Thursday, 31 August 2017

गोष्ट

शिक्षणाचे जादुई बेट!


मित्रांनो, चला आपण एका वैज्ञानिक शिक्षणाच्या जादुई बेटाची गोष्ट ऐकुया...


तुम्ही म्हणाल, प्रत्येक शाळेतून विज्ञानाचे धडे दिले जातातच की! पण ही शाळा सर्व शाळांपेक्षा काही औरच आहे. आपल्या कुमार निर्माणचे मार्गदर्शक डॉ. अभय बंग ज्या शाळेत शिकलेत त्या शाळेची ही खरीखुरी गोष्ट आहे.
त्यांचं ९वी पर्यंतचं शिक्षण गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातील ‘नई तालीम’ (पायाभूत शिक्षण) शिक्षण पद्धतीत झालं.  निसर्गासोबत राहून समाजोपयोगी कामे करताना मुले योग्य संस्कार, बुद्धीचा विकास व कौशल्य ग्रहण करतात, यावर या गांधीजी-प्रणीत नई तालीम शिक्षण पद्धतीचा दृढ विश्वास होता. या प्रयोगात रवींद्रनाथ टागोरांनीही हातभार लावला. या शाळेने शिक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले.

असं शिकलो वनस्पतीशास्त्र
वनस्पतीशास्त्र हे बहुतेक शाळांमध्ये पुस्तकातील आकृत्या किंवा काचेच्या बरणीत बंदिस्त केलेले जिवंत नमुने यांवरून शिकवतात. नई तालीम विद्यालयाभोवताली शेती व बगीच्यांमध्ये विविध प्रकारची झाडं होती. आमचे शिक्षक आम्हाला घेऊन प्रथम नुसते या आसमंतात भटकायचे. दिसणाऱ्या झाडांची नावं सांगायचे आणि त्यांची पानं, फुलं, फळं दाखवायचे. सोबत बोरं, आवळे, करवंद व कैऱ्या तोडून खाणंदेखील सुरु असायचं. ती खाताना त्या फलप्रकाराची वैशिष्ट्यं काय ते आम्ही टिपून ठेवायचो. बागेतील या रोजच्या फेरफटक्यानं आम्हाला निसर्गाच्या आणखी जवळ आणलं.
सातव्या इयत्तेत परीक्षेच्या वेळेला आम्हाला विविध (वाळवलेल्या) वनस्पतींचा, पानाफुलांचा संग्रह तयार करायला सांगितलं होतं. यासाठी आम्ही आसपासच्या जागा शोधल्या. आज ४० वर्षांनंतरही कोणत्या प्रकारच्या वनस्पती कुठे आहेत हे मला स्पष्टपणे आठवतं. या सगळ्याचा एक गमतीदार परिणाम असा झाला, की पुढे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकताना मला फार झगडावं लागलं नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मी वनस्पतीशास्त्रात पहिला आलो. याब्बदल जेव्हा माझे शिक्षक वर्गात माझं कौतुक करत होते, तेव्हा मी मनात म्हणालो, हे तर मी कॉलेजात नव्हे, तर माझ्या सेवाग्राममधील शाळेत शिकलो!

