Wednesday, 30 September 2015

संपादकीय...

सप्रेम नमस्कार!
कुमार निर्माण अंतर्गत भरारीमासिकाचा प्रथम अंक आपणा सर्वांना मिळाला असेलच. त्यात केंद्रीय कार्यशाळेचा संपूर्ण आढावा घेण्यात आला होता. त्यातून कुमार निर्माण विषयी अजून स्पष्टता येऊन पुढील उपक्रमांसाठी मदत होईल अशी आशा वाटते. भरारीमासिकाबाबत काही गटांचे अतिशय उत्साहवर्धक अभिप्राय आमच्यापर्यंत पोचले आहेत. काही गटातील मुलांनी मासिकात दिलेल्या चित्रांवरून वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या तर काही गटांनी विविध भावना दर्शवणारे चेहरेसमजून घेऊन त्याची नक्कलही करून पाहिली.

या महिन्यातील अंक आम्ही कृती कार्यक्रम विशेषांकम्हणून आपणापर्यंत पोचवत आहोत. प्रथम कुठल्या कृती कार्यक्रमांनी व कशी सुरवात करायची असा प्रश्न बरेचदा निमंत्रकांना पडतो. म्हणून उपक्रमाच्या सुरवातीला कसे कृती कार्यक्रम असू शकतात यावर विशेष भर देण्यात आला आहे. बरेच गट पुर्वानुभवाने खूप छान काम करत आहेत त्यांच्या कृतींमधून एक गोष्ट लक्षात येते की अगदी रोजच्या जगण्यातील लहान लहान गोष्टींमधूनही अभ्यासाच्या व कृतींच्या प्रचंड आनंददायी कृती व संधी निर्माण होऊ शकतात. म्हणून गट निमंत्रकांनी एकमेकांच्या संपर्कात रहाणे, अभिप्राय देणे, सल्ला मसलत करणे हे खूप महत्वाचे आहे. या अंकासोबत सर्वांचे संपर्क क्रमांक देखील पाठवत आहोत.

मुले स्वतःहून काही करत नाहीत किंवा करू शकत नाहीत हा आपला सर्वात मोठा गैरसमज होऊन आपणच मुलांच्या वतीने निर्णय घेणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकेल. त्यापासून सावध असा! कृती करणे हे आपले उद्दिष्ट नाही आहे. त्यानिमित्ताने मुलांची जडण घडण होणे हे जास्त महत्वाचे.


आम्ही हे परत एकदा नमूद करू इच्छितो की, कुमार निर्माण अंतर्गत कृती कार्यक्रम मुलांनीच ठरवायचे आहेत, त्यांनीच पार पाडायचे आहेत. सर्व निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. आपण सर्व फक्त निमित्त मात्र!  

No comments:

Post a Comment