Thursday 31 March 2016

उल्लेखनीय कृती कार्यक्रम

सृजन गट कुरूळ, अलिबाग


कुरूळ अलिबाग येथील गटाने परिसरातील कचऱ्याचा प्रश्न दोन वर्षांपासून उचलून धरला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. या गटाने हा प्रश्न कसा निवडला आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांना कोणी मदत केली आणि कोणी नाही केली ऐकुया त्यांच्याच शब्दांत.

आम्हाला सरांनी कुमार निर्माण विषयी सांगितले आणि त्यात आपण आपला परिसर ज्यात आपण स्वतः पण येतो अजून चांगला सुंदर आणि आहे त्या पेक्षा एक पाऊल पुढे कसा नेऊ शकतो या साठी प्रयत्न करतो असे सांगितले. कुमार निर्माणच्या गटात काम करण्याची कोणाची इच्छा आहे असे विचारताच आम्ही हात उंचावले आम्हाला गटात उपक्रम  राबवायला आवडतील असे सांगितले. अशा प्रकारे आम्ही कुमार निर्माणच्या गटात सामील झालो.

गटात काय कृती करायची जेणे करून परिसरात काही तरी चांगला बदल घडेल याचा आम्ही विचार करू लागलो. आमच्या शाळेसमोरच एक खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात त्यामुळे घाण वास येतो आणि त्याचा त्रास शाळेतील मुलांना होतो. म्हणून आम्ही या खड्ड्यातील कचरा साफ करायचे असे ठरवले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही या खड्डातील कचरा साफ केला. परिसरातील लोकांनी परत खड्ड्यात कचरा टाकू नये म्हणून आम्ही घरोघरी  जाऊन लोकांना सागितले की या खड्ड्यात कचरा टाकू नका. तुम्ही कचरा टाकला नाही तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही. घरातील कचरा घंटा गाडीत टाका असेही सांगितले. त्यावेळेस सगळे लोक आम्हाला हो म्हणाले. पण नंतर परत खड्ड्यात कचरा टाकू लागले आणि पुन्हा परिस्थिती पहिल्या सारखी झाली.

खड्ड्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मग ही मुले ग्रामपंचायत कडे गेली आणि त्यांना या विषयी निवेदन दिले. ग्रामपंचायत चे अधिकारी म्हणाले की तुम्ही मुले लहान असूनही जर एवढे प्रयत्न करताय तर आम्ही पण नक्की मदत करू. ग्रामपंचायतने तीथे दोन कचराकुंड्या बसवल्या. तरही काही लोक कचरा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. मग आम्ही परत त्या लोकांना सांगायला गेलो की कचरा बाहेर टाकता कचरा कुंडीतच टाका. या वेळेसही घरोघर जाऊन आम्ही सगळ्यांना समजून सांगितले. परिसरातील लोकांना आम्ही कागदाच्या कापडी पिशाया घरी बनवून वाटल्या. त्यांना सांगितले की प्लास्टिक च्या पिशव्या न वापरता बाजाराला किंवा खरेदीला जाताना या कापडी पिशवा वापरा. गावातील तळ्याजवळील लोकांनाही मुलांनी या पिशव्या दिल्या आणि महत्व समजावून सांगितले. त्यांनाही तळ्यात कचरा टाकण्याची विनंती मुलांनी केली.

गटाच्या या प्रयत्नांनी खड्ड्यातील कचरा कमी होण्यास चांगलीच मदत झाली. पण तरीही काही लोक खड्ड्यात कचरा टाकतातच. त्यावर मुलांनी मग त्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनात एक नाटिका सादर करायचे ठरवले. गटातीलच एका मुलीने या साठी नाटक लिहले आणि त्यांनी ते वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व गावकर्यांसमोर सादर केले.
शब्दांकन -  कुमार निर्माण  टीम

खड्ड्यातील कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता जरी आता कमी झाली असली तरी अजून प्रश्न पूर्णपणे संपलेला नाहीये. यावर अजून काय उपाय करता येयील या विषयी गटाचा विचार सुरु आहे. पुढील प्रयत्नांसाठी कुमार निर्माण तर्फे गटाला शुभेच्छा.  


जागृती गट, डोमरी

जागृती गटाच्या प्रसाद आणि प्रतिक यांनी शाळेतील मुलांना  ग्रह तारे टेलिस्कोप च्या मदतीने दाखवून त्या विषयीची अधिक माहिती द्यायची ठरवले. एक महिना तयारी करून पुस्तके, इंटरनेट इतर साहित्याची मदत घेऊन  त्यांनी स्वतः पूर्ण अभ्यास केला. स्वतः टेलिस्कोप  मधून निरीक्षण केले. अशा प्रकारे पूर्व तयारी  पूर्ण झाल्या नंतर त्यांनी ४० मुलांना टेलिस्कोप च्या मदतीने चंद्र इतर तारे दाखवले आणि त्या विषयी माहिती समजावून सांगितली. त्यांनी मुलांना या वेळेस चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल माहिती सांगितली. मुलांना चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल अधिक माहिती तर या उपक्रमातून मिळालीच पण त्या सोबतच मुलांना टेलिस्कोप हाताळायलाही मिळाला. रात्रीच्या शांत वातावरणात निरभ्र आकाशातील ग्रह तारे टेलिस्कोप मधून पाहायला मिळणे ही मुलांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली.


