Wednesday, 30 September 2015

बोलकी पुस्तके

शिक्षणाचे रहस्य - आचार्य विनोबा भावे

वस्तुतः विद्यार्थ्याला आपण शिक्षण घेत आहोत असा भाव झाला की शिक्षणातले स्वारस्य गेलेच म्हणून समजावे.  लहान मुलांना खेळणे हा उत्तम व्यायाम होय असे सांगण्यात येते, त्यात्यील रहस्य हेच आहे. खेळामध्ये व्यायाम होत असतो, पण ‘मी व्यायाम करीत आहे’ अशी जाणीव नसते. खेळताना आसपासचे जग मेलेले असते. मुले तद्रूप बनून अद्वैताचा अनुभव घेत असतात.  देहभान हरपलेले असते.  तहान, भूक, थकवा, दुखापत, काहीही भासत नाही.  सारांश, खेळ म्हणजे आनंद असतो, ते व्यायामरूप कर्तव्य नसते.  हीच गोष्ट सर्व शिक्षणालाही लागू केली पाहिजे.  शिक्षण हे कर्तव्य आहे असल्या कृत्रिम भावनेपेक्षा, शिक्षण म्हणजे आनंद आहे ही नैसर्गिक आणि जोमदार भावना उत्पन्न झाली पाहिजे.  पण आमच्या मुलांत अशी भावना हल्ली दिसते काय? शिक्षण म्हणजे आनंद ही भावना तर राहू द्याच, पण शिक्षण हे कर्तव्य आहे ही भावनासुद्धा फारशी दिसून येत नाही.  शिक्षण म्हणजे शिक्षा ही गुलामगिरीची एकच भावना आज विद्यार्थीवर्गात प्रचलित आहे.   मुलाने जरा कोठे जिवंतपणाची चमक किंवा स्वतंत्रवृत्तीची चुणूक दाखविली की घरच्या मंडळींचा उद्गार निघालाच, “मुलाला शाळेत डांबला पाहिजे!” शाळा म्हणजे काय?  डांबून ठेवण्याची जागा! अर्थातच ह्या पवित्र कार्याला हातभार लावणारे शिक्षक म्हणजे सदर तुरुंगाचे लहान-मोठे अधिकारी!

No comments:

Post a Comment