Monday 30 November 2015

बोलकी पुस्तके - तोत्तोचान

एक अतिशय दंगा करणारी, त्रास देणारी, खोडकर मुलगी नुकतीच शाळेत जाऊ लागलेली असते. तिच नाव असतं तोत्तोचान. पण काहीच दिवसांत तिच्या आईला शाळेत बोलावून घेतात व सांगतात की तुमची मुलगी फार दंगा करते, त्रास देते. तिच्यामुळे इतर मुलांनाही शिकण्याला त्रास होतो, तुम्ही हिला इथून घेऊन जा व दुसऱ्या शाळेत टाका.

तोतोचानची आई तिला काहींही सांगत नाही. व तोतोचानला तिएका जगावेगळ्या शाळेत टाकते. त्या शाळेच नाव असतं तोमोई. (तोमोई हे एक स्वल्पविरामासारखं प्रतीकात्मक चिन्ह आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेसाठी दोन तोमोई असलेलं प्रतिक तयार केलं होतं. एक काळं आणि दुसरं पांढरं. अशी दोन तोमोई मिळून तयार होतं ‘संपूर्ण वर्तुळ’. यातून त्यांचं मुलांविषयीचं ध्येय सूचित होत होतं – शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास). 

तिच्या आईला खरंतर प्रश्न असतो की आपली मुलगी या शाळेत तरी टिकेल की नाही ? हिचं पुढे कस होणार ? पण तोत्तोचान या शाळेत रमते. शाळा तिला खूप आवडू लागते. रोज शाळेतून घरी आल्यावर ती आपल्या आईला शाळेतील गमती जमती सांगते. शाळेत जाऊन बरेच दिवस झाल्यावर सुद्धा तिच्याकडे सांगायला नवीन काही तरी असतंच.

 या शाळेच सगळच वेगळं असतं. या शाळेचे वर्ग म्हणजे रेल्वेचे डब्बे असतात. शिक्षक मुलांना रागवत नाहीत, बसायच्या जागा ठरलेल्या नसतात, मुलांना खेळायला मोकळीक असते. मुले एकमेकांत जास्त कसे मिसळतील याचा विचार केलेला असतो. फक्त आणि फक्त शिस्तीचा बागुलबुवा नसतो, तरीही मुलं शिस्तीने वागतात.

तर एका शाळेतून काढून टाकलेल्या तोत्तोचानचा या शाळेतील वर्गात म्हणजेच रेल्वेच्या डब्ब्यात बसून आयुष्याचा प्रवास सुरु होतो.

या शाळेत शाळा सुटण्याच्या टोलावर मुलांना घरी जाण्याची घाई नसते पण सकाळी उठून शाळेत येण्याची घाई मात्र नक्की असते. या शाळेत मुख्याध्यापक मुलांना सगळ्यात मळलेले कपडे घालून या असे सांगतात. त्यामुळे मुले कपडे खराब होतील ही भीती न बाळगता खेळू बागडू शकत. बाकीच्या शाळांमध्ये जिथे शिक्षकांना मुले घाबरून असत तिथेच या शाळेत मात्र शिक्षक मुलांना आपले मित्र वाटत. शिक्षकही मुलांसोबत खेळत. या शाळेत तोत्तोचान खेळता खेळता शिकू लागते.

‘तू खरोखर खूप चांगली मुलगी आहेस’ असं तिचे मुख्याध्यापक तिला नेहमी म्हणायचे. आणि या वाक्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत असतो.

या मुलीची, तिच्या या जगावेगळ्या शाळेची आणि त्या शाळेतील तिच्या आवडत्या मुख्याध्यापकांची गोष्ट या पुस्तकात आहे. या शाळेत मुलांना केंद्र स्थानी ठेऊन केलेले प्रयोग, शिकण्याची सहज पद्धती, रेल्वेच्या डब्ब्यातील वर्ग, सहली, शिबीरं, खेळ या सगळ्याची मजेशीर गोष्ट म्हणजे हे पुस्तक. तोतोचान चे मित्र,त्यांच प्रत्येकाचं वेगळेपण आणि तरीही एकत्र राहण्याची गोष्ट आणि बरंच काही या पुस्तकात आहे.


या पुस्तकाचा मुलं, निमंत्रक व  पालक या सगळ्यांनाच नक्की उपयोग होईल. तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा.

No comments:

Post a Comment