Wednesday, 1 March 2017

उल्लेखनीय कृती कार्यक्रम

 ‘धुम्रपान आणि तंबाखू निषेध फेरी’ - डोअर स्टेप स्कूल गट, पुणे
कुमार निर्माणच्या गणेशमळा, पुणे येथील संघाने धुम्रपान व तंबाखूचा निषेध करण्यासाठी व त्या बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी परिसरातून जनजागरण फेरी काढली.
कुमार निर्माणच्या बैठकीत या गटाच्या निमंत्रक सीमा ताईंनी सांगितलं की परिसराचं निरीक्षण करा आणि काय करता येईल याचा विचार करा. मुलांच्या डोक्यात काय करूया हा विचार सुरु होता. तेव्हा गटातील महेशने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत लोकांना तंबाखू व धूम्रपानाचा निषेध करण्यासाठी फेरी काढताना बघितलं आणि त्याला वाटलं की तंबाखू आणि धुम्रपान हा प्रश्न तर आपल्या परिसरात देखील आहे मग आपण देखील त्यांच्या प्रमाणे जनजागरण फेरी काढू शकतो. त्याने ही कल्पना गटात मांडली. गटातील इतरांनाही ही समस्या जाणवलेली होती म्हणून सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि अशी फेरी काढायची हे त्यांच्या बैठकीत नक्की झालं.
पण फेरी काढायची तर पहिले आपण अभ्यास केला पाहिजे हे त्यांना जाणवलं आणि सगळी मुलं या मोहिमेच्या तयारीत लागली. अभ्यासासाठी म्हणून त्यांनी इंटरनेटवर जाऊन माहिती काढली, शिक्षकांची, ताईंची मदत घेतली, पुस्तकातून माहिती काढली. अजून माहिती मिळवण्यासाठी ही मुलं परिसरातील एका डॉक्टरांना देखील जाऊन भेटली. तंबाखू आणि धुम्रपानामुळे होणारे आजार, शरीराचं होणारं नुकसान, त्यामागील कारणं अशी सगळी माहिती मुलांनी या माध्यमातून मिळाली.
दरम्यान गटातील एका मुलाचे वडील देखील सिगारेट प्यायचे हे त्या मुलाला खटकायचं. एक दिवस या मुलाने त्यांना सिगारेटचे दुष्परिणाम सांगितले. तेव्हा त्याच्या वडिलांनी सिगारेटचं खोकं चुलीच्या जाळामध्ये फेकून दिलं.
ही मुलं प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी परिसरातील दुकानं आणि पानटपऱ्यांवर देखील जाऊन बघू लागली आणि त्या सोबतच तेथे सिगारेट पिणाऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. एका मुलाला जेव्हा या मुलांनी सागितलं की सिगारेट प्यायला नाही पाहिजे तेव्हा त्या सिगारेट पिणाऱ्या मुलाने सिगारेट खाली टाकली आणि पायाखाली चुरगाळली. तर दुसऱ्या एका प्रसंगात या मुलांनी एका वयस्क व्यक्तीला तसंच समजावलं तेव्हा मुलं होती तोवर त्यांनी सिगारेट खाली केली आणि मुलं थोडी दूर जाताच पुन्हा सिगारेट ओढायला सुरुवात केली.
फेरी मध्ये आपल्या शाळेतील इतर मुलांना सहभागी करून घ्यावं असं गटातील मुलांना वाटत होतं पण त्यांनी शाळेत या बद्दल विचारणा केली तेव्हा फारसं सकारात्मक उत्तर त्यांना मिळालं नाही. यावर मग डोअर स्टेप स्कूलच्या इतर ठिकाणच्या गटांना यात सहभागी करून घेऊया असं सीमा ताईंनी मुलांना सुचवलं त्यामुळे मुलांना अजून हुरूप आला.
हे सगळं होत असताना मुलं गटाच्या बैठकीत कुणाला काय काय अनुभव आले यावर चर्चा करत होती आणि त्यानुसार पुढील दिशा ठरवत होती. फेरीसाठी मुलांनी घोषणा आणि पोस्टर्स बनवायचे ठरवले. त्याच्यासाठी करायच्या कामांची जबाबदारी आपापसात वाटून घेतली. इंटरनेटच्या मदतीने काही घोषणा शोधल्या त्याचे फलक बनवले ते हातात पकडता यावे यासाठी त्यांना पाठीमागून काठ्या लावल्या. दारूच्या बाटलीचे आणि सिगारेटचे चित्र काढले आणि त्यावर बंदीची खून केली. फेरीसाठीच्या  मार्गाचा नकाशा काढला. नकाशा तयार करताना मुलांच्या लक्षात आलं की एके ठिकाणी त्यांची फेरी मोठ्या रस्त्यावरून जाणार आहे आणि त्यांना एक सिग्नल देखील लागणार आहे. तेव्हा मुलं त्या सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसांना जाऊन भेटले आणि सहकार्याची विनंती केली. पोलिसांनी देखील मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुलांनी आणि ताईंनी मिळून या फेरीसाठी एक दिवस निश्चित केला. पण गटातील एक मुलाला फेरीसाठी येणं शक्य होत नसल्याने ही तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत होती. खूप उशीर होत असल्याने आणि नंतर पुढे परीक्षा पण येत असल्याने मुलांनी तो नसताना फेरी काढायची ठरवलं. मुलांनी सीमा ताईंच्या मदतीने सगळं नियोजन अगदी चोख केलं होतं. १८ मार्च ला सकाळी १०:३० वाजता मुलांनी फेरीला सुरवात केली साधारण अर्धा तास चालल्या नंतर डोअर स्टेप स्कूलच्या दत्तावाडी येथील सेंटरवर फेरीची सांगता झाली. फेरी मध्ये मुला-मुलींच्या हातात घोषणांचे आणि चित्रांचे फलक होते.  सगळे मोठ्याने घोषणा देत होते.

सेंटरवर आल्यावर सर्वांनी आपापली ओळख करून दिली. सर्वांनी कचोरी खाल्ली आणि तिथून मुलं-मुली एक नवीन अनुभव घेऊन घरी परतली.No comments:

Post a Comment