Wednesday, 30 September 2015

कुमार निर्माण व कृती कार्यक्रम

कुमार निर्माण ही मुलांच्या हक्काची अशी जागा आहे जिथे कुठलाही कृती कार्यक्रम करताना तो मुलांकडून सुरु होणे यावर भर देण्यात आला आहे. कृती कार्यक्रम करताना मुलांना काय वाटतं, त्या कृतीमागे त्यांचा काय विचार आहे हे जास्त महत्वाचे आहे. तसेच कुठलाही कृती कार्यक्रम करताना मुलांचं स्वातंत्र्य पूर्णपणे जपल्या गेले पाहिजे.
कुठलाही कृती कार्यक्रम ठरवण्याआधी मुलांनी एखादा विषय घेऊन त्यावर सखोल आणि चहुबाजूनी चर्चा व अभ्यास केल्यास कृती कार्यक्रम अधिक चांगले होऊ शकतील. जेव्हा अशा चर्चेला सुरवात होते तेव्हा त्या चर्चेला अगणित फाटे फुटू शकतात, ज्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. याबरोबरच चर्चा सुरु असताना अनेक वेगळेच कृती कार्यक्रम सुचण्याचीही शक्यता जास्त असते. लक्षात घेऊया की निव्वळ कृती कार्यक्रम करणे हा आपला हेतू नसून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे ते फक्त एक साधन आहे.

बैठकांमध्ये विद्यार्थी खालील गोष्टींबाबतही चर्चा घडवून आणू शकतात.
-       छानशी गोष्ट ऐकून त्यावर चर्चा करणे
-       वर्तमानपत्र/ मासिक एकत्र वाचणे
-       चित्र काढणे
-       गाणी म्हणणे
-       आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनेवर चर्चा करणे
-       वस्तू बनवणे
-       उत्तम सिनेमा/ नाटक/ लघुपट/ माहितीपट पाहणे
-       एकत्र फिरायला जाणे (परिसराचे निरीक्षण करणे)

उदा.
१.       व्यक्तिगत कृती कार्यक्रम:
‘भरारी’च्या प्रथम अंकातील ‘चित्र चर्चा’ यावर चर्चा केल्यास काही कृती कार्यक्रम ठरवण्यास त्याची मदत होऊ शकते.
जसे की, चित्र क्र. २ मध्ये एका ओढ्याजवळ लहान मुले व काही महिला पाणी भरण्यासाठी एक मोठी रांग लावून उभे आहेत आणि चित्रात पाण्याचा साठा मर्यादित दिसतोय. त्यामुळे प्रत्येकाला आपला नंबर येईपर्यंत भर उन्हात उभे रहावे लागत आहे. चर्चेअंती स्वतःशी निगडीत एखादा कृती कार्यक्रम देखील ठरवता येऊ शकतो, उदा. ‘महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, मी स्वतः दैनंदिन आयुष्यात कमी व गरजेपुरताच पाण्याचा वापर करेन.’
२.       सांघिक कृती कार्यक्रम:
मुलांनी एखादी घटना पाहिली असेल तर त्यावर चर्चा करून गटात एखादा कृती-कार्यक्रम ठरवता येऊ शकतो.
जसे की, अंबेजोगाईच्या गटातील मुलांच्या कॉलनीत नेहमी एक कुत्रा खेळत असे. एक दिवस तो झोपूनच होता. म्हणून मग मुलांनी प्राण्यांच्या डॉक्टरना बोलावून त्या कुत्र्याला तपासले व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घेतली. लवकरच तो कुत्रा बरा झाला.
कुमार निर्माण हा एक सांघिक उपक्रम आहे, म्हणजेच सर्व कृती कार्यक्रम ठरवणे, निर्णय घेणे ई. बाबी विद्यार्थ्यांनी एक संघ म्हणूनच पार पाडायच्या आहेत. म्हणूनच कृती कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होणेही महत्वाचे ठरते.

Ø  मुलांमध्ये संघभावना तयार करण्यासाठी त्याना आवडतील असे अनेक उपक्रम घेता येतील. उदा.
·         विविध सांघिक खेळ
·         गप्पागोष्टी
·         गाणी
·         चर्चासत्रे
·         छोटी नाटके, पथनाट्ये बसवणे
·         जवळपासच्या स्थळाला किवा संस्थेला एकत्र भेट देणे 

संघउभारणीनंतर विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या कृती कार्यक्रमांची रचना खालीलप्रमाणे असू शकेल.
·      स्व
सुरवातीचे कृती कार्यक्रम स्वत: शी निगडीत असू शकतात.
उदा. स्वतःचे जेवणाचे ताट रोज स्वतःच धुणे, आपली खेळणी, कपडे व्यवस्थित ठेवणे. आपल्या कपड्यांना इस्त्री करणे ई.
·      कुटुंब
‘स्व’ ला जोड देताना आपापल्या कुटुंबात करता येणाऱ्या कृती देखील करता येतील.
उदा. कुटुंबातील सदस्यांना काही ठराविक मदत सातत्याने करणे (आईला कामात मदत), आजी आजोबाना काही मदत.
·      परिसर
परिसराशी निगडीत कृती करताना व्यक्तिगत पातळीवर आपण अथवा विद्यार्थी विरोधाभास निर्माण करणाऱ्या कृती करत नाही ना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपले शेजारी, गल्ली, सोसायटी ई. शी संबंध येणारे कृती कार्यक्रम इथे करता येतील.
उदा. परिसरात फुल-झाडे लावणे व जोपासणे, परिसरात स्वच्छता ठेवणे, इतर वयोवृद्ध, महिला लहान मुले यांना मदत करणे, चर्चासत्र चालवणे, सर्वे करणे, स्पर्धा व इतर उपक्रम आयोजित करणे.
·      गाव / शहर / समाज
काही कृती आपल्या लगतच्या परीसरापलीकडे मुलांना घेऊन जातील.
उदा. परिसरातील विविध शासकिय व अशासकीय संस्थाना भेट देणे, विविध प्रकारे गावातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, गावाचे पर्यावरण व त्याचे महत्व समजून घेणे.

No comments:

Post a Comment