Thursday 31 August 2017

संवादकीय

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो....

तुम्ही सर्व मजेत असाल अशी अपेक्षा करतो!

आम्हीदेखील मजेत आहोत. पुण्यात त्या मानाने पाऊस चांगला आहे. पण बाकीकडे पाऊस अगदीच कमी आहे. वातावरण प्रसन्न असलं तरी पाऊस काही पडत नाहीये. ऊन- सावलीचा खेळ मात्र सर्वत्र सुरु आहे.

असे आपण सर्वे मजेत असताना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यातील ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने ६० बालके मृत्यू पावली. या निष्पाप जीवांना आपणा सर्वांकडून आदरांजली.

नुकतीच आम्ही निमंत्रकांसाठी दोन शिबिरं आयोजित केली होती. एक शिबीर पुणे येथे झालं तर दुसरं जळगाव येथे. शिबिरांना खूप मज्जा आली. आम्ही गाणी म्हटली, चित्र काढली, गप्पा मारल्या, एक-दुसऱ्याला नवीन गोष्टी रचून सांगितल्या आणि सगळे मिळून खूप काही नवीन शिकलो.

तुमच्या शाळा सुरु होऊन एव्हाना बरेच दिवस झालेले आहेत. तुम्ही शाळेत रुळला असाल. नवीन मित्र झाले असतील. कुमार निर्माणच्या बैठका देखील तुम्ही आता नियमित सुरु केल्या असतीलच. त्या निमित्ताने तुम्ही परिसराचं निरीक्षण करून काही समस्या देखील शोधल्या असतील. अनेक संघ त्यावर कृती करताना देखील दिसताय. मुलांनो, या शिबिरांमध्ये आमची यावर बरीच चर्चा झाली आणि कृतीच्या आधी त्या समस्येचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे यावर आम्हा सर्वांचं एकमत झालं.

कुठलीही समस्या दिसल्यानंतर लगेच कृतीच्या मागे न पडता त्या विषयीचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यातून आपली समज वाढेल आणि समस्येचं योग्य कारण कळून आपण योग्य उपाय करू शकू. अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहेच, त्यासाठी आपण इंटरनेट, पुस्तकं, तज्ञ व्यक्ती, माहितीपट, शिक्षक, ताई-दादा यांची मदत तर घेऊच शकता आणि आम्हाला देखील फोन करू शकता.

या दरम्यान आम्ही काही संघाना भेटीही दिल्या. मुलांसोबत खेळून गप्पा मारून खूप आनंद झाला. मुलांनी त्यांनी केलेले कृती कार्यक्रम सांगितले आणि इतर अनुभव देखील सांगितले. बाकीच्या संघांना भेट द्यायला देखील आम्ही लवकरच येऊ. सगळेच संघ उत्साहाने कृती करत आहेत हे बघून खूप आनंद होतो.

तसं बघायला गेलो तर ऑक्टोबरमध्ये तुम्हा सर्वांच्या सहामाही परीक्षा असतील तर आता आपल्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तब्बल २ महिने म्हणजे साधारणतः ८ ते १० बैठका असा मोठ्ठा काळ आहे. तर या १० बैठकींचा पुरेपूर वापर करून घ्या म्हणजे तुम्हा सर्वांचा हा उत्साह कायम टिकेल.
उत्साह अजून वाढवायला पुढे अनेक सण-उत्सव येत आहेत. लवकरच गौरी-गणपती येतील. या सणांमध्ये मज्जा मस्ती तर कराच पण त्या निमित्ताने काही समस्या दिसताय का याचा देखील शोध घ्या. या सणांच्या मागची प्रथा-परंपरा, इतिहास, पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांचं बदललेलं स्वरूप आणि पुढे बदलत जाणारं स्वरूप याची माहिती मिळवा. या सणांमुळे परिसरावर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करा. जमल्यास सणांच्या निमित्ताने आपापल्या परिसरात काही चांगलं करता येईल का याचा देखील विचार करा.

येणाऱ्या सणांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

चला तर मग लवकरच भेटू. काळजी घ्या स्वतःची आणि सोबतच परिसराची देखील!
अरे एक गोष्ट सांगायची राहिलीच. आपण सर्व नोव्हेंबर मध्ये एकत्र भेटणार आहोत. कुठे, कसं ते ठरेल पण शेअरिंग वर्कशॉप आणि कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने त्या त्या विभागातील कुमार निर्माणचे संघ एकत्र येतील आणि आपापले अनुभव एकमेकांना सांगतील. तेव्हा खूप मज्जा देखील करू.

तोपर्यंत बाय बाय....
तुमचे
प्रफुल्ल, प्रणाली, शैलेश

No comments:

Post a Comment