Thursday, 31 March 2016

गोष्ट - कुत्र्याचे पिल्लू

सकाळपासून पावसाची धार लागली होती आणि रस्त्यावर खूप चिखल झाला होता. पाणीही साचले होते कितीतरी ठिकाणी.गटाराच्या कडेला एक कचऱ्याची पेटी होती. तिच्या बाजूला एक कुत्र्याचे पिल्लू बसले होते. अगदी लहानसे आणि हाडकुळे. भिजून चिंब झाले होते बिचारे, आणि कुडकुडत होते. त्याच्या डोळ्यांवरून पाणी ओघळत होते, तरी किलकिलत्या डोळ्यांनी ते वर बघे, आपली चिमुकली शेपटी हालवी आणि आणि ‘क्यांव क्यांव’ करी; अगदी केविलवाण्या स्वरात!

चिंतू घराच्या उंबऱ्यावर बसला होता, रस्त्यातील पाण्यात अर्धे पाय बुडवून कागदाच्या नवा सोडीत. एकदम त्याच्या सदऱ्याला हिसका बसला आणि पोटरीला कोणीतरी ओरबाडल्यासारखे वाटले. त्याने दचकून खाली पाहिले, तो कुत्र्याचे पिल्लू! ‘क्यांव क्यांव’ करीत होते. इवलेसे त्याचे ते पंजे.  चिखलाने भरलेले, पण त्यांनीच ते चिंतूच्या पायांशी सलगी करीत होते. किलकिल्या डोळ्यांनी चिंतूकडे त्याने पाहिले, आणि ‘क्यांव क्यांव’ केले
.
चिंतूने आपल्या कागदाच्या नाव फेकून दिल्या आणि पिल्लाला हातावर अल्लद उचलून घेतले. त्याचा सदरादेखील भरला चिखलाने. धावत धावत तो पडवीत गेला.

“दादा, दादा, आपल्याला कुत्र्याचं पिल्लू...”

“चिंत्या, लेका काय रे आणलंस ते? देतोस फेकून – का येऊ?”

चिंतू जीव घेऊन मागील दारी पळाला. आयाई गं! बिचारं पिल्लू! म्हणे फेकून देतोस का येऊ! चिंतू स्वैपाकघरात गेला, “आई, आई, हे बघ काय आणलंय मी!”

“चिंत्या – मेल्या, अरे हड् हड्! इथं कशाला आणलंस? काय करावं या पोरट्याला. वाट्टेल ते घेऊन येतो रस्त्यावरचं! अहो...”

चिंतूने धूम ठोकली गोठयाकडे. गोठयाच्या एका कोपऱ्यात देवदारी खोके होते, त्यात चिंध्या पडल्या होत्या पुष्कळ. चिंतूने पिल्लाला नीट पुसून स्वच्छ केले. किती छानदार पिल्लू आहे! पांढरे सफेद – आणि कपाळावर काळा डाग पण! आणि म्हणे रस्त्यावरचे काहीतरी घेऊन येतो! पलीकडे एक रिकामी  पणती पडली होती. चिंतूने त्यात थोडेसे पाणी भरून आणले. पिल्लाने ते लप लप करीत पिऊनदेखील टाकले. चिंतूच्या मनगटावर पुढचे दोन पंजे ठेऊन ते उभे राहिले, आणि शेपटी हालवीत भुंकले. किती छान! भू भू भू ! अरे हात! चिंतूच्या पोटात धस्स झाले! बाबांनी ऐकले तर! त्याने चटकन मागे येऊन पाहिले.

“चिंत्या, कारटया, हे धंदे करतोस काय! कुठल्या उकीरड्यावरून आणलंस हे?” चिंतूच्या काळजाचे अगदी अगदी पाणी पाणी झाले! पण पिल्लू असे भुंकले रागाने! भू भू ! आणि चिंतूका चिकटले.

“चल, हो घरात! अभ्यास नको करायला!” चिंतूच्या वडिलांनी त्याचा कान पकडला आणि दुसऱ्या हाताने पिल्लाची मानगूट धरली आणि त्याला वर उचलले.

“अहो, दुखेल त्याची मान – ” चिंतूचे शब्द त्याच्या घशातच अडकले. त्याचा गळा भरून आला – ‘क्यांव क्यांव’ पिल्लाने टाहो फोडला. आतून डोके फुटते आहे, असे चिंतूला वाटले.

“चल घे ते पुस्तक – मरेना कुत्रं! अभ्यास करायला नको –”

चिंतूच्या पाठीत जोरात रपाटा बसला, पण त्याने पाठदेखील चोळली नाही. त्याच्या डोक्यात नुसते ‘क्यांव क्यांव’ चालले होते.

“हं, उघड पुस्तक. पान पंचविसावे. धडा पंधरावा. ‘प्राण्यांवर दया करा!’”

चिंतूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्या होत्या. त्याने डाव्या बाहीने नाक पुसले व तो रडक्या आवाजात वाचू लागला,  “पान पंचविसावे. धडा पंधरावा. ‘प्राण्यांवर दया करा!’”

बाहेर दरवाज्यापाशी कुत्र्याचे पिल्लू आपले उभेच होते. पावसाने भिजल्यामुळे थरथर काकडत! आणि चिमुकल्या नखांनी दाराला ओरबाडीत! पावसाची धार कोण चालली होती आणि इकडे चिंतूचे वाचनही चाललेच होते,


“प्राण्यांवर दया करा!”

(आचार्य अत्रे लिखितकुत्र्याचे पिल्लूया गोष्टीवरून)

2 comments: