Monday 26 February 2018

‘उडान’ संघाच्या करामतींची गोष्ट!

‘उडान’ संघाच्या करामतींची गोष्ट!
मित्रांनो,
कुमार निर्माणमधील ‘उडान’ या संघाची गोष्ट माहितीये का तुम्हाला? नाही ना, चला तर मग मी तुम्हाला उडान संघाची गोष्ट सांगते. ही गोष्ट मात्र खरी आहे बरं का!
जळगाव जिल्ह्यातील भोटा या छोटयाश्या गावात हा संघ आहे. या संघातील मुलं-मुली एकमेकांशी फार प्रेमाने वागतात- बोलतात, खुप मजा करतात आणि कामही एकत्र करतात.
दर शनिवारी शाळा सुटल्यावर या मुलांची संघ-बैठक होते. अशाच एका शनिवारी बैठक सुरु असताना निमंत्रक दादांनी मुलांना प्रश्न विचारला, “मुलांनो, तुमचा आवडता सण कुठला रे?” मग एकेकाने सांगायला सुरुवात केली आणि चर्चेला ऊत आला. कुणी म्हणे दिवाळी, कुणी म्हणे संक्रांत तर कुणी म्हटलं रंगपंचमी! मग अचानक मुलांच्या लक्षात आलं की आता पुढच्या आठवड्यात होळी व रंगपंचमी हे सण येताय तर आपण हे सण काहीतरी ‘हटके’ पद्धतीने साजरे केले पाहिजेत. हटके म्हणजे काय तर त्यात लाकडे जाळायची नाहीत, त्यातून काहीतरी संदेश पण द्यायचा आणि रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरायचे. थोडक्यात काय तर पर्यावरणस्नेही होळी! 
गावात एका ठिकाणी होळी होते पण तिथे न करता आपला संघ शाळेतला आहे म्हणून मुलांनी शाळेच्या अंगणातच होळी करायचे ठरवले. मग होळीच्या दिवशी संघातील सर्व मुले-मुली झटून कामाला लागले. कुणी अंगणातील कचरा गोळा केला, कुणी काडया जमा केल्या आणि छोटीशी होळी बनवली. गम्मत म्हणजे आपल्याला होळीतून काहीतरी संदेश दिला पाहिजे म्हणून मुलांनी दसरा नसूनही काठ्यांचा रावण तयार केला, त्याला दोन्ही बाजूनी मुखवटे बसवले. त्या मुखवट्यांवर द्वेष, हिंसा, मत्सर, दारू, भांडण, अंधश्रद्धा, मांसाहार, चोरी, अन्याय, भ्रष्टाचार, लोभ, व्यसने, भेदभाव, आळस अशी दुर्गुणांची नावे लिहिली.
दुर्गुणांनी भरलेला हा रावण होळीच्या मधोमध खड्डा खणून उभा केला. त्याच्या आजूबाजूला शाळेतील जमा केलेला कचरा  रचला. होळीभोवती छान रांगोळ्या काढल्या. मग अचानक एकाला भन्नाट प्रश्न पडला. त्याने सर्वांना जमा केले आणि सांगितले, “अरे आपण आपल्या आजूबाजूला दिसणारे सर्व दुर्गुण त्या रावणाच्या तोंडांवर लावले पण आपल्यात पण काही ना काही वाईट गुण आहेतच, तर त्यांचं काय?” त्याचा असा विचित्र प्रश्न ऐकुन मुले बुचकळ्यात पडली. मग सर्वानुमते असं ठरलं की समाजातल्या दुर्गुणांसोबत आपल्यात जे काही वाईट गुण असतील ते एका चिठ्ठीवर लिहायचे आणि होळीत टाकायचे. स्वतःतले वाईट गुण लिहायची वेळ आली तेव्हा मात्र मुले गंभीर झाली, प्रत्येकाने नीट विचार करून स्वतःतील वाईट गुण एका चिठ्ठीवर लिहिला आणि परत सर्वजण रचलेल्या होळीभोवती जमले. मग एकाने होळी पेटवली आणि सर्वांनी आपापल्या चिठ्ठ्या त्या पेटत्या होळीत टाकून दिल्या. होळी पेटायला लागल्यावर मुलांनी भरपूर जल्लोष केला. होळी पेटून संपेपर्यंत मुले तिथेच थांबली होती.
