Thursday 31 March 2016

जगातील सर्वात लहान मुख्याध्यापकाची गोष्ट!

पश्चिम बंगाल मधील एका १६ वर्षाच्या मुलाला बीबीसीने (जगातील सर्वात मोठी माहिती प्रसारण संस्था) २००९ साली ‘जगातील सर्वात लहान मुख्याध्यापक’ म्हणून घोषित केले. या मुलाचे नाव आहे बाबर अली! तर ही गोष्ट आहे पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भाबटा नावाच्या खेडेगावातील बाबर अलीची. बाबरचा जन्म १८ मार्च १९९३ चा.

बाबरचं कुटुंब हे भाबटा गावातील काही निवडक कुटुंबांपैकी एक होतं जे आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करू शकत होतं. बाबरचे वडील जूटचा व्यवसाय करीत. त्यांच्या गावात शाळा नव्हती म्हणून बाबरला त्याच्या वडिलांनी १०किमी लांबच्या शाळेत टाकले. बाबरला शिक्षणाची खूप आवड होती.

शाळेत जाण्यासाठी बाबरला रोज रिक्षाने १० किमी व पुढे चालत २ किमी असा प्रवास करावा लागायचा. नियमाप्रमाणे जरी  सर्वांना शिक्षण मोफत मिळत असलं तरी गावापासून शाळेत जाईपर्यंतचा खर्च गावातील इतर  मुलामुलींना परवडत नव्हता. परंतु बाबरला शाळेत जाताना पाहून त्यांना त्याचे खूप कौतुक वाटायचे. “बाबर शाळेत जाऊन काय बरे करत असेल?”, असे ते नेहमीच एकमेकांना उत्सुकतेने विचारायचे. बाबर शाळेतून आला की ही मुले त्याच्या भोवती जमा होत आणि विचारत की  शाळेत तू नेमकं काय शिकतोस. मग बाबर त्यांना समोर बसवून शाळेतील गोष्टी सांगायचा. आणि हे सांगताना ती सर्व मुलं एक खेळ खेळायची; ज्यात ९ वर्षांचा ५वीत शिकणारा छोटासा बाबर शिक्षक होत असे आणि इतर मुले त्याचे विद्यार्थी! आणि असा हा मजेशीर खेळ बाबरच्या अंगणात ही मुले रोज संध्याकाळी खेळू लागली. परंतु यातील काही मुलं नियमित बाबर कडे येऊ लागली आणि बाबरही खेळातून तो जे काही शाळेत शिकत असे ते या मुलांना शिकवू लागला. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली आणि बाबरनेही त्या खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरवात केली. हे सगळं करताना बाबरचं वय होतं अवघं ९ वर्ष!

सुरवातीला बाबरच्या या शाळेत ८ मुले-मुली येत असत ज्यात बाबरची एक बहिणदेखील होती. बाबर शाळेतून घरी येयीपर्यंत ही मुले त्यांची कामं संपवून तयार असायची. घरी आलं की बाबर ला हात पाय धुवायलाही ही मुले वेळ मिळू देत नसत. बाबर फक्त शाळेचा गणवेश बदलून लगेच यांना शिकवायला बसायचा.


बाबर म्हणतो, “मी विचार केला की ही मुले माझ्यासारखी शाळेत जाऊन कधीच नाही शिकू शकणार, मग मीच जर त्यांना रोज शिकवले तर?” आणि अवघ्या ३ वर्षांत अंगणातल्या या खेळाचे रुपांतर बाबरच्या अथक प्रयत्नानंतर एका छानश्या शाळेत झाले.

बघता बघता छोटया बाबरच्या शाळेची गोष्ट पंचक्रोशीत पसरू लागली आणि या शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली. भाबटा गावात अशी बरीच कुटुंबे होती ज्यांना मुलांना बाहेरगावी शिकायला पाठवणे शक्य नव्हते. हे सगळं सुरु असताना एका बाजूला बाबरचं शिक्षणही नेटाने सुरु होतं. त्याच्या शाळेतही तो हुशार अन मेहनती म्हणून ओळखला जात असे. हे सर्व बघून बाबरच्या वडिलांना मात्र बाबरची काळजी वाटू लागली. त्यांना असे वाटत असे की बाबरच्या या खटाटोपामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. कारण त्यांना बाबरला एक मोठा पोलीस अधिकारी बनलेला बघायचं होतं. म्हणून काही काळानंतर बाबरच्या वडिलांनी त्याला ती शाळा बंद करायला सांगितले. परंतु तोपर्यंत गावातील गरजू मुलांना शिकवणे ही बाबरची आवड बनली होती आणि त्या मुलांचीही ती गरज होती. शेवटी त्याने आपले वडील दुपारी घरी नसतात हे बघून दुपारचे वर्ग सुरु केले. परंतु एक दिवस वडिलांना हे कळलं. मग ते बाबरला म्हणाले की या सगळ्याचा तुझ्या अभ्यासावर काहीही परिणाम व्हायला नको आणि त्याने वडिलांना तसे वचन दिले.

वडिलांना वचन दिल्याप्रमाणे बाबर पहाटे ४ वाजता उठून आधी स्वतःचा अभ्यास करत असे, नंतर शाळा आणि संध्याकाळी घरी आल्यावर स्वतः शिक्षक बनून गावातील मुलांना शिकवत असे. मुलांना शिकविण्यासोबत बाबरचा अभ्यासदेखील चांगला चालू आहे हे पाहून बाबरचे वडील निर्धास्त झाले आणि मग अगदी मोकळेपणाने बाबरच्या अंगणात मुलांचे शिकणे सुरु राहिले.


