Thursday 31 March 2016

मुलांच्या लेखणीतून

एके दिवशी सहज फिरत असताना एका चिमणीचे पिल्लू मला दिसले, त्याचे डोळेही नीट उघडलेले नव्हते पण ते थरथर कापत होते. मला त्याची दया आली. मी त्याला अलगद उचलले व एका मऊ बिछान्यावर त्यास ठेवले. कुत्रा, मांजर यासारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव व्हावा यासाठी त्याला एका पिंजऱ्यात ठेवले. पिंजऱ्यामध्ये एका वाटीत पाणी व भिजवलेले तांदूळही ठेवले. मी दररोज त्याची काळजी घेऊ लागलो. मला या गोष्टीचा ताण न येता मला त्यात आनंद येऊ लागला.

थोडे दिवस गेले व ते पिल्लू आता जरा दिसू लागले. ते थोडे थोडे उडू लागले व चालू लागले हे पाहून मला बरे वाटले. २-३ दिवसानंतर मी त्याला पिंजऱ्याबाहेर सोडले तेव्हा ते थोडे थोडे उडू लागले. मग मी दुसऱ्या दिवशी त्याला सोडून दिले व ते पिल्लू पाहिले एका लहान झाडावर बसले आणि उडून गेले.

मला पशुपक्षी पाळण्याचा छंद आहे पण तो आत्तापर्यंत छंदच होता. यावेळी मी पक्षाची काळजी घेतल्याचा मला आनंद झाला. तसेच एके दिवशी मला हौदात एक खारुताई पडलेली दिसली. तिचे अंग पाण्याने भिजलेले दिसले. ती फार थरथरत होती. मला थोडे वाईट वाटले, मग मी तिला वाचवायचे ठरवले पण कसे वाचवावे हे सुचत नव्हते. नंतर मी एक बकेट घेतली व त्या खारुताईला अलगद पाण्याबाहेर काढले. तिचे अंग खूप भिजले होते. त्यामुळे ती थरथर कापत होती. तिला चालताही येत नव्हते. मग मी तिला एका पिंजऱ्यात ठेवले आणि तिला २ ते ३ तास थोडे-थोडे खाऊपिऊ घातले. मग तिला हळूहळू बरे वाटले व ती तरतरीत झाली. आणि शेवटी मी तिला सोडून दिले. मला हे सर्व करताना फार आनंद झाला. एका मुक्या प्राण्याची आपण काळजी घेतली याचाही खूप खूप आनंद झाला.
आकाश जऱ्हाड
जागृती गट, डोमरी
गटनिमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)

No comments:

Post a Comment