Monday, 26 February 2018

गोष्ट: फक्त प्रौढांकरता काय म्हणून?


गोष्ट: फक्त प्रौढांकरता काय म्हणून?

गावात एक छान चित्रपट आलेला होता. चित्रपटाचे नाव ‘कचऱ्याची पेटी’ असे असून त्यात मराठी चित्रसृष्टीतले तीन मोठे नट एकत्र येऊन काम करीत होते.  प्रत्येक तीन मिनिटांनी हास्यकल्लोळ, पाच मिनिटांनी न आवरता येण्यासारखे हुंदके आणि पंधरा-पंधरा मिनिटांनी स्वर्गीय संगिताला लाजवणाऱ्या मधुर लकेऱ्या अशी चमचमीत मेजवानी, प्रथितयश जुन्या अभिनेत्रींच्या जोडीला क्रांती या नव्याने रजतपटावर पदार्पण करणाऱ्या नवनटीचे रोमहर्षक नृत्य तसेच बंड्या ह्या नवीन बाल-नटाचे चुरचुरीत बोल यांच्यामुळे वर्षभर ‘हाऊस-फुल्ल’ राहूनसुद्धा पुनः पुन्हा चित्रपट पाहण्याची रसिकांची हौस पूर्ण होणार नाही, अशी जाणत्यांची खात्री होती.
घरातील मंडळींच्या आग्रहामुळे मी कुटुंबातील सर्व माणसांसह चित्रपट पाहण्यास जाण्याचे ठरवले. खिडकीवर तुफान गर्दी असल्यामुळे आगाऊ तिकीट काढण्यास मोरूला आणि मैनाला बरोबर घेऊन गेलो, कारण एका माणसाला फक्त दोनच तिकिटे विकत मिळणार होती. आगाऊ तिकीट काढणाऱ्यांची सुद्धा भली मोठी रांग लागली होती!  आमच्यापुढे निदान ५० स्त्री-पुरुष रांगेने उभे होते.  तासभर उभं राहिल्यावर आमचा नंबर लागला.  मी म्हणालो, “आम्ही तिघं आलो आहोत. आम्हाला ६ तिकिटं पाहिजेत.”
“सो सॉरी सर, ह्या खेळाला मुलांना बंदी आहे, कारण हा ‘ए’ वर्गातला पिक्चर आहे. ही दोघं मुलं १४ वर्षांहुन लहान दिसत आहेत. फक्त आपल्याला मी तिकिटं देऊ शकतो.” तिकीट विक्री करणारा बाबू म्हणाला.
“ए वर्गातला चित्रपट म्हणजे काय? तो तर सर्वांत वरच्या प्रतीचं असल्यामुळे मुलांना तो पाहण्याची परवानगी अवश्य असली पाहिजे.” – मी.
“ ‘ए’ म्हणजे अडल्ट असा शब्द आहे.  ‘ए’ वर्गातले चित्रपट फक्त प्रौढांकरताच आहेत. १८ वर्षांखालील मुलांना हे चित्रपट पाहण्यास बंदी आहे.”
“अन ‘बी’ वर्गातले चित्रपट बालकांकरता आहेत, होय की नाही?”, मोरूने विचारले.
“ ‘ए’ आणि ‘यु’ असे दोनच वर्ग आहेत. ‘यु’ म्हणजे युनिव्हर्सल. ते लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना पाहता येतात. कायदा आहे, आमचा नाईलाज आहे. एवढी मोठी गिऱ्हाईकी सोडून द्यायची आम्हाला थोडीच हौस आहे? बरं मग तुम्हाला दोन तिकिटं देऊ रावसाहेब?”, तिकीट विक्रेत्याने विचारले.
मी दोन तिकिटे घेतली तेवढ्यात मोरूने विचारले, “काय हो! तिकीटर, फक्त मुलांसाठी चित्रपट नाहीत वाटतं?”
त्याने ‘नाहीत’ असं उत्तर दिलं. रांगेतले मागले लोक ‘अहो इथे गप्पा मारीत काय उभे राहिला? तिकिटं घेऊन पुढं चला’ असं ओरडू लागल्याने आम्ही तिथून निघालो. मोरू आणि मैना संतापले होते. ‘प्रौढांकरता लागलेल्या सिनेमाला जर लहान मुलांना बंदी असते तर मुलांकरिता लागलेल्या सिनेमाला प्रौढांना बंदी का नसावी?’ असे त्या दोघांचे म्हणणे होते.
