Thursday 31 March 2016

भेट वृत्तांत

कोकणातील कुमार निर्माणच्या गटांना भेटायला म्हणून मी पुण्यावरून रात्री ८:३० ला एस. टी. बसने निघालो. वळणा-वळणाच्या रस्त्यावरून रात्रीची गार हवा खात मस्त प्रवास सुरु झाला. पण लवकरच थंडी वाजू लागली आणि मग वारा कोणत्या फटीतून आत येतोय हे शोधता-शोधता तसाच अर्धवट झोपेत शिरगावला पोहचलो. डॉक्टर काकांकडे पहाटेच पोहोचल्यामुळे पहिले अंथरून टाकून छानपैकी झोप काढली. झोप झाल्यावर काका-काकुंशी छान गप्पा मारत बसलो. गप्पा मारून जेवण करून मग आम्ही गटाला भेटायला मुलांच्या वसतिगृहात गेलो.


शिरगाव गट

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, देवगड तालुक्यातील, शिरगाव येथील हा गट. शिरगावला परिसरातील बऱ्यापैकी मोठे महाविद्यालय आहे. त्यामुळे बऱ्याच लांबून शिकायला म्हणून विद्यार्थी येथे येतात.


शिरगावला बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहात साधारण २०-२५ विद्यार्थी राहतात. हे सगळेच विद्यार्थी कुमार निर्माणच्या गटात आहेत. यात सहावी ते बारावीचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे यांचा वेगळा असा एक गट न बनवता सगळ्याच विद्यर्थ्यांचा मिळून एक गट आहे.

इतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांचीही आपापसात घट्ट मैत्री आहे. कुमार निर्माणचे गट निमंत्रक डॉ. चव्हान काका आणि निवृत्त मुख्याद्यापक कदम सर या मुलांशी गपा मारायला म्हणून नियमित वसतिगृहाला भेट देत असतात. मुलांसाठी नवीन नवीन उपक्रमही राबवत असतात. मुलांसाठी निबंध स्पर्धा, कवितावाचन, नाटक असे अनेक उपक्रम चालतात.

मुलांमध्ये नवीन जिद्द, उत्साह निर्माण करण्याचे काम हे करतात. मुलांनी क्रिकेटच्या स्पर्धा जिंकल्यात. निबंध स्पर्धा, कविता वाचन आणि अभ्यासातही ही मुलं आता शाळेमध्ये चमकू लागली आहेत. गटातील मुलांपैकी एका मुलाचा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. एका मुलाचे लेख बऱ्याचवेळेस स्थानिक वर्तमान पत्रातून छापून आलेत. याशिवाय निबंध स्पर्धा आणि नाटकांमधुनही ही मुलं आपला ठसा उमटवतात.

गटातील मुलांनी गावकऱ्यांसमोर कविता वाचन केले. मुलांच्या नाटकांमधून सामजिक विषय जसे की पाणी, व्यसन, कचरा ई. हाताळलेले असतात.  गावातील लोकांसमोर ही नाटकं साजरी करून गावकऱ्यांमध्ये या सामाजिक प्रश्नांबाबत बाबत जागरूकता पसरवण्याचे काम ही मुलं करतात. मुलांनी त्यांनी केलेलं एक नाटकं सदर केलं आणि काही कवितांचं वाचनही केलं. या मुलांकडून त्यांच्या वसतिगृहातील गमती जमती ऐकून आणि मुलांसोबत खेळून मी निघालो.

आम्ही बालदूत गट, जावडे, ता. 
लांजा या तालुक्याच्या गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर जावडे हे गाव आहे. कोकणातील बहुतांश गावांसारखेच हे गाव वाड्यांमध्ये विखुरलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावातील शाळेत कुमार निर्माणचा गट आहे. ही शाळा पाचवीपर्यंत आहे. चौथी आणि पाचवीचे एकूण सगळेच मुलं-मुली कुमार निर्माणच्या गटात आहेत. गटातील मुले जवळपासच्या वाड्यांवरून शाळेत येतात.

