Saturday 31 October 2015

रचनावादाची भूमिका

जीवन आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिक्षण जीवनानुसार असावे, असे म्हटले जाते. कारण, जीवन चांगले घडविणे हेच मुळी शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असते.

मानवी जीवन हे प्रवाही असते. ते दर पिढीगणिक बदलत जाते. आत्ताच्या २१व्या शतकात तर ते वेगाने बदलत जात आहे. शिक्षणाने जीवनाचा हा वेग पकडावा अशी शिक्षणाकडून अपेक्षा केली जाते, असे झाले तरच शिक्षण जीवनाला उपयोगी पडू शकेल. शिक्षणाने पुढील पिढीला नुसती जगण्याची दीक्षा द्यायची नसते तर जगताना, वेळोवेळी उगवत जाणाऱ्या समस्यांच्या त्वरित निवारणाची ताकदही द्यायची असते. शिक्षणाकडून या गोष्टी घेत असतानाच, जीवनाकडून शिक्षणाकडे जाण्याची वाट प्रत्येक पिढीसाठी मोकळी ठेवायची असते.

आज गरज निर्माण झाली आहे ती, गेल्या सात पिढ्या कुंठीत राहिलेल्या शिक्षणात अमुलाग्र बदल करण्याची. असे बदल करण्यासाठी, कधी नव्हे एवढी शास्त्रज्ञानाची नि तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध झाली आहे. विविध शास्त्रांतील संशोधनांनी, मूल निसर्गतः असते कसे, वाढते कसे, शिकते कसे, याची अधिक नेमकी समज आपल्याला दिली आहे. त्यामुळे या नव्या माहितीचा वापर करून, शिक्षणात, आजवरच्या प्रथेप्रमाणे ‘शिकविण्याच्या’ नव्हे तर, मुलांच्या ‘शिकण्या’च्या अंगाने विचार व्हावा ही नवी भूमिका शिक्षणशास्त्रज्ञ घेऊ लागले आहेत. शिक्षणात हा जो विचार प्रवाह आला आहे त्याला शिक्षणविषयक रचनात्मक दृष्टीकोण (Constructive Approach) असे म्हटले जाते. हा नवा ज्ञानरचनावाद समजावून घेताना, शिक्षणाच्या एका मुलभूत उद्दिष्टाचे उदाहरण घेऊन सुरवात करणे इष्ट ठरेल असे वाटते.

समस्या निवारणाची ताकद
शिक्षणाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे, ते विद्यार्थ्यांमध्ये समस्या निवारण्याची चिरंतन अशी ताकद निर्माण करणे. समस्या निवारण्याची ही ताकद, ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, अशी शक्ती शिक्षणाच्या आशयात व पद्धतीत असावी लागते. अशी शक्ती रचनात्मक शिक्षणात असते, असे आढळून आल्यामुळे, रचनात्मक शिक्षणाला आज सार्वत्रिक मान्यता मिळताना दिसून येते.

समस्या निवारण्याची प्रक्रिया ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. तिच्या प्रत्येक पायरीला वेगवेगळ्या मानवी क्षमतांची गरज असते. अशी विविध क्षमतांची तयारी करून देण्याचे काम शिक्षणाला – विशेषतः शालेय शिक्षणाला करून दयायचे असते.
समस्या निवारण्याच्या संभावित पायऱ्या व त्यासाठी लागणाऱ्या क्षमता पुढीलप्रमाणे असतात.
१.       प्रथमतः समस्या, प्रश्न जाणवणे. (संवेदनशीलता)
२.       ‘अशी समस्या आहे’ हे मानसिक स्तरावर स्वीकारणे. (धिटाई)
३.       समस्येचे नेमके स्वरूप आकळणे. (आकलनक्षमता)
४.       समस्येचे प्राधान्य, महत्व कळण्यासाठी त्याचे मूल्यमापन करता येणे. (मूल्यमापन)
५.       समस्या सोडवणुकीच्या पर्यायी मार्गांचा शोध घेता येणे. (शोधक्षमता)
६.       विशिष्ट परिस्थितीत योग्य पर्यायाची निवड करता येणे. (निवडक्षमता)
७.       निवडलेला पर्याय वापरण्याचे कौशल्य अंगी असणे. (कुशलता)
८.       समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेता येणे. (निर्णयक्षमता)
९.       निर्णयानुसार कृती करता येणे. (कृतीक्षमता)
१०.   समस्या सुटल्याची खात्री करता येणे. (विवेचकदृष्टी)

