Monday, 31 August 2015

बोलकी पुस्तके

(आचार्य विनोबा भावे यांच्या ‘शिक्षण-विचार’ या पुस्तकातील एक उतारा)

विद्यार्थ्यांशी माझी एकरूपता

विद्यार्थ्यांची संख्या ज्या सभेत जास्त असते ती सभा अत्यंत शांत असते, असे मी पहिले आहे. विद्यार्थ्यांचा मला जो अनुभव आला आहे तो अदभूत आहे. विद्यार्थ्यांविषयी माझ्या मनात फार प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांच्या समोर बोलताना त्यांच्याशी अगदी एकरूप होऊन बोलतो. मी दुसरा कोणीही असलो तरीही प्रथमतः विद्यार्थी आहे हे मी जाहीर करू इच्छितो. माझे अध्ययन अजूनही चालू आहे. एक उदाहरण सहज देतो आमच्या पदयात्रेतही रोज एक तास देऊन मी जपानी भाषेचे अध्ययन केले. वय वाढले म्हणून अभ्यासासाठी लागणारी स्मरणशक्ती कमी होते असा अनुभव मला नाही. उलटपक्षी माझे शरीर जसेजसे क्षीण होत चालले आहे, तसतशी माझी स्मरणशक्ती अधिक तीव्र होत चालली आहे. लहानपणी श्लोक पाठ करण्यास दहादा म्हणावा लागत होता तो आज दोनदा म्हणून पाठ होतो. त्याचे कारण, माझे अध्ययन चालूच राहिले असे आहे. बुद्ध भगवानांनी म्हणले आहे की रोज स्नान केल्याने जसे शरीर स्वच्छ होते, किंवा रोज झाडल्याने ज्याप्रमाणे घर स्वच्छ राहते, त्याप्रमाणे रोज अध्ययन केले तर मन स्वच्छ होते व राहते. रोज स्नान केले नाही तर शरीर अस्वच्छ होईल. त्याच न्यायाने रोज अध्ययन न केले तर मन स्वच्छ राहणार नाही. ह्या कथनानुसार माझा अभ्यास निरंतर चालू राहिला, व मला उमेद आहे की ज्या दिवशी परमेश्वर मला उचलून नेईल त्या दिवशी ही मी अध्ययन करूनच गेलेला असेन. ह्या अध्ययनशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या हृदयाशी एकरूप होण्याचा अनुभव मला सहजच येतो. 

No comments:

Post a Comment