बालीवली गट, वाडा

कोहोज नावाचा एक गड बालीवली येथून जवळपास ५० किमी  अंतरावर  आहे. या गडावर  उंचावर एक महादेवाचे मंदिर आहे. येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते.  त्या यात्रेस जवळपास पाच हजार लोक येतात. यात्रेनंतर तेथे भरपूर कचरा आणि प्लास्टिक पडलेले असते. हा कचरा उचलण्यासाठी गटातील मुले आणि गट निमंत्रक या गडावर  गेले होते. सकाळी  लवकर निघून हे लोक गडावर पोहोचले. पहिले ते गड चढून वरती गेले. तिथे त्यांनी डब्बे खाल्ले. नंतर गटाने मिळून  कचरा प्लास्टिक उचलले. सगळे प्लास्टिक गोळा करून ते त्यांनी गोण्यांमध्ये भरले. अशा त्यांनी आठ गोण्या भरल्या. हा कचरा प्लास्टिक चा असल्याने त्यांनी तो जाळला नाही तर त्यांनी त्या गोण्या तिथेच मोठ्या दगडांखाली दाबून ठेवल्या जेणे करून हा कचरा इतरत्र पसरणार नाही. विशेष म्हणजे या कृती मध्ये आताच्या कुमार निर्माणच्या गटातील मुले तर होतीच, पण त्याच सोबत मागील वर्षी गटात असणारी आणि आता गटात नसणारी अशी आठ मुले पण होती. या सगळ्यांनी मिळून तो परिसर प्लास्टिक मुक्त केला


सारथी गट, पवनी

पवनीच्या ‘सारथी गटा’च्या ३ महिन्यांपूर्वीच्या बैठकीत काही मुलांनी असे मत मांडले की, ‘बसमधून प्रवास करणारे प्रवासी काहीही खाल्लं की सरळ खिडकीतून बाहेर फेकतात, तिकिटे सुद्धा प्रवास झाला की रस्त्यावर फेकतात’. मग यावर चर्चा झाली आणि गटाने ठरवले की पवनीतून सुटणाऱ्या सगळ्या बसेसमध्ये कचऱ्याच्या पेटया ठेवायच्या आणि तिथे जाऊन लोकांना सांगायचं की कचरा या पेट्यांमध्येच टाका. परंतु जेव्हा मुलांनी कंडक्टरना भेटून विचारले तेव्हा त्यांनी मुलांना उडवून लावले. ‘सगळ्या बसेसमध्ये आपण कचरापेट्या ठेवणं शक्य नाही’, असा विचार करून मुलांनी तो विषय डोक्यातून काढला. परंतु जेव्हा गटाच्या बैठकीत पुन्हा त्याच विषयावर चर्चा झाली तेव्हा मात्र मुलांनी ठरवलं की ‘जरी आपण सर्व बसेसमध्ये कचरापेट्या नाही ठेवू शकलो तरीही काही ठराविक ठिकाणी आपण त्या पेटया नक्कीच ठेवू शकतो.’

मागील महिन्यात मुलांनी खोक्यांना सजवून, त्यावर ‘कुमार निर्माण’चे नाव टाकून त्याच्या कचरापेटया बनवल्या. शाळा ते बस स्थानकापर्यंत रॅली काढून गावातील लोकांना साठलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिनांमाविषयी सांगून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच काही ठराविक दुकानांच्या समोर (जिथे मोठया प्रमाणावर कचरा असतो), बस स्थानक तसेच पवनी-नागपूर बसेसमध्ये मुलांनी बनवलेल्या कचरापेट्या ठेवल्या व तेथील लोकांना त्यातच कचरा टाकण्याची विनंती केली.

एका ठिकाणी कचरापेटी ठेवताना मुलांना एक गृहस्त खर्रा खाताना दिसले. त्याबद्दल मुलांनी लिहिलेले त्यांच्याच शब्दात,

“कचरापेटी ठेवण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो. तेथे एक काका व्यसन करत होते. त्यांना आम्ही सांगितले की कृपया तुम्ही व्यसन करू नका कारण त्यामुळे कर्करोग होतो. त्यामुळे तुमच्या मूला-बाळांवरही वाईट परिणाम होतील. असं सांगितल्याबरोबर त्यांनी आपल्या तोंडातून सगळा खर्रा थुंकला व मी आजपासून कधीच व्यसन करणार नाही असे सांगितले. हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आजच्या कचरापेट्या ठेवण्याच्या व त्याचे दुष्परिणाम लोकांना समजावण्याच्या कामात आम्हाला यश मिळालं. आमचा हा अनुभव खूप चांगला होता व यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.”

सारथी गट, पवनी
गट निमंत्रक: वृंदन बावनकर (९७६६३७०९५९)



No comments:

Post a Comment