Sunday, 1 January 2017

स्वागत!

प्रिय सर्व,
सप्रेम नमस्कार!
कुमार निर्माण मध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचं कुमार निर्माणच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक धन्यवाद!
कुमार निर्माण कार्यशाळेनंतर ही आपली पहिली औपचारिक भेट. हो भेटच ! कुमार निर्माणच्या टीमला तुमच्याशी बोलण्याचं एक हक्काचं माध्यम म्हणजे ‘भरारी’. म्हणून या वेळेस मुलांसाठी वेगळं आणि निमंत्रकांसाठी वेगळं ‘भरारी’ आम्ही पाठवत आहोत. यातील मुलांसाठीचं भरारी तुम्ही नक्कीच वाचा पण निमंत्रकांसाठीचं भरारी मात्र मुलांना वाचायला देऊ नका. (या भरारीत कुमार निर्माण मुळे मुलांच्यात काय सकारात्मक बदल होऊ शकतील याचा उल्लेख आहे. आणि हे जर मुलांनी वाचले तर कृतिकार्यक्रम करतानाचा त्यांचा आनंद हिरावून घेतल्यासारखे होईल.) हे ‘भरारी’ तुम्हाला काम करताना मदत व्हावी आणि नवीन कल्पना सुचाव्या, इतर निमंत्रक समस्यांवर कशाप्रकारे मार्ग काढताय हे माहिती होण्यासाठी आहे. त्यासोबतच तुम्हाला इतर निमंत्रकांशी काही बोलायचे असल्यास किंवा तुमचा एखादा प्रश्न सर्वांसमोर मांडायचा असल्यास तेही आपण या भरारी मार्फत नक्कीच करू शकतो. तुम्हाला हवे असणारे समूह गीत, मुलांना दाखवायचे व्हिडीयो, विविध खेळ हे देखील आम्ही भरारी मार्फत तुमच्यापर्यंत पोहचवू.
म्हणून हे भरारी म्हणजे आपण सर्वांनी एकमेकांना दिलेली भेटच (Visit) आहे.
कुमार निर्माणच्या प्रशिक्षण कार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह आणि उर्जा नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. तुमच्या सहकार्याने आणि सक्रीय सहभागानेच आपली कार्यशाळा उत्तम प्रकारे पार पडली. आम्हालाही यात खूप मजा आली आणि शिकायला देखील मिळालं. आशा करतो की तुम्हाला देखील भरपूर मजा आली असेल आणि शिकायला देखील मिळालं असेल.
कार्यशाळेत झालेले विविध सत्र पुढील कामासाठी नक्कीच उपयोगी पडतील असं तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून वाटतं. कार्यशाळेत झालेली विविध सत्र आणि त्यातील ठळक वैशिष्ट्ये या अंकात देत आहोत. त्यासोबतच पुढे उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठी या अंकात घेऊन येत आहोत.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी आपण सर्वांनी मिळून काही उद्दिष्टे स्वतःसाठी ठरवून घेतली होती. कुठलीही दोन मुल्ये जी मुलांमध्ये रुजवावी असं आपल्याला वाटतं त्यासाठी प्रत्येकी एक कृती पुढील तीन महिन्यात करायची असं आपण सर्वांनी मिळून ठरवलं आहे. म्हणजे कुमार निर्माणचे महाराष्ट्रभर ढोबळमानाने साठ गटांत प्रत्येकी दोन याप्रमाणे १२० कृतिकार्यक्रम झालेले असतील.  सर्वांनी मिळून कुमार निर्माणचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जोमाने प्रयत्न करूया.
कार्यशाळेत तुम्ही दाखवलेला उत्साह तुम्ही वर्षभर टिकवाल आणि आपण सगळे मिळून कुमार निर्माणला आणखी एक पाउल पुढे नेऊ असा विश्वास आम्हाला वाटतो.
- टीम कुमार निर्माण


No comments:

Post a Comment