आमच्या आळीत मुलामुलींचे बालविकास मंडळ होते.  मोरू त्याचा अध्यक्ष होता.  बग्या, अंतू, गोंदू, छकडेवाल्याचा मुलगा, अब्दुल्या वैगरे मुलगे आणि मैना, स्नेहप्रभा, शांता वैगरे मुली या मंडळाच्या सभासद होत्या.  प्रौढांकरता रचलेल्या चित्रपटास लहानांना बंदी असावी ह्या पक्षपाताचा निषेध करण्याकरिता या बालविकास मंडळाने शहरातील सर्व जाती-धर्मांच्या, सर्व भाषांच्या मुलामुलींची सभा कॉम्रेड बाईलबुद्धे याच्या अध्यक्षतेने भरविली होती. सभेला चिकार गर्दी जमली होती. कारण इतका गाजलेला चित्रपट पाहण्याची आपल्याला बंदी असल्यामुळे सर्व बालवर्ग खवळून गेला होता. सभेत मोरूने मोठ्या आवेशाने भाषण केले. तो म्हणाला, “जगात समतेचं नुसतं नाव आहे. आगगाडीत पुरुषांच्या डब्यात बायकांना बसू देतात पण बायकांच्या डब्यात एखादा पुरुष शिरला तर त्याच्यावर मात्र सर्वजण उलटतात. उपहारगृहाच्या वर पाट्या लावलेल्या असतात, ‘सर्व जाती-धर्मांच्या लोकांना मुफ्त प्रवेश!’ पण या पाट्यांवर ‘सर्व वयाच्या’ असं मात्र लिहिलेलं नसतं. आता हे सिनेमाचं बघा ना! ह्यात म्हणे चित्रपटाचे दोन वर्ग पाडलेले आहेत, एकाचं नाव ‘ए’ आणि दुसऱ्याचं नाव ‘यु’. ‘ए’ फक्त वडील माणसांकरता आणि आणि यु सर्वांकरिता आहे. “ ‘ए’ याचा अर्थ काय?” सभेला आलेल्या एका मुलाने विचारले.
मोरू उत्तरला, “ ‘ए’ म्हणजे ‘एकट्याकरिता’! मुलांना बरोबर घेऊन यायचं नाही असा त्याचा अर्थ आहे.  पण असा वर्ग मात्र केलेला नाही की ज्यात मुलांना चित्रपट पहायची परवानगी आहे, पण त्यात मोठ्या लोकांना जायची बंदी आहे.”
“शेम, शेम...” एक मुलगा मोठ्याने ओरडला.
मैना म्हणाली, “हा अन्याय आम्ही मुलं-मुली कधीही सहन करणार नाहीत. या वडीलशाहीचं पेकाट मोडलंच पाहिजे. आपले चित्रपट मुलांना पाहू द्यायचे नाहीत अन मुलांचे मात्र खुश्शाल आपण पाहायला जायचं, असल्या तऱ्हेचं पक्षपाती वर्तन आम्ही बिलकुल चालू देणार नाही.” एवढं बोलून मैना टाळ्यांच्या गजरात खाली बसली.
“काय कराल?” काही मुले ओरडली.
“काय कराल? मी विचारते काय करणार नाही?”, मैना टेबलावर जोरात मूठ आपटून म्हणाली, “आम्ही मोर्चे काढू, सत्याग्रह करू, निदर्शनं करू अन सिनेमागृहासमोर निरोधनं करू.” “बोला, कोण कोण सामील होत आहे आमच्या निदर्शनांत?”

