Wednesday, 30 September 2015

उल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव

कुमार निर्माणच्या उबंटु गटाची नियमित बैठक होते. दिवाळी जवळ येताच, दिवाळीच्या सुट्टीत आपण एकत्र तर नसू मग आपापल्या गावी, घरी आपण काय-काय चांगल्या गोष्टी करू शकतो यावर गटाची चर्चा सुरु झाली.


फटाक्यांचा मुद्दा हळूहळू चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा बनला. आपण फटाके नक्की का फोडतो? यावर विचार करताना हे जाणवलं की याचे तोटेच अधिक दिसताहेत. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जीवघेणे अपघात, पर्यावरणाचा र्‍हास या सगळ्या सोबतच मुलांना आणखी एक नवी माहिती मिळाली, ती म्हणजे या फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात छोटी छोटी बालके १२-१२ तास काम करतात. म्हणजे एका अर्थी आपण बालमजुरीला प्रोत्साहनच देत आहोत.

जाणीव तर झाली, आता त्त्यावर कृतीची आवश्यकता होती. योजना बनली. मुलांनी ठरवलं आपण स्वतः फटके फोडायचे नाहीतच, पण आपल्या मित्र-मैत्रीणीनाही तसे आवाहन करायचे. त्यासाठी मुलांनी आधी अभ्यास केला की फटाके नेमके कुठून येतात, ते तयार कसे होतात, ते फोडले तर काय होतं, नाही फोडले तर काय होईल ई.

मग मुलांनी एक प्रतिज्ञापत्रक तयार केलं, ज्यामध्ये ते भरून देणारी व्यक्ती शपथ घेते की मी फटाके उडवण्याच्या पैशात अमुक अमुक रकमेची बचत करेन. शेकडो मुलांना व मोठ्या व्यक्तींना भेटून त्यांनी फटाक्याबद्दल जागृती केली व त्यांच्याकडून ते प्रतिज्ञापत्र भरून घेतले. अगदी प्रत्येक सदस्याने दिवाळीच्या सुट्ट्यात आपापल्या गावी ही मोहीम राबवली व सर्वांनी मिळून अक्षरशः लाखो रुपयांची बचत घडवून आणली.

गटातील सदस्यांनी फक्त स्वतःच फटाके फोडले नाहीत तर इतर मुलामुलींना देखील फटाके फोडण्यापासून परावृत्त केले. फटाके न फोडल्याने पैश्यांची जी बचत झाली. त्यातून काही साहित्य विकत घेऊन मुलांनी विविध प्रकारची शुभेच्छा-पत्रे तयार केली आणि त्यामार्फत, प्रदूषण मुक्त आणि प्रसन्न दिवाळीचा आनंद आपल्या गावात, आप्तेष्टांमध्ये वाटला. गरजू व्यक्तींना मदत केली. अशा पद्धतीने वैयक्तिक वाटणारी ही कृती सामुदायिक ठरली.


येत्या दिवाळीच्या निमित्ताने अजून काय काय गोष्टी समजून घेता येतील बरे?


(असाच कृती कार्यक्रम मागील वर्षी जवळपास सर्वच गटांनी पार पाडला व त्याबाबत नोंदीही ठेवल्या. )

No comments:

Post a Comment