जीवनाशी संबंध असलेले गणित
एका हौदाला २ तोट्या आहेत. एकाने पाणी येते, दुसरीने गळून जाते तर किती वेळात हौद रिकामा होईल? अशा प्रकारची गणितं वाचताना नेहमी प्रश्न पडतो की गणित शिकवण्याचा संबंध जीवनाशी जोडताच येणार नाही का? शहाणा माणूस हा वेळेचा हिशेब करण्याऐवजी ती गळकी तोटी बंद करेल व प्रश्न सोडवेल. नयी तालीम विद्यालयात मी ‘घन’ (व्याप)ची कल्पना व गणित कसं शिकलो याचं उदाहरण देतो.
दररोज सकाळी ३ तास उत्पादक काम हा तेथील शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. गांधीजींचा स्वकष्टाची भाकरीचा आग्रह तर त्यामागे होताच पण सोबतच शिक्षणातून समाजोपयोगी कौशल्य व विज्ञान-शिक्षण प्राप्त करणे ही विनोबांची दृष्टीही त्यामागे होती. याप्रमाणे मी काही दिवस गोशाळेत काम करण्यास जात होतो. नवी गोशाळा बांधणं सुरु होतं. माझ्या शिक्षकांनी मला जबाबदारी दिली की एक गाय दररोज सरासरी किती बादल्या पाणी पिते हे मोजून गोशाळेतील गायींच्या पिण्याच्या पाण्याची एकूण गरज व तेवढे पाणी मावू शकेल अशा टाक्याचे माप ठरवावे, त्या टाक्याच्या भिंतींना किती विटा लागतील याचा हिशोब करून विटा बोलवाव्या. हे गणित व काम मला आठवडाभर पुरलं. घनतेची कल्पना व विविध आकाराचे घनमाप कसे काढावे. (बादली ही निमुळता दंडगोल, हौद हा घन तर त्यांच्या भिंती हे घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ) या गणिती पद्धती मी यातून शिकलो.

स्वयंपाकातून शिक्षण
कामातून विज्ञान अशा शिक्षणाचं दुसरं उदाहरण म्हणजे आमची स्वयंपाकाची जबाबदारी. शाळेच्या रसोईघरांत जवळपास १०० माणसे जेवीत. स्वयंपाकाची जबाबदारी पाळी-पाळीने ८ जणांच्या टोळीवर येई. या टोळीला स्वयंपाकासाठी प्रतिमाणसी किती रुपयांचे बजेट उपलब्ध आहे हे सांगण्यात येई. आहारशास्त्राच्या दृष्टीने संतुलित, सर्वांना आवडणारे पण उपलब्ध बजेटमध्ये बसणाऱ्या जेवणाची आठवड्याभराची योजना बनवताना आमची धांदल उडे. बटाट्याची भाजी स्वस्त पडे पण त्यात आहाराचे तत्त्व कोणते हे पुस्तकात पाहिल्यावर फक्त स्टार्च आहे हे कळल्यावर ती बाद होई. किमान आवश्यक तैल पदार्थ किती हे आय.सी.एम.आर. च्या पोषण विषयक तक्त्यांवरून पाहून तेवढे तेल टाकले तर ते बजेटच्या बाहेर जाई. कुशल गृहिणीला अनुभवाने असलेले शहाणपण आम्हाला नसल्याने आहारशास्त्र व अर्थशास्त्राची सांगड घालून बनवलेली आमची जेवणाची योजना बरेचदा पुस्तकी होई. शिवाय डाळ शिजायला लागणारा वेळ व सरपणाचा हिशोब हमखास चुके. मग रात्रीच्या स्वयंपाकाची भांडी घासता घासता आज हरलेल्या लढाईचे जखमी सैनिक उद्याच्या स्वयंपाकाची पुनर्आखणी करत. यातून आहारशास्त्र, घरगुती अर्थशास्त्र व स्वयंपाक ही तीन शास्त्रे आम्ही शिकलो. कोथिंबीरीमध्ये १०६०० युनिट्स ‘अ’ जीवनसत्व आहे हे आजही जे माझ्या लक्षात आहे ते पुणे मेडिकल कॉलेजमध्ये १० वर्ष शिकल्यामुळे नाही तर ८वीत स्वयंपाकघरात या पद्धतीने काम केल्यामुळे आहे. शिवाय कुकरमधील उष्णतेचे व वाफेचे पदार्थ विज्ञानही आम्ही शाळेच्या स्वयंपाकघरातच शिकलो.
तर मित्रांनो, शाळेतील अभ्यासासोबतच निसर्गात जाऊन अशा नाविन्यपूर्ण वैज्ञानिक पद्धतीनेही शिक्षण घेता येतं तर!
‘शिक्षणाचे जादुई बेट’ या डॉ. अभय बंग यांच्या पुस्तकातून साभार
  

No comments:

Post a Comment