ, खर्च, प्रवासाचे टप्पे ई. बाबी मुलांनीच ठरवाव्या.
  4.   भेट देण्याआधी करावयाचे सोपस्कार मुलांनीच करावेत. उदा. परवानगी काढणे.
  5. भेटीदरम्यान काय काळजी घ्यावी, काय करावे, काय करू नये याचा आराखडा व नियम तयार करणे हे कामदेखील मुलांनीच स्वतंत्रपणे करावे.
  
भेटीनंतर मुलांनी खालील प्रश्न स्वत:ला विचारावे व सर्वांनी मिळून त्यावर चर्चा करावी. ही चर्चा ऐकण्यासाठी गटाबाहेरील कुणी अनुभवी व्यक्ती पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकल्यास उत्तम.

  1. भेटीत मी काय पाहिले? भेटी दरम्यान काय काय दिसले? मी कुठली निरीक्षणे केली? 
  2.   मला किती व कुठले प्रश्न पडले?
  3. त्यापैकी कुठल्या प्रश्नांची उत्तरे सहज सापडली? ती योग्य आहेत हे कसे ठरवले?
  4.   कुठल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अजून प्रयत्न करावा लागेल? कशा प्रकारचे प्रयत्न करणार? कधीपर्यंत करणार?

No comments:

Post a Comment