Saturday, 31 October 2015

गोष्ट

  नव्या कोऱ्या कपाटाचं रहस्य’
            सकाळी ८.३० ते ९ ची वेळ. चंगूबंड्या अंगणात खेळत होती. एकटीच. आईनं तीनतीनदा हाकारलं. पण छट ! ती मुळी हलायलाच तयार होईना. शेवटी आई दारात येऊन ओरडली, ‘तू दुध प्यायला येतेस की नाही?’
‘नाही’. चंगूबंड्या ठामपणानं म्हणाली.
‘मग तुला बिस्कीट पण देणार नाही हं !’
आता चंगूबंड्यापुढे प्रश्न पडला. दुध घेतलं नाही तर बिस्कीटपण नाही . शेवटी ती काकुळतीनं म्हणाली, ‘असं काय करतेस ! काकूच सांगून गेल्यायत ना, त्यांच्या घरावर लक्ष ठेव म्हणून. मी राखण करतेय गं!’
‘मोठी आलीय राखण करणारी. चल आत मुकाट्यानं दुध प्यायला.’

मायलेकीचं बोलणं चालू असताना दारात एक ट्रक आला. दोन माणसं खाली उतरली. ‘तोडणकर कुठं राहतात हो?’ त्यातल्या एकानं चौकशी केली. चंगूबंड्या लगेच पुढे होत म्हणाली, ‘कोण तुम्ही ? काय हवंय तुम्हाला ?’ तिच्या बोलण्यावर तो मोठ्यामोठ्या मिशीवाला माणूस म्हणाला, ‘तू गं कोण बाळ ? त्यांची मुलगी का ?’
‘नाही. मी  हर्षू -  हर्षदा ! मला चंगूबंड्या म्हणतात. मी त्या काकूंच्या शेजारीच रहाते. त्या बाहेरगावी गेल्यायत ना, म्हणून त्यांच्या घराची राखण करतेय. तोडणकरकाका आठ दिवसांनी येणारायत.’

‘तू चल बघू आधी,’ आई ओरडली.

चंगूबंड्याला आईचा भारी राग आला. एकतर ती राखण करत होती त्याचं आईला काहीच महत्व वाटत नव्हतं. आणि शिवाय तिनं लोकांपुढे तिचा अपमान केला होता. चंगूबंड्या तिथंच अडेलतट्टूपणानं उभी राहिली. ती माणसं आपसात काहीतरी कुजबुजत होती. मग आईनंच पुढे होऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की तोडणकरांनी स्टीलच्या कपाटाची ऑर्डर दिली आहे. तोडणकर गणपतीसाठी गावी गेले होते. खरं तर कपाट नवरात्रात येणार होतं, तर ते १५ दिवस आधीच आलं. चंगूबंड्याच्या आईनं कपाट बघितलं. नवं कोरं कपाट. छान शेवाळी रंगाचं. तिच्याकडे घराची चावी होती. तिला वाटलं, त्यांना कपाट ठेवायला सांगावं. ती म्हणाली, ‘माझ्याकडे चावी आहे. मी दार उघडून देते. तुम्ही कपाट ठेवून जा. तोडणकर आले की पैशाचं विचारा.’

‘पैसे त्यांनी आधीच भरले आहेत. आम्हाला फक्त कपाट पोचवायचं आहे.’

आईनं दार उघडलं. त्यांनी कपाट आत आणलं. भिंतीला टेकून ठेवून दिलं. आणि ते आले तसे निघून गेले. चंगूबंड्याला मात्र ते लोक मुळीच आवडले नाहीत. त्या मिशिवाल्याचा तर तिला भारी राग आला होता. ट्रक गेल्यावर ती आईला म्हणाली, ‘आई, ते दोघं चोर होते का गं ?’

‘अॅ हॅ रे ! अक्कल बघा शहाणीची. अगं चोर कधी कपाट घेऊन येतात का ? काकांनी दुकानातून कपाट विकत घेतलं आणि त्या दोघांनी आणून पोचवलं. ते कामगार होते.’ चंगूबंड्याला ते मुळीच पटलं नाही. सबंध दिवसभर ती लक्ष ठेवून होती. तो मिशीवाला पुन्हा येतो का म्हणून पहात होती.

रात्री जेवताना आईनं चंगूबंड्याची गम्मत सांगितली. सगळे खो खो हसले. बाबा मात्र हसले नाही. ते म्हणाले, ‘तुम्ही हसू नका. काही काही गोष्टी मोठ्यांना चटकन कळत नाहीत, पण मुलांना त्या जाणवतात. एखाद वेळेस तो मिशीवाला खरंच चांगला माणूस नसेल.’ त्यावर दादा हसून म्हणाला ‘बाबा, उगीच तुम्ही तिची बाजू घेऊ नका. चोर सामान पळवतात. देऊन जात नाहीत. कपाट देणारे चोर आपल्यालाही आवडतील बुवा !’ यावर सगळे पुन्हा हसले. चंगूबंड्याला मात्र दाद्याचा भारी राग आला. त्याच्याशी जाम बोलायचं नाही असं तिनं ठरवून टाकलं. आकाशवाणीवरची गाणी ऐकताऐकता ती झोपी गेली.

