Monday, 26 February 2018

मान्यवरांशी संवाद


मुलांनो,
 कुमार निर्माणमध्ये आपल्या हातून कृती तर झाली पाहिजेच पण जेव्हा कृती करू तेव्हा आपल्या मनामध्ये दया व प्रेम पाहिजे. त्यासोबतच आपला एक समूह पाहिजे आणि त्या समुहाने मिळून ती कृती केली पाहिजे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कृतीमागे काहीतरी विचार पाहिजे. या चारही गोष्टी असल्या तर आपली सामाजिक शक्ती वाढते.

तुम्ही सर्व छोटी छोटी मुलं, तुम्ही येऊन असा पुढाकार घ्यावा, हे अवतीभवतीचे प्रश्न बघावे, ते प्रश्न सोडवण्यासाठी काही कृती करावी आणि मग ती कृती कशी केली ते इथे येऊन सांगावं, हे फार विलक्षण आहे. आजच्या काळात ही प्रेरणा देणारी आणि उत्साह वाटायला लावणारी गोष्ट आहे. कोणास सांगता येईल कदाचित तुमच्या मधूनच एखादे बाबा आमटे होतील, एखादे गाडगेबाबा निघतील, एखादा शास्त्रज्ञ निघेल, एखादा पर्यावरण वाचवणारा सुंदरलाल बहुगुणा निघेल. त्यामुळे तुम्ही हे जे छोटे-छोटे समाज कार्य केले आहे त्यातून तुमच्यामध्ये दडलेल्या समाज सेवकाला उमलायला नक्कीच वाव मिळाला आहे.
जशी आपली शारीरिक शक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते तशीच आपली सामाजिक शक्ती आणि सामाजिक बुद्धीही वाढली पाहिजे. कुमार निर्माण मध्ये या सर्व गुणांचा विकास होईलच, पण तुम्ही तुमच्या गावामध्ये ज्या कृती केल्या त्या करताना तुम्हाला ‘आनंद’ झाला पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो की कुमार निर्माण साठी काम करू नका, तुम्हाला एकत्र, एकमेकांसोबत काम करायला मजा येते म्हणून ते काम करा. तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये काही अडचण दिसते, ती अडचण सोडवावीशी वाटते म्हणून काम करा.
मा. डॉ. अभय बंग
मुलांनो,
माणसाचा अधिक चांगला माणूस करणं हे कुमार निर्माणचं उद्दिष्ठ आहे ! तुम्ही सर्वांनी आपल्या कामातून इतरांना आनंदी करायचा
प्रयत्न केला हे प्रशंसनीय आहे आणि ‘उबंटू’चा अर्थ हाच तर आहे. आपण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट करतो, त्यात जर आपण आनंदी नसू तर आपण कधीच दुसऱ्यांना आनंदी करू शकणार नाही. त्यामुळेच आपण दुःखी होऊन समाजासाठी काही करणं ही हिंसा आहे. आपल्या समाजसेवी कृतीतून आपल्यालाही खूप आनंद झाला पाहिजे. मगच समाजाला त्यातून खरा आनंद होणार आहे.
आत्ता जे दशक चालू आहे त्या दशकाच्या सुरुवातीपासून एक बदल मला जाणवतोय, आणि तो असा की आत्तापर्यंत मोठी माणसं लहान मुलांना शिकवत होती, पण आता लहान मुलं मोठ्यांना शिकवत आहेत. मी सगळीकडे गेलो की निरनिराळ्या गोष्टी लहान मुलं मोठ्यांना शिकवताना दिसतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजकार्यसुद्धा लहान मुलंच मोठ्यांना शिकवणार आहेत. कारण मुलांमधील समाजाविषयीची ‘संवेदनशीलता’ मोठ्यांना मोठ्या प्रमाणात शिकवण्याची गरज आहे. आणि कुमार निर्माणद्वारे हे काम तुम्ही लहान मुलं नक्कीच कराल असा मला विश्वास वाटतो.
मा. विवेक सावंत

No comments:

Post a Comment