Monday 31 August 2015

विवेक काकांशी गप्पा

मार्गदर्शकांशी गप्पा

‘कुमार निर्माण’ वार्षिक संमेलन - सप्टेंबर २०१४ मध्ये MKCL चे व्यवस्थापकीय संचालक व कुमार निर्माण चे मार्गदर्शक मा. श्री. विवेक सावंत यांनी सहभागी गटांतील मुलांशी साधलेला प्रत्यक्ष संवादातील काही भाग.

 “बालमित्रांनो,
मी जेव्हा तुमच्याएवढा होतो, तेव्हा माझे एक शिक्षक होते, खूप छान शिक्षक! आज हि त्यांच्या सोबत माझे घनिष्ट संबंध आहेत. माझ्या हातून काही चांगलं घडलं की ते त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. शाळेत त्यांनी मला स्काउटींग ची सवय लावली, त्या मधून आम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. ते स्वतः एक उत्कृष्ट चित्रकारही आहेत. ते आम्हाला नाशिकच्या आजूबाजूच्या जंगलात घेऊन फिरायचे आणि आम्ही निरनिराळ्या वस्तूंचा संग्रह करायचो. आणि ते आम्ही शाळेमध्ये ठेवायचो. एके दिवशी आमच्या शाळेत पु. ल. देशपांडे आलेले, आणि त्यांनी तो संग्रह बघितला. त्यांना आम्ही सगळी माहिती दिली, अगदी छोटी-छोटी माहितीही सांगितली. ते आम्ही कसं जमवल, सरांनी आम्हाला कसं मार्गदर्शन केल ई. आणि हे ऐकून ते एवढे खुश झाले की त्यांनी आमच्या शाळेला काचेची कपाट भेट म्हणून दिली. आम्ही त्या वस्तू काचेच्या कपाटात ठेऊन कोणी पाहुणे आले कि त्यांना दाखवायचो.
            स्काऊट मध्ये असताना, सरांनी आम्हाला एके दिवशी सांगितल की आपल्याहून गरीब मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला असं विचारल की तुमच्या वर्गामधून कोण कोण असे मुलं आहेत कि ज्यांना घालायला चपला नाहीत ते तुम्ही शोधून काढा आणि ज्यांच्या कडे दोन किवा तीन चपलांचे जोड असतील त्यांनी चपला नसलेल्या मुलांना ते जोड द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्यांकडे चपला होत्या. त्यातून आम्हाला एक छोटीशी गोष्ट समजली की आपल्या कडे सगळ्या गोष्टींचा संग्रह न करता त्या दुसर्यांना पण वाटल्या पाहिजेत. परत एके दिवशी सर म्हणाले की अजून त्यापेक्षाही गरीब मुलं आहेत तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो. त्यांच्याकडे तर कपडे पण नाही आहेत. मग आम्ही मुलांनी सांगितलं की आम्ही आपल्या घरातून कपडे आणून त्यांना देऊ शकतो. आम्ही घरी आईला सांगू आणि पैसे घेऊ आणि सरांकडे आणून देऊ. तर सर म्हणाले की हे मला मुळीच मान्य नाही, तुम्ही स्वतः ते पैसे कमावले पाहिजेत आणि मग तुम्ही त्यांना कपड्यांसाठी दिले पाहिजे. मग आम्ही म्हणालो सर ठीक आहे मग तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही काय करायच ते. सरांनी सुचवल की “श्रमदान“ करा.
मग आम्ही अनेक प्रकारचे श्रमदान केले पण सगळ्यात आम्हांला अपयश आले. श्रम तर झाले पण पैसे काही मिळेनात. मग आम्ही एक शक्कल लढवली. ती अशी कि आमच्या इथे नाशिकला कालिकेची जत्रा भरायची, तर त्या जत्रे मध्ये आपण लोकांच्या चपला सांभाळायच्या. आमच्या कडे तंबू होता, तो आम्ही उभारला आणि तिथे येणाऱ्या भक्तांना आम्ही म्हणायचो कि “काका/काकू तुम्ही आम्हाला पाच पैसे द्या त्याबदल्यात आम्ही तुमच्या चपला सभाळतो”, त्या वेळेला पाच पैश्याच नाणं असायचं. मग पाच पैसे घेऊन आम्ही चपला सांभाळायचो, मग दिवसभर असं करत करत पहिल्या दिवशी आम्ही पाच पैशांचा हे मोठा ढीग सरांच्या कडे नेऊन दिला, आणि तो देताना आमची छाती अशी गर्वाने फुगुन आली. मग सर म्हणाले हे आता जत्रेत आठही दिवस करायचं. दुसरयाच दिवशी आम्हाला कळलं की हे खूपच अवघड काम आहे. गर्दी वाढत