गटातील मुले, मी आणि त्यांच्या शिक्षिका आम्ही एका वर्गात गप्पा मारायला बसलो. मुले खूपच उत्सुक होती. एकमेकांची ओळख खेळाद्वारे करून घेवून आम्ही गप्पा मारायला सुरवात केली. मुलांनी त्यांचे गटात कृती करतानाचे अनुभव सांगितले.
गटातील सगळे पक्षी छायाचित्र प्रदर्शन बघायला लांजा येथे गेले होते. तिथे मुलांनी नव-नवीन पक्षांची छयाचित्रे बघितली आणि त्यांची माहिती घेतली. तेथील फोटोंमधील बरेच पक्षी मुलांसाठी नवीन होते. या गटाची एक सहल त्यांच्या निमंत्रकांनी स्मशानात आयोजित केली होती. मुलांसाठी हा खरच एक भन्नाट अनुभव होता. मुलांची भीती कमी होण्यासाठी हा अनुभव कामी आला. या भेटीत कोण कसं घाबरलं होतं, आणि काय गम्मत आली होती हे ही या मुलांनी सांगितलं आणि त्याबरोबरच थोडं विज्ञानही समजून घेतलं. या सोबतच मुलं वनभोजनासाठी गेली होती. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात जंगलात मुलांनीच स्वतः स्वयंपाक बनवला होता.

मुलांनी शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन मुलांकडेच होते. मुलांसाठी हा पहिलाच अनुभव असल्याने मुलं चांगलीच वैतागली होती. पण शेवटी मुलांनी छानपैकी आयोजन केलं. संध्याकाळी मुलांनी देवीच्या मंदिरासमोर दंगा केला आणि खेळ खेळले.

गटातील मुलांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये काही प्रयोग मांडले होते. मुलांनी ते प्रयोग सादर करून दाखवले.

या भेटीत मुलांनी मला आणि मी मुलांना अनेक कोडी विचारली, विनोद सांगितले आणि खेळ खेळलो.

गटातील मुलांना भेटून परत लांजाला आल्यावर गट निमंत्रक सुहास यांच्याशी भेट झाली. ही भेट धावतीच झाली कारण पुढे मला पनवेलला जाणारी रेल्वे पकडायची होती. कोकण रेल्वेतून प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची मजा घेत हा प्रवास मस्त झाला. रात्री पनवेलला मुक्काम करून सकाळी मी अलिबागमधील कुरूळ येथे गेलो.

सृजन गट, कुरूळ, अलिबाग
अलिबाग पासून जवळच कुरूळ हे गाव आहे. खाडीच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं आहे. या गावात एक छोटसं तळं देखील आहे. गावातील हायस्कूल या खाडीच्या किनाऱ्यावरच आहे. शाळेसमोरच ग्रामपंचायतचं मैदान आहे. शाळा आणि परिसर  सुंदर आहे.

गटासोबत गप्पा मारायला आणि चर्चा करण्यासाठी आम्ही मैदानातील एका झाडाखाली बसलो. गटात पाचवी ते आठवीची मुलं-मुली आहेत.

गटासोबत खेळातून ओळख करून घेतल्यानंतर आम्ही चर्चेला सुरवात केली. मुलांनी त्यांचे आजपर्यंतचे कुमार निर्माण संदर्भातील अनुभव सांगितले. या गटाने गावातील व परिसरातील कचऱ्याचा प्रश्न लावून धरून या प्रश्नाचा पाठपुरावा ते मगील दोन वर्षांपासून करीत आहेत. या शाळेसमोरच एक मोठ्ठा खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी  पसरते आणि शाळेतील मुलांना आणि परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो. त्यासाठी ही मुलं जनजागृती करत आहेत. गावातील तळ्यात देखील लोक कचरा टाकतात तेथेही मुलं जनजागृती करतायेत. दोन्हीकडील नागरिकांना या मुलांनी कापडी पिशव्या बनवून वाटल्या आणि बाजारात किंवा खरेदीला जाताना या पिशव्या वापरा असे सांगितले.

यासंबंधी जागृती करण्यासाठी या मुलांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक नाटिका सादर केली होती. विशेष म्हणजे ही नाटिका कुमार निर्माणच्याच गटातील एका मुलीनी लिहिली होती. गटातील मुलांनी हीच नाटिका आमच्या चर्चे दरम्यान सादर केली.

दिवाळीत या मुलांनी फक्त किल्ले न बांधता त्या किल्ल्यांविषयी माहिती मिळवून ती सगळ्यांना सांगितली. अशा इतरही अनेक विषयांवर आम्ही या भेटीत चर्चा केली.