दुसऱ्या दिवशी मुले रंगपंचमीच्या तयारीला लागली. मुलांनी आजूबाजूला फिरून रंगीत फुले, पाने, बिया जमा केल्या, त्यात झेंडू,
बीट, लाल बिया आणि बरंच काही जमा केलं आणि त्याचे रंग बनवले. या बनवलेल्या रंगांतून मुलं मनसोक्त रंगपंचमी खेळली आणि आनंदाने घरी गेली!
असंच एक दिवस ठरल्याप्रमाणे एका शनिवारी उडान संघातील मुलं बैठकीला जमलेली होती. हा शनिवार मे महिन्यातला होता. बाहेर प्रचंड ऊन होतं, सूर्य आपली सर्व शक्ती पणाला लावून आग ओकत होता. सुरुवातीला खेळ खेळून मग बैठकीत चर्चेला सुरुवात झाली. मे महिन्यातील अशा प्रचंड उन्हाळ्यात ‘उन्हाळा आणि ऊन’ याच विषयावर मुलं बोलायला लागली. चर्चा ऐन रंगात असताना संघातील वैभवने त्याचं म्हणणं मांडलं. ‘या उन्हामुळे आपल्याला इतका त्रास होतो तर प्राणी-पक्ष्यांचं कसं होत असावं?’ असं त्याचं म्हणणं होतं. मग यावर चर्चा पुढे रंगत गेली. उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांना कसा त्रास होत असेल यावर प्रत्येक जण बोलत होतं. कुणी म्हणत होतं उन्हाळ्यात पक्ष्यांची संख्या कमी झालेली जाणवते, त्यांना सावली पाहिजे असणार, मध्येच कुणीतरी बोललं की आपल्यासारखीच त्यांनाही खुप तहान लागत असणार, इ. इ. पक्ष्यांना एवढा त्रास होतो हे लक्षात आल्यावर मुलांना वाईट वाटलं आणि मग यावर ‘आपण काही करू शकतो का?’ या मुद्द्याकडे चर्चेचा मोर्चा वळला. मग आपण काय बरं करू शकतो यावर सर्वजण विचार करायला लागले. मध्येच पुन्हा वैभवने त्याचं मत मांडायला हात वर केला. त्याला एक भारी आयडिया सुचली होती. तो म्हणाला, “जर आपण आपल्या शाळेतील झाडांवर या पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं तर??” सर्वांनी वैभवकडे मोठया कौतुकाने पाहिलं कारण अर्थातच सर्वांना त्याची ही आयडिया जाम आवडली होती. पुढील चर्चा सुरु करण्याआधी सर्वांनी टाळ्या वाजवून वैभवला सुचलेल्या आयडियाबद्दल त्याचं कौतुक केलं. मग काय करायचं हे ठरल्यावर कसं करायचं यावर चर्चा सुरु झाली तोच संघातील एक मुलगी म्हणाली, “पण मग त्यांना तहान सोबत भूकही लागत असेल, तर आपण पाण्यासोबत दाणे पण ठेवले पाहिजेत.” मुलांनी तिच्या म्हणण्याला लगेच दुजोरा
दिला आणि चर्चा पुढे गेली. मग काहीतरी भांडेवजा वस्तू आपण झाडावर टांगली पाहिजे ज्यात दाणे आणि पाणी ठेवता येईल. पण ते बनवावं कसं हे काही केल्या मुलांना उमजेना. मग त्यांनी इंटरनेटची मदत घ्यायचं ठरवलं. आणि त्यावरून काही चित्रं डाऊनलोड केली. तेव्हा मुलांना नवीन माहिती मिळाली की याला ‘बर्ड फिडर’ असंही म्हणतात, मुलांना हे नाव जाम आवडलं. त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांनी बर्ड फिडर बनवायचे असं ठरवलं.  