यांपैकी प्रत्येक पायरीसाठी काही ना काही क्षमता, ज्ञान, कौशल्य अशा गोष्टींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, समस्या जाणविण्याची संवेदनशीलता, समस्येचा स्वीकार करण्याची धिटाई, समस्येचे स्वरूप सर्वांगाने कळण्यासाठी लागणारी आकलनक्षमता, सारासार विचाराने समस्येचे मूल्यमापन करता येणे, समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या पर्यायी मार्गांचे ज्ञान, व त्यांचा शोध घेण्यासाठी लागणारी शोधक्षमता, पर्यायांची तुलनात्मक योग्यायोग्यता ठरविण्याची विश्लेषणक्षमता, प्रत्यक्षात विशिष्ट समस्या सोडविण्यासाठी लागणारी कौशल्ये, निवड व कृतीसाठी लागणारी निर्णयक्षमता, प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा व पात्रता आणि शेवटी, सुटलेल्या समस्येचीसुद्धा शहानिशा करण्याची विवेचक दृष्टी. या साऱ्या गोष्टी, प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीस मिळतील याची मोठी जबाबदारी शिक्षणाला घ्यायची असते.

यातील कोणत्याच गोष्टी, शिक्षकाने द्यायच्या आणि विद्यार्थ्याने घ्यायच्या या स्वरूपाच्या नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त माहिती देऊ शकतो, उदाहरणे देऊ शकतो, फार तर समस्येपर्यंत नेऊही शकतो पोहोचण्यासाठी तलावाची खोली, पोहण्यासाठी हातपाय मारण्याची पद्धती शिक्षक सांगू शकतो. थेट तलावापर्यंत नेउही शकतो. पण प्रत्यक्ष भीती, दडपण दूर करून आपली आपण उडी टाकण्याचे, हातपाय हलविण्याचे, नाका-तोंडात पाणी जाऊन जाणवणाऱ्या अस्वस्थेचे आणि असे करत करत पोहायला शिकण्याचे काम हे ज्याचे त्यालाच करावे लागते.  पोहण्याची ही सारी प्रक्रिया स्वानुभवाने पार करतच पोहायला शिकावे लागते. अशाप्रकारे पोहायला शिकण्याची ही सारी शिक्षणप्रक्रिया जशी मुळातच रचनात्मक शिक्षणप्रक्रिया असते, त्याचप्रमाणे कोणतीही शिकण्याची प्रक्रिया ही अशी मुळातच करून शिकण्याची प्रक्रिया असते, असं ‘रचनावादी’ शिक्षणपद्धतीचा दावा आहे.

समस्या निवारण्याच्या एखाद्या घटनेत, स्वतःच्या प्रयत्नांनी, विविध पायऱ्याना काय काय, कसे कसे घडते याची शहानिशा करीत जाऊन, विद्यार्थी यशस्वीरीत्या ही कामगिरी करू शकला तर त्याचे, यातूनच अर्थपूर्ण शिक्षण झाले असे म्हणता येईल. येथे विद्यार्थ्याने आपल्या उपलब्ध क्षमतांचा वापर करून समस्या निवारण केले आहे असे रचनात्मक दृष्टीकोण मानतो.

आपल्या असलेल्या पूर्वज्ञानाचा नि आत्मसात केलेल्या कौशल्यांचा वापर करून जेव्हा व्यक्ती आपल्या चालू प्रश्नांना भिडत असते, तेव्हा ती आपल्या परीने, आपल्या दृष्टीकोणातून समोर येणाऱ्या घटनांचा, कल्पनांचा अर्थ लावीत असते. वेगवेगळ्या घटकांत आणि आपल्या अगोदरच्या अनुभवांत परस्परसंबंध बांधीत जाते, म्हणजेच आपल्या ज्ञानाची नवी रचना करीत जाते, असे रचनावादी विचारसरणीचे प्रतिपादन आहे.
मा. रमेश पानसे

‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकातून साभार

No comments:

Post a Comment