मुलांशी चर्चा झाल्या नंतर आम्ही खेळ खेळलो. गटातील आणि शाळेतील इतर मुलेही दुपारून अलिबागला सर्कस बघण्यासाठी जाणार होती म्हणून मग आम्ही बैठक आटोपती घेतली.

गट निमंत्रक सुनील पाटील सर काही कामानिमित्त भेटू शकले नाही पण शाळेच्या मुखाध्यापिका आणि इतर शिक्षकांशी चर्चा करून मी तेथून निघालो.
रात्री अलिबागला नयनरम्य  सूर्यास्त बघून पुढील दिवशी समुद्रमार्गे मी मुंबईला आलो. त्या दिवशी मुंबईला मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी वाडा येथील गटाला भेटण्यासाठी म्हणून वाडा येथे गेलो.

बालीवली, वाडा गट
वाडा येथील गटाला भेटायला त्यांच्या गावातील शाळेत पोहचलो. इथे कुमार निर्माणचे दोन गट आहेत. तेथे एका मोकळ्या हॉल मध्ये आम्ही बसलो. मुलांशी आणि इतर शिक्षकांशी ओळख करून घेऊन मग आमची चर्चा पुढे छानपैकी रंगली.

मुलांनी त्यांनी केलेल्या कृतीकार्यक्रमांचे शेअरिंग केले. या मुलांनी आतापर्यंत चार ते पाच वेळेस गावातील कचरा उचलला. कचरा उचलल्यानंतर ही मुले हा कचरा जाळून टाकत. कचऱ्यात असलेले प्लास्टिकही त्यात जाळले जात आणि पर्यायाने पुन्हा प्रदूषण होई.  यावर काय करता येयील याबद्दल मुलांचा विचार चालू होता. गटातील मुले नेमकी तेव्हाच वाड्यातील QUEST या संस्थेत सहलीला गेली होती. तिथे या मुलांनी बघितलं की प्लास्टिकसाठी वेगळ्या अशा कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्या भरल्यानंतर त्यातील प्लास्टिक ते भंगारवाल्यांना देतात. हीच कल्पना शाळेत राबवायची हे मुलांनी ठरवले आणि अशा दोन वेगळ्या कचरा कुंड्या त्यांनी शाळेत ठेवल्या आहेत. गटातील मुलांसोबत शाळेतील इतरही मुले वेगळ्या कुंडीत प्लास्टिकचा कचरा टाकतात. यातील प्लास्टिक ते भंगार वाल्यांना विकणार आहेत.

अशीच गटाची एक सहल जवळच्या धबधब्यावर गेली होती तेथे या मुलांनी खूप मजा-मस्ती केली. तिथे या मुलांना शेती विषयात पदवी करणारे काही मोठी मुले भेटली. त्यांच्याशी चर्चा केल्यावर गटाने शाळेजवळ मेथी लावून मातीची सुपीकता तपासून बघायची असे ठरवले. त्यानुसार त्यांनी शाळेच्या आवारात पाच वाफे तयार करून त्यात मेथी लावली परंतु त्यातील फक्त ३ वाफ्यात मेथी उगवली आणि उरलेल्या २ वाफ्यात नाही उगवली. मुलांनी निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाकीच्या २ वाफ्यांमध्ये रेतीचं प्रमाण जास्त होतं म्हणून त्यात मेथी नाही उगवली. आणि नंतर आलेली मेथी मुलांनी आपापसांत वाटून घेतली.

जवळच एका डोंगरावर महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. यात्रा संपल्यानंतर तिथे प्रचंड कचरा पडलेला असतो. गटातील मुलांनी निमंत्रकाच्या मदतीने तेथे जाऊन साफ-सफाई केली.

गटातील चर्चेमधून आणि मुलांनी विचारलेल्या प्रश्नांमधून मुलांनी कुमार निर्माणविषयी अधिक समजून घेतले. ‘भरारी’विषयी गप्पा मारल्या आणि बाकी धमाल केली. मुलांसोबत रणरणत्या उन्हात एक खेळही खेळलो.

एकूणच बाकी ठिकाणांपेक्षा पेक्षा वाड्याची भेट थोडी छोटी झाली पण धमाल मात्र सगळीकडेच सारखीच आली. खुप काही शिकायलाही मिळालं.



No comments:

Post a Comment