त्यासाठी तेलाच्या कॅन्स वापरायच्या असं ठरलं. मग मुलांनी डाऊनलोड केलेल्या चित्राचं बारकाईने निरीक्षण केलं; त्याला नेमकं कुठून आणि कसं कापलंय, कसं अडकवलंय, कशाने अडकवलंय, इ. मग संघातील ज्या कुणाच्या घरी तेलाचे रिकामे कॅन्स असतील त्यांनी ते कॅन्स आणि काहींनी सोबत कॅन्स अडकवायला तार, कात्री, त्यात टाकायला तांदुळाचे दाणे असं सर्व साहित्य जमा करायचं ठरलं. मात्र ही सर्व चर्चा होईपर्यंत सूर्य डोक्यावर आला होता आणि मुलांच्या पोटातील पक्षी भुकेने ओरडायला लागले होते. मग हे सर्व पुढील बैठकीत करायचं ठरलं. पण तोपर्यंत आपापली जबाबदारी विसरायला नको आणि शिवाय बैठकीत काय चर्चा झाली हेही विसरायला नको म्हणून संघातील मयुरने नोंदवहीत सारं काही नोंदवून घेतलं आणि एका छानशा गाण्याने बैठकीचा शेवट झाला.
पुढील बैठकीपर्यंत मुलांनी सारे सामान जमा केले होते. पुढच्या बैठकीला सुरुवात झाली. मुलं खुप उत्साहात होती. त्यांना कधी
एकदाचे बर्ड फीडर्स बनवतो आणि झाडांवर टांगतो असं झालं होतं. मग प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेऊन काही बर्ड फीडर्स बनवले, त्यावर ‘उडान संघ’ लिहून त्यात तांदळाचे दाणे आणि पाणी ठेवून शाळेतील झाडांवर टांगले. एकदाचे बर्ड फीडर्स झाडांवर बसले आणि मुलांनी हेssssss करून आनंद व्यक्त केला. नंतर गावातील काही मुख्य झाडांवरही असे बर्ड फीडर्स बसवायला हवेत यावर चर्चा झाली आणि त्याप्रमाणे मुलांनी पुन्हा काही बर्ड फीडर्स बनवून गावातील काही मुख्य झाडांवर बसवले, जिथे खुप पक्षी जमतात. नंतर त्यात कोणकोण दाणा-पाणी टाकणार याची जबाबदारी मुलांनी संघात चर्चा करून ठरवली. आणि त्याप्रमाणे पुढील संपूर्ण उन्हाळा मुलांनी ती जबाबदारी नेटाने पार पाडली.
त्यात पक्षी येतात हे तर त्यांना संपलेल्या तांदळाच्या दाण्यांवरून समजलं पण त्यांना समक्ष हे सगळं बघायचं होतं.  शाळेला सुट्टी असुनही अधून-मधुन मुले या बर्ड फीडर्सचं निरीक्षण करायला शाळेत जायचे, आणि एके दिवशी त्यांना काही चिमण्या बर्ड फीडर्समध्ये बसून दाणे खाताना आणि पाणी पिताना दिसल्या. हे बघुन मुलांना खुप आनंद झाला, त्यांनी संघातील इतरही मुलांना बोलावलं.  हे बघत असताना मुलांना खुप मजा वाटत होती. उन्हाळा असुनही हळूहळू शाळेतील पक्ष्यांची संख्याही वाढली. पक्षी तिथे येत, दाणे खात, पाणी पित, खेळत, किलबिल करत आणि उडून जात! याचा मुलांनी खुप आनंद लुटला!
शब्दांकन
-प्रणाली

No comments:

Post a Comment