Saturday 31 October 2015

उल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव

कुमार निर्माणच्या सक्षम गटाची नियमित बैठक होते. गांशी जयंतीला २ ऑक्टोबर रोजी गटातील काही मुलांनी स्वच्छता करायची असे ठरवले. ठरल्याप्रमाणे मुले जमली, स्वच्छता करू लागली. त्यावेळी तिथे इतर दोन मोठी माणसे आली. त्यांनी मुलांना विचारले की तुम्ही काय करत आहात? मुलांनी सांगितल्यानंतर त्य दोन्ही माणसांनी मुलांसोबत स्वच्छता केली. अचानक गटातील काही मुलांच्या मनात विचार आला की आपण एक दिवस स्वच्छता केली तर इतका कंटाळा आला तर जी माणसं दररोज स्वच्छता करतात त्याचं काय होत असेल. मग यावर मुलांनी 

काय करता येईल असा विचार केला आणि त्यातून त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली.
मुलांनी ठरविले की या सर्व कामगारांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानूया. ठरल्यानंतर मुलांनी पुष्पगुच्छ विकत न घेता तिथल्याच बागेतील फुलांचा उपयोग करून पुष्पगुच्छ बनवले आणि ते घेऊन मुले वस्तीत गेली. मुलांना सुरवातीला असा अनुभव आला की त्या कामगार कुटुंबांनी ते पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला. परंतु गटातील मुलांनी कामगारांच्या मुलांशी ओळख केली व त्यांच्या आई-वडिलांना सांगितले की तुम्ही वर्षभर संपूर्ण शहर स्वच्छ ठेवतात म्हणून आम्हाला खरंच तुमच्या कुटुंबाचे आभार मानायचे आहेत. नंतर मात्र तेथील सर्व कुटुंबांनी गटातील मुलांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आणि मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
गटातील काही मुलांनी स्वच्छता कर्मचार्यांच्या घराचे निरीक्षण केले. मुलांचे निरीक्षण असे होते की ही सर्व कुटुंबे दिवसभर कचऱ्यात काम करूनही त्यांची घरे मात्र स्वच्छ होती.
मुलांना या कृतीनंतर फार आनंद झाला तसेच कर्मचार्यांच्या मुलांशी त्यांची ओळखही झाली.
सक्षम गट, इंदापूर

निमंत्रक – तुषार रंजणकर (७०५७६३३५५५)

No comments:

Post a Comment