Thursday 31 March 2016

अनुभव एका निमंत्रकाचा - स्मशानभूमीला भेट

फेब्रुवारी महिन्यात आमच्या कुमार निर्माण गटाने शाळेजवळच्या स्मशानभूमीला भेट दिली. त्याबाबत थोडा वृतांत .

मुलांची भीती घालवणे, हा शिक्षणाचा एक भाग असला पाहिजे, असे मी समजतो. कारण मी बघत आलोय की , लहानपणापासून मुलांच्या मनावर मृत्यू,प्रेत वा स्मशान याबाबत भीतीचे संस्कार घडवले जातात. अगदी लहानपणी मीसुद्धा अशाच वातावरणातून घडलेला आहे.

माझ्या शाळेपासून स्मशानभूमी साधारण १५० ते २०० मी अंतरावर आहे. स्मशानभूमी व नदी लागूनच असल्याने शाळेतील मुलांचा तेथून वावर सारखा असतो. तरीसुद्धा मरण पावलेल्या व्यक्तिविषयी त्यांच्या मनात असलेली अनामिक भीती मला जाणवून यायची.

आमच्या वाडीत एक आजी वारल्या. दुसर्‍या दिवशी मुलांना विचारले,  

"स्मशानात जाऊया का सर्वांनी?" आमचा बारा जणांचा गट. मुलांनी उत्साहाने होकार दिला खरा, पण काही घाबरून गेलेल्या नजरा मला जाणवत होत्या. "न घाबरणारी मुलेच माझ्याबरोबर चला", मी मुलांसमोर पर्याय ठेवला. सानिकाने फक्त नकार दर्शवला. आम्ही सर्वांनी तिची भीती घालवण्याचा प्रयत्न केला. पण ती यायला तयार झाली नाही. तिच्या निर्णयाचा मान राखून आम्ही सर्वजण स्मशानभूमीकडे निघालो.

चिता अजूनही धुमसत होती.तरीसुद्धा तेथे आम्ही थोडा वेळ थांबलो. आजूबाजूचे निरीक्षण केले.भूताविषयी गप्पा मारल्या. मुलांच्या भुताच्या कल्पना जाणून घेतल्या. प्रत्येक मुलांच्या मनातील भूत वेगळे होते. पाय नसलेले, हात नसलेले, पांढरे, उलट्या पायाचे, काळे असे अनेक प्रकार मुलांनी सांगितले.

"कोणी प्रत्यक्ष भूत बघितले आहे काय?" – मी.

"नाही"मुले. 

"मग तुम्हाला कसे कळले भुताविषयी?" मी विचारले.

घरातील मोठी माणसे, शेजारी, नातेवाईक अशा लोकांची नावे मुलांनी सांगितली.

शाळेत आल्यावर मुलांना भूताचे चित्र काढायला सांगितले. मुलांनी ऐकीव गोष्टीप्रमाणेच भूताचे चित्र रेखाटले. मी  विचारले, “मरणारी माणसे दिसायला सारखी असतात, मग तुमची भूते वेगवेगळी कशी?” त्यांना नीट उत्तर  देता आले नाही.  मग भूत असते वा नसते, यावर मुलांचे वाद-विवाद झाले.काही मोजक्या मुलांच्या रेट्यामुळे शेवटी अनेकांनी मान्य केले कि भूत नसते.

 दोन दिवसांनी कातभट्टीला भेट द्यायला जाताना स्मशानभूमीच्या वाटेनेच गेलो. आज मात्र बहुतेक सगळेजण बिनधास्त दिसत होते. मुलग्यांनी राखेमधील हाडे हातात घेऊन बघितली.एकमेकांच्या हातात देवू लागले. सापडलेले हाड शरीरातील कोणत्या ठिकाणचे असेल , याचा अंदाज घेऊ लागले. मुलींना मात्र हाडे हाताळायचा संकोच वाटला. आपल्या शरीरात हाडे किती असतात, कोणते हाड कुठे असते, याविषयी आमच्या गप्पा सुरू झाल्या. नुकत्याच जन्मलेल्या मुलाला मोठ्या माणसापेक्षा जास्त हाडे असतात, हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले.

 हाडे-फॉस्फरस, दात- सोडियम याविषयी सुद्धा चर्चा झाली.स्मशानात काहीवेळा आपोआप हाडे पेट घेतात,यामध्ये भूताचा प्रताप नसून फॉस्फरस धातूची करामत कशी असते,हेही मुलांना पटवून सांगता आले.

विघ्नेशने तेथे लावलेल्या तुळशीच्या झाडाविषयी विचारले. एकाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तिसर्‍या, पाचव्या किंवा सातव्या दिवशी 'सारी भरणे' या विधीच्या वेळी छोट्या खडयात काही अस्ती ठेवून त्यावर तुळशीचे झाड लावले जाते, ही प्रथा त्यांना सांगितली. "तुळशीचे झाडच का लावले जाते?" मीच प्रश्न केला. मग आम्ही अंदाज बांधला की एकतर तुळस ही जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याकारणाने व झाडाच्या रूपात गेलेले माणूस मागे उरावे, अशाच हेतूने तुळस लावली जात असावी. आम्ही पहिले की लावलेल्या सगळ्या तुळशी सुकून गेल्या होत्या. म्हणून मुलांना मी म्हटले, "तुळस ही आठवण म्हणून घराजवळच लावल्या गेल्या असत्या तर किती तुळशी जगल्या असत्या. नाही का?"

या क्षेत्रभेटीत पुस्तकाबाहेर खूप काही शिकलो. मी सुद्धा आणि मुले सुद्धा.
                                     
                                      सुहास शिगम
                                     लांजा, रत्नागिरी

                                      9960549414

No comments:

Post a Comment