मध्येच केव्हातरी तिला एकदम जाग आली. दचकून तिनं इकडंतिकडं पाहिलं. आई गाढ झोपली होती. बाबा तर मोठ्यानं घोरत होते – तोंडात वाघोबा बसल्यासारखे ! मग हा कसला बरं आवाज ? नक्कीच हा आवाज तोडणकरकाकांच्या घरून येत होता. अरे, काका एवढ्यात परत आले ? ते तर आठ दिवसांनी येणार होते. मग...? अरे हो ! सकाळचा तो मिशीवाला तर नसेल? नक्कीच ! उठवावं का आईला ? नकोच नाहीतर. उगाच सगळे आपली टिंगल करतील. त्यापेक्षा...
चंगूबंड्या अंथरुणावर उठून बसली. तिनं मनाशीच काही बेत ठरवला. आणि ती हळूच उठली. पाउल न वाजवता दारापर्यंत गेली. आवाज न करता तिनं कडी काढली आणि हळूच बाहेर पडली.

शेजारचं घर तर काकांचं. एकेक पाउल टाकत ती खिडकीशी आली. नक्की, आतूनच आवाज येत होता. ती तोल सावरत खिडकीवर चढली. गजाला धरून वर गेली आणि शटरच्या फटीतून तिनं आत पाहिलं. बाप रे ! आत एक माणूस कपाटाजवळ बसला होता आणि त्याच्यात भराभर काहीतरी भरत होता. चंगूबंड्याची भीतीनं गाळणच उडाली. तशी ती भित्री नव्हतीच मुळी. आणि आता तर मोठीही झाली होती. या वर्षीच आठ वर्षांची झाली म्हणून बाबांनी कराटेच्या क्लासलाही घातलं होतं तिला. तरीदेखील हे आतलं दृश्य बघून ती जाम घाबरली. आणि खिडकीतून खाली न उतरता तिनं थेट वरूनच दाणकन उडी मारली आणि घराकडे धूम ठोकत ओरडली, ‘चोर, चोर, चोर’ –
बाबा खडबडून उठले. त्यांनी चंगूबंड्याचा आवाज ओळखला. काठी उचलून ते दाराकडे धावले. दादानं पलंगाचा बार उचलला. शेजारचा सोनुमामा आला. अच्युतकाका आले. तेवढ्या रात्री दारापुढे हीs गर्दी जमली. कुणीतरी पोलिसांना फोन केला. पाचच मिनिटांत पोलिसांची गाडी आली. प्रश्न हा होता की, चोर आत गेलाच कसा? फ्लॅटला एकच दार. त्याला बहेरुन कुलूप. मग हा आत शिरला कसा?
पोलिसांनी चोरांना ताब्यात घेतलं. तोडणकरांच्या घरावर चार पोलिसांचा पहारा ठेवून पोलिसगाडी निघून गेली.
दुसरे दिवशी चंगूबंड्याचा शोध घेत पोलीस आले. बिल्डींगमधल्या लोकांनी इन्स्पेक्टरसाहेबांना गराडा घातला. प्रत्येकजण विचारत होता, ‘हा चोर आत शिरलाच कसा ?’ इन्स्पेक्टर हसून म्हणाले, ‘अहो, ही त्यांची नेहमीची ट्रिक आहे. कुणी गावाला गेलं की सगळी बातमी काढायची. ट्रकमधून असं मोठं कपाट आणायचं. ते नवं कोरं कपाट आत नेऊन ठेवायचं. आणि दुसरे दिवशी हा चुकीचा पत्ता होता असं सांगून ते कपाट घेऊन जायचं.’
‘अहो, पण त्यांनी चोराला आत कसं सोडलं ? कपाट आत ठेवताना वहिनी उभ्या होत्या ना तिथं. दोघेजण आले होते ते परत गेले. मग?’

इन्स्पेक्टर हसत म्हणाले, ‘बरोबर आहे. पण तिसरा आत कपाटात बसला होता ना ! रात्रभर त्यानं घरातल्या चीजवस्तू लुटायच्या, कपाटात नेऊन ठेवायच्या आणि आपणही कपाटात जाऊन बसायचं. दुसरेदिवशी साथीदारांनी येऊन ते कपाट घेऊन जायचं. असा त्यांचा बेत. पण आपल्या चंगूबंड्याच्या हुशारीमुळे चोर निसटू शकला नाही.
इतका वेळ हकीकत ऐकण्यात तल्लीन झालेली चंगूबंड्या समोर येत त्वेषानं म्हणाली, ‘बघा, बघा. मी सांगत नव्हते? तो मिशीवाला चोर आहे म्हणून ! तर सगळे मलाच हसले.’ इन्स्पेक्टरकाकांनी तिला जवळ घेऊन सांगितलं. ‘आम्ही तुला हसणार नाही हं! आम्ही ना, तुला मोठ्ठ बक्षीस देणार आहोत. मी तुलाच घेऊन जायला आलोय.’

चंगूबंड्या आत जाऊन छानसा फ्रॉक घालून आली. बक्षीस घ्यायला जायचं होतं ना तिला! दारातून बाहेर पडताना दादाकडे बघून वेडावून दाखवायला ती विसरली नाही. म्हणली, ‘अॅ हॅ रे ! काय पण हुशार !’ त्यावर इन्स्पेक्टर मोठ्ठ्याने हसले आणि ऐटीत चालणाऱ्या चंगूबंड्याला घेऊन गाडीत जाऊन बसले.

-       मा. गिरीजा कीर

No comments:

Post a Comment