“आम्ही येतो, आम्ही येतो”, अशा तऱ्हेचे आवाज श्रोत्यांतून निघाले. स्वयंसेवकांची नावे टिपून घेण्यात आली आणि कृतिसमितीची सुरुवात झाली. मोरू मुलांचा आणि मैना मुलींची पुढारी झाली. दोन-तीन दिवसांनी ५०-६० मुला-मुलींची टोळी घोषणा करीत सिनेमागृहाच्या भोवती मोर्चा काढण्यास गेली होती. ‘मुलांच्या सिनेमाला प्रौढांनी जाण्यास बंदी’, असे शब्द काही जणांनी उच्चारल्यावर ‘घातलीच पाहिजे’ अशी पूर्तता बाकीच्यांनी केली.  प्रौढांचा धिक्कार असो आणि बालकांचा विजय असो’ अशाही घोषणा देण्यात आल्या. या मिरवणुकीशिवाय अधिक कृती करण्याची संधी या बालकांना मिळाली नव्हती. कारण मुलांनी पाहण्यासाठी निर्माण केलेले चित्रपट दोन महिन्यात शहरात आले नव्हते, ते येत्या शुक्रवारपासून लोकमान्य चित्रगृहात यायचे जाहीर झाले. चित्रपटाचे नाव ‘हिमगौरी आणि सात बुटके’ असे होते. या चित्रपटाची वाखाणाणी मुंबईहुन अगोदरच ऐकू आल्यामुळे ते पाहण्याची उत्सुकता मुलांत फारच वाढली होती. मुलांपेक्षाही वडील मंडळींना ते पाहण्याची इच्छा अधिक होती. परंतु आपण एकटेच या बालरंजक चित्रपटाला गेलो तर मित्रमंडळी आपल्यावर पोरकटपणाचा शिक्का मारतील म्हणून लहान मुलांना बरोबर नेण्याचे सर्वांनी ठरवले होते. मी मुलांना उद्देशून म्हणालो, “तुम्हाला सगळ्यांना घेऊन आम्ही हिमगौरी पिक्चरला जायचं ठरवलं आहे. पहिले दोन दिवस फार गर्दी होईल म्हणून सोमवारी संध्याकाळी आपण जाऊया.”
“आम्ही चौघं मुलं जाऊ. तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका.” मोरू साळसूदपणे म्हणाला.
मी त्याचे उर्मट बोलणे ऐकुन चकित झालो. अशा तऱ्हेचे उर्मट बोलण्याची त्याला सवय नव्हती. मी न राहवून विचारले, “का रे बाबा?”
“हा चित्रपट मुलांकरीता आहे. मोठ्यांनी तो पहायचा नाही. आम्हीच सिनेमागृहासमोर निदर्शन करू. मोठ्या माणसांना सिनेमागृहात प्रवेश करण्यास आम्ही मुलं बंदी घालणार आहोत.” – मोरू
आई हे सर्व ऐकत होती. ती म्हणाली, “अलीकडे मोठ्ठाली माणसं उठ्ल्यासुटल्या संप करतात, मोर्चे काढतात, अमुक झिंदाबाद आणि तमुक मुडदाबाद असं ओरडतात, तेव्हाच मला वाटलं होतं की गुरूची विद्या गुरूला फळल्याशिवाय राहायची नाही. तुम्ही सरकारवर उलटता तशी तुमची मुलं केव्हातरी तुमच्यावर उलटल्याशिवाय कशी राहणार?”
शुक्रवारी हिमगौरीचा पहिला खेळ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सहा वाजता सुरु व्हायचा होता. साडेपाच वाजेपासून गर्दी सुरु होईल असं वाटत होतं पण चार वाजेपासूनच शेकडो लहान मुलामुलींनी सिनेमागृहाला गराडा घालून घोषणा चालू केल्या होत्या.
तिकीट कार्यालयाजवळ काही मुले उभी राहून ओरडत होती, ‘मोठ्या माणसांनी तिकिटं घेऊ नये, त्यांना आत सोडलं जाणार नाही. आम्ही दारातच मोठ्या माणसांना अडवून धरू.’
पोलिसांचा अगदी नाईलाज झाला. इतक्या लहान मुलांवर लाठीमार करणे किंवा अश्रुधूर सोडणे कठीण नव्हते पण पोलिसांची आणि शिपायांची मुलेही त्या घोळक्यात सामील असल्याने असले उपाय पोलीस करू शकले नाहीत. राज्यपालांची वेळ होताच राज्यपाल मोटारीतून चित्रपटगृहाच्या फाटकाशी आले. सिनेमा चालकांनी कसेबसे त्यांचे स्वागत तर केले पण मुले, ‘राज्यपाल परत जा’ अशा घोषणा करीत होते.
हे राज्यपाल खेळीमेळीच्या वृत्तीचे असल्याने त्यांनी मुलांवर न रागवता त्यांना विचारले, “मुलांनो आपण तडजोड करूया, तुमची काय तक्रार आहे ती आम्हाला समजली तर मी तुमचं समाधान करीन.”
सिनेमा व्यवस्थापकांच्या कार्यालयात राज्यपाल, व्यवस्थापक, मुलांचे प्रतिनिधी कॉम्रेड बाईलबुद्धे अन कुमार मोरू असे जमले होते.