या सगळ्याचा खर्च बाबर त्याच्या खाऊच्या पैशातून करत असे तसेच त्याचे वडीलही त्याला शक्य तशी मदत करत. मुलांना वह्या-पुस्तके मिळावी यासाठी बाबरने त्याच्या शाळेत येणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना तांदूळ मागून ते विकले आणि मुलांसाठी वह्या-पुस्तके घेतली. दरम्यान आजूबाजूच्या गावांत बाबरच्या अनोख्या शाळेची माहिती पसरली आणि बाबरच्या कामात इतर लोकं जोडल्या जाऊ लागली. त्यातल्या काहींनीत्याला आर्थिक मदत करायला सुरवात केली. तर इतर लोक त्याच्या शाळेत शिकवू लागली. बाबरच्या शिक्षकांनाही बाबरचे हे काम खूप आवडत असे, त्यामुळे तेही बाबरला मदत करत.

बघता बघता छोटया बाबरने खेळातून सुरु केलेल्या शाळेचा वटवृक्ष झाला आणि त्याच्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड वाढली. बाबरही ७ वीची परीक्षा पास होऊन ८ व्या इयत्तेत दाखल झाला. सर्व ‘गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण’ हेच बाबरचे ध्येय बनले. त्याने शेवटी या शाळेला औपचारिक स्वरूप देण्याचे ठरवले आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीने बाबरने खूप संकटाना तोंड देऊन शाळेची नोंदणी करून घेतली. अशाप्रकारे इयत्ता ८ वीत शिकणारा १३ वर्षांचा बाबर त्या शाळेचा मुख्याधापक झाला! शाळेच्या उद्घाटनासाठी बाबरने आपल्या आईच्या साडीने परिसर सजवून त्याच्या शिक्षकांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन केले आणि नाव ठेवले – ‘आनंद शिक्षा निकेतन!’

हा सर्व खटाटोप करताना बाबरला खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली होती मात्र अजूनही सर्व वर्ग त्याच्या अंगणातच भरत होते. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत असे, शिकवणे अवघड होऊन बसे. यासाठी स्वतःचा अभ्यास सांभाळून बाबर तालुक्यातील, जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात मदतीसाठी चकरा मारत असे. शाळेच्या आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना जाऊन भेटत असे, त्यांच्याशी बोलत असे. परंतु बऱ्याच लोकांना बाबरच्या कामाची असूया वाटू लागली, त्यांनी अनेक प्रकारे त्याला त्रास दिला परंतु तरीही बाबरने शिकवण्याचे काम नेटाने चालूच ठेवले.

दरम्यान बाबर १० वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला व त्याने ११ वीला प्रवेश मिळवला पण तरीही शिकवण्याचे काम मात्र सुरूच ठेवले. आता त्याचा दिनक्रम काहीसा असा झाला होता – ‘सकाळी उठून आधी स्वतःचा अभ्यास करणे, कॉलेजला जाणे मग संध्याकाळी शाळेत शिकवणे आणि रात्री शाळेसंदर्भातली कार्यालयीन कामे करणे.’ अशा प्रकारे मुख्याधापक बाबर खूप मन लाऊन, झोकून देऊन काम करू लागला.
आज बाबर इंग्रजी विषयाचा पदवीधर असून उच्चशिक्षण घेत आहे. सगळ्यात सुरवातीला येणाऱ्या ८ मुलांचेही आता महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे. आता ही ८ मुले-मुलीही या शाळेला जोडल्या गेली आणि आता तेही आनंद शिक्षा निकेतनमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. ८ मुलांना घेऊन सुरु केलेल्याया शाळेत आज ३००च्या वर मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आज ‘आनंद शिक्षा निकेतन’ ही नोंदणीकृत शाळा आहे. इथे आठवी पर्यंत चे वर्ग चालतात. त्यात मुलांना शालेय साहित्यासोबतच एक वेळचे जेवणही दिले जाते. बाबरला मिळालेल्या आर्थिक मदतीतून त्याने शाळेसाठी इमारत बांधायला सुरवात केली आहे, ज्यात ५०० मुलांचा प्रवेश झाला आहे.

शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याबरोबर बाबरच्या या अनोख्या कामाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि प्रसारमाध्यमांनी बाबरच्या कामाची दखल घेतली. बाबर राज्यात नाही, संपूर्ण देशात नाही तर जगभर प्रसिध्द झाला.

कर्नाटक सरकारने इंग्रजी पुस्तकाच्या अभ्यासक्रमात ‘बाबरचे चरित्र’ समाविष्ट केले आहे. बीबीसीने बाबरला १६ वर्षांचा असताना ‘जगातील सर्वात लहान मुख्याधापक’ म्हणून घोषित केले. सीएनएन – आयबीएन ने २००९ साली त्याला ‘रियल हिरो’ चा पुरस्कार दिला. तसेच भारताबाहेरून काही देशांनी त्याला आपल्या कामाविषयीची माहिती देण्यासाठी आमंत्रित केले होते.

आजही बाबरने अनेक अडचणींना तोंड देत आपले काम सुरु ठेवले आहे. गावातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्याच्यासोबत अजून १० शिक्षक आहेत. त्यातही गावातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे त्याचं कटाक्षाने लक्ष असतं. आजही त्याच्या शाळेत  ६०% प्रमाण मुलींचे आहे. या शाळेत महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचं त्याचं स्वप्न आहे.
  

No comments:

Post a Comment