गेली, दुकाने लागत गेली, दुकानवाले लोकांना म्हणायचे की आमच्या कडून तुम्ही सामान विकत घ्या आणि आम्ही तुमच्या चपला फुकटात सांभाळतो. आम्हाला वाटलं की आमचा हा मार्ग बंद होतो कि काय. मग आम्ही काय केलं की त्या दुकानाच्या अगोदर जाऊन उभे राहिलो, आम्ही लोकांना सांगायचो चपला आमच्या कडे ठेवा, फुल-नारळ कुठून पण घ्या. काही आजी-आजोबा आमचं कौतुक करण्यासाठी आमच्याकडे चपला ठेवायचे. हे आम्ही सरांना सांगितल तर सर म्हणाले अस उपकार करून नाही घ्यायचे, तुम्ही डोकं चालवा, आणि अस काहीतरी करा कि त्यांना तुमच्याकडे चपला ठेवाव्याच लागतील. कारण तुम्हाला ज्यांना मदत करायची आहे, ती इतरांनी तुमच्यावर केलेले उपकार नसावे. आम्ही अक्षरशः बेजार झालो, आम्ही फक्त सातवी आठवीतले मुलं, अजून काय करणार. मग, माझ्या डोक्यात एक कल्पना आली, कुठून तरी इकडून तिकडून पॅालिश आणि ब्रश, फडके आणले, मग आम्ही काका-मावशींना सांगायचो तुम्ही आमच्याकडे चपला ठेवल्या तर आम्ही चपलाना पॅालिश करून देऊ. फुकट पॅालिश करून भेटतय म्हटल्यावर सर्व खुश, मग गर्दी जमायला लागली. दुसऱ्या दिवशी सरांना आम्ही दोन डब्बे भरून पैसे दिले. आम्ही प्रचंड खुश!
            पुढच्या दिवशी धो-धो पाऊस पडू लागला, आम्हाला वाटलं आत्ता काय होतंय आपल काम, पण मग आम्ही नवीन उद्योग चालू केला, छत्र्या गोळा केल्या आणि लोकांना म्हणालो तुम्ही आमच्या कडे चपला ठेवा आणि हि छत्री घेऊन जा अन दर्शन घेऊन या. मग काय, त्या दिवशी तीन डब्बे भरून पैसे. पण आमचे सर कशाला ऐकताय.. सराना कळलं की ज्या अर्थी आम्हाला जमतंय म्हणजे हे काम सोपं दिसतंय. सर म्हणाले ज्या नगरपालिकेच्या मुलांना तुम्ही मदत करणार आहात त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर उपकार करताय. त्यांना तस वाटू नये म्हणून काहीतरी करा. मग त्या मुलांशी आम्ही बोललो तर त्याच मुलांनी आम्हाला निरनिराळे मार्ग सुचवले. मग ते आणि आम्ही असे दोन्ही गट मिळून ‘खरी कमाई’ च्या मागे लागलो. मग आम्ही लोकांच्या घरी जायचो, सगळी भांडी साफ करून द्यायची, झाडून लोटून द्यायचं, पण त्यातल्या काही काकू आमच्या कडून हे भलं मोठ काम करून घायच्या आणि थोडेसेच पैसे द्यायच्या तरी आम्ही त्या कार्डावर त्यांची सही घ्यायचो, कारण सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ते जेवढे देतील तेवढेच घ्यायचे. पण त्यामुळे नीरनिराळ्या घरांमध्ये जाण्याचा योग आला. नीरनिराळ्या जागा आम्ही स्वच्छ केल्या, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग होते, त्यात आम्ही हात घालायचो, आम्हाला पहिल्यांदा खूप घाण वाटायची, पण सरांनी आम्हाला सांगितले कि हात नंतर स्वच्छ धुवायचे पण आधी कचरा साफ करायचा. नंतर तर आम्ही गाणी तयार केली, आम्ही आणि सर ती गाणी म्हणत-म्हणत सर्व काम करायचो.

            हे सगळ करताना आम्हाला असा लक्षात आलं की ही कामं करताना किती ‘चांगल’ वाटत होत आणि ही कामं तर आपली आई दररोज करत असते आणि आपण मात्र कधीच ही कामे आपल्या घरी करत नाही. त्यानंतर मला स्वत:ला माझ्या आचरणामध्ये खूप बदल जाणवून आला. मोठा झाल्यावर ज्यावेळेला आपली संस्था (MKCL) चालू केली त्या वेळी माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे सकाळी मीच माझ्या ऑफिस मध्ये झाडू मारायचो आणि मग लॅपटॉप उघडून बसायचो. तेव्हा ते सगळ साफ करताना मला काहीच नाही वाटायच, नाहीतर माझा अहंकार जागृत झाला असता. त्यामुळे मला सगळीच कामं मनापासून करायची सवय लागली.”

No comments:

Post a Comment