बाईलबुद्धे म्हणाला, “गेल्या महिन्यात ‘कचऱ्याची पेटी’ हा चित्रपट लागला होता. तो म्हणे ‘ए’ वर्गातला होता, केवळ प्रौढांकरिता होता. तो पाहण्याची आमची फार इच्छा असुनही आम्हाला सिनेमागृहात प्रवेश मिळाला नाही. आता ‘हिमगौरी’ हा मुलांचा चित्रपट आला असून ह्यात मात्र हे प्रौढ लोकं खुश्शाल जागा अडवत आहेत. ह्या अन्यायाविरुध्द आम्ही निदर्शन करीत आहोत. मोठ्या वयाच्या माणसांना हा चित्रपट पाहण्याची बंदी असावी असं आमचं म्हणणं आहे.”
“नव्हे, ही आमची हक्काची मागणी आहे.”, मोरू ताडकन उभा राहून म्हणाला.
राज्यपालांनी आपल्या मदतनीसच्या कानात सांगितलं, ‘दोन चॉकलेटच्या वड्या घेऊन या.’ मग ते मुलांना म्हणाले, ‘मुलांनो! तुम्हाला सिनेमाला जायला पैसे कोण देतं?’
“मोठी माणसं.” बाईलबुद्धे उत्तरला.
“आता असं पहा मुलांनो, ज्यांच्या पैशांवर आपलं सिनेमा पाहणं पार पडतं त्यांनाच आपल्या चित्रपटाला येण्याची बंदी करणं म्हणजे आपण कृतज्ञ नाही, असं दाखवण्यासारखं आहे. नाही का? दुसरं असं, मुलं म्हटली म्हणजे काही काही सहा-सहा वर्षांहून सुद्धा लहान असतात.  त्यांना सांभाळण्याचं काम मोठी मुले करू शकतील का? सिनेमा बघण्याऐवजी लहान भावंडांकडे लक्ष देणं मोठ्या मुलांना भाग पडेल अन त्यांचा विरस होईल. म्हणून मुलांच्या आईबापांना तरी बालचित्रपट पाहायला सोडणं योग्य आहे असं तुम्हाला वाटत नाही का?”
बाईलबुद्धे स्वतःचे डोके खाजवू लागला, जणू काय डोक्यात पुरून ठेवलेले उत्तर त्याला बाहेर काढायचे होते. मोरू कानात पेन्सिल घालून कान कोरु लागला. गोंधळात पडल्यावर असं करायची त्याची सवय होती. मदतनीसने आणलेले चॉकलेट्स दोघांच्या पुढे ठेवून राज्यपाल म्हणाले, “हा घ्या तुमचा खाऊ अन सांगा मला तुमचं मत.”
“मुलांच्या आईबापांना तेवढं सोडावं बालचित्रपट बघायला, बाकीच्या लोकांचं तिथे काय काम आहे?” – मोरू.
राज्यपाल म्हणाले, “इतरांनी काय घोडं मारलं आहे? त्यांनाही मुलं असतातच. पण ती दुसऱ्या गावी असतात किंवा अजून त्यांचा जन्म व्हायचा असतो. शिवाय सिनेमाला येऊन चुकलेल्या मुलांना घरी पोहचवणं, एखाद्या मुलाच्या खिशात पैसे नसले तर आपल्या पैशानं त्यांना तिकीट घेऊन देणं अशी कामं प्रौढांशिवाय दुसरं कोण करणार? म्हणून बालचित्रपटाना मोठ्यांनी येण्याविरुद्ध जी मोहीम तुम्ही चालवली आहे ती बंद करा अशी मी तुम्हाला विनंती करतो, पण हे चॉकलेट खा अगोदर.”
दोन्ही मुलांनी चॉकलेट फस्त केले आणि गोड झालेल्या तोंडाने मोहीम बंद करण्याचे कबूल केले. त्यांचे म्हणणे एवढेच राहिले की ह्या खेळाला येणाऱ्या मुलांना राज्यपालांनी खाऊ द्यावा. त्यांनी ही अट आनंदाने मान्य करून व्यवस्थापकांना मुलांच्या खाऊसाठी पाच रुपये दिले आणि प्रत्येक लहान मुलास पेढे देण्याचे जाहीर केले.
शेवटी मुलांनी प्रौढांविरुध्द चालू केलेली मोहीम बंद केली आणि हा बालचित्रपट आबालवृद्धांना खुला झाला!
चि. वी. जोशी यांच्या ‘मोरू आणि मैना’ पुस्तकातून साभार

No comments:

Post a Comment