Thursday 31 August 2017

गणेशोत्सव आणि आपण

प्रिय मित्रांनो,
खूप उत्साहाचं वातावरण असेल ना घरी आणि परिसरात देखील? सध्या सणांचे दिवस आहेत. काही दिवस तरी एका मागोमाग एक सण आहेत आणि लवकरच गणपती देखील येत आहेत. गणपतीत आपण खूप मज्जा, धमाल करतो. घरी कायकाय बनवतात खायला, मोदक असतात, रोषणाई केलेली असते, गल्लीत किंवा गावात सार्वजनिक गणपती देखील असतो, मित्रांच्या घरचे गणपती आणि इतर सार्वजनिक गणपतीसमोरची आरास बघायला देखील काय धम्माल असते नाही? तर यावेळी आपण बैठकीत गणपती आणि गणेशोत्सव याबद्दल चर्चा करूया.

काय काय असतं गणपतीत त्याची एक आकृती आम्ही काढलीय. तुम्ही तुम्हाला सुचेल तशी या प्रकारची आकृती काढू शकता. त्या सोबतच आम्ही काढलेल्या आकृतीला अजून फाटे फोडू शकता जसं की मूर्तीला पुढे प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीची असे दोन फाटे फोडता येतील. तसेच तुम्ही इतर गोष्टींसाठी करू शकाल. बघा बर प्रयत्न करून! या गोष्टींचे परिसरावर होणारे परिणाम यावर देखील त्या गोष्टीला फाटे फोडता येतील. जसं डीजेला मज्जा, डान्स, त्रास, ध्वनिप्रदूषण असे फाटे फोडता येतील. हे देखील बैठकीत करून बघा.


या सोबतच या सणाचे बदलते स्वरूप यावर देखील चर्चा करा. आपल्या आज्जी-आजोबांच्या काळात गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जायचा मग आपल्या आई-वडिलांच्या काळापर्यंत त्यात काय बदल झाले आणि आता आपण हा गणेशोत्सव कसा साजरा करतो याविषयी माहिती जमा करा, त्यावर चर्चा करा. सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु झाला. तो कुणी व का सुरु केला. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा त्यांचा हेतू आत्ताच्या गणेशोत्सवातून पूर्ण होतोय का? आताच्या गणेशोत्सवातील चांगल्या गोष्टी कोण-कोणत्या आहेत ज्यात बदलाची गरज आहे.

मग या सगळ्यात कुमार निर्माणचा गट म्हणून आपली काय भूमिका असावी यावर देखील चर्चा करा. मित्र-मैत्रिणींनो येणारा प्रत्येक सण आपल्यासाठी एक संधी घेऊन येतो. काहीतरी चांगलं काम करण्याची. तर या संधीचा लाभ घेऊया. नेहमीप्रमाणे तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा.
वाट बघत आहोत...
तुमचे
प्रफुल्ल, प्रणाली, शैलेश

No comments:

Post a Comment