Sunday, 1 January 2017

निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा

कुमार निर्माण निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा वृतांत
कुमार निर्माण अंतर्गत चौथ्या सत्राची सुरुवात ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळेने’ दि. १० डिसेंबर २०१६ ते दि. १२ डिसेंबर २०१६ दरम्यान जे. पी. नाईक इन्स्टिट्यूट, पुणे येथे करण्यात आली. या सत्रासाठी निमंत्रक होण्यासाठी निवड प्रक्रिया ठेवण्यात आली होती. त्यादृष्टीने कुमार निर्माणच्या चौथ्या सत्राची जाहिरात महाराष्ट्रभर पोचणाऱ्या विविध १० मासिकांमध्ये देण्यात आली होती. इच्छुक निमंत्रकांसाठी अर्ज, त्यांच्या मुलाखती व निवड असे निवड प्रक्रियेचे स्वरूप ठेवण्यात आले होते. निवड झालेल्या ६७ निमंत्रकांची ३ दिवसीय ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा’ दि. १० डिसेंबर २०१६ ते दि. १२ डिसेंबर २०१६ दरम्यान जे. पी. नाईक इन्स्टिट्यूट, पुणे येथे उत्साहाने पार पडली. निमंत्रकांना कुमार निर्माणची संकल्पना व त्यांची भूमिका समजावून सांगणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेचा तपशीलवार अहवाल खालीलप्रमाणे -

१० डिसेंबर २०१६
कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात निमंत्रकांच्या नोंदणीने झाली. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या जवळपास ६७ निमंत्रकांच्या सक्रीय सहभागामुळे कार्यशाळेच्या उत्सहात अधिकच भर पडली. कार्यशाळेचे मुल्यांकन करण्याच्या हेतूने यावर्षी निमंत्रकांकडून कार्याशाळेपुर्वी तसेच कार्याशाळेनंतर मूल्यांकनाचा अर्ज भरून घेण्यात आले. कार्यशाळेची सुरुवात प्रणाली आणि ऋतुजा यांनी ‘आम्ही प्रकाश बीजे...’ या गीताने केली. त्यानंतर केदारने खेळाद्वारे निमंत्रकांची एकदुसऱ्याशी ओळख व्हायला मदत केली. त्यात केदारने ओळखीच्या सोबतच काही मजेशीर प्रश्न एकमेकांना विचारायला लावून निमंत्रकांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. कुमार निर्माण कृती समितीने सहभागी झालेल्या सर्व निमंत्रकांचे कार्यशाळेत स्वागत केले.

उद्घाटनपर भाषण: डॉ. अभय बंग (नायना)
कार्यशाळेसाठी जमलेल्या निमंत्रकांशी नायनांनी Skype वरून संवाद साधला. त्यांनी थोडक्यात पण नेमकेपणाने कुमार निर्माण संकल्पना, त्याची गरज त्याबरोबरच आजची शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती यावर चर्चा केली. ‘बीज अपोआप उगवते, त्यात कोंब असतोच, फळ असते, फुल असते आपण फक्त त्या बीजाला रुजण्यासाठीचे वातावरण पुरवायचे असते आणि कुमार निर्माण मध्ये आपण हाच प्रयत्न करतो’ या शब्दात त्यांनी कुमार निर्माण उपक्रमाची मांडणी केली. शेवटी नायनांनी केलेल्या चर्चेशी संबंधित प्रश्नोत्तरेही झाली.
कुमार निर्माण प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल सर्व निमंत्रकांचे नायनांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सत्र १ : शिक्षण कशासाठी?
वक्ते: शोभा भागवत, संचालिका, बालभवन, पुणे
उद्देश: शिक्षणाचा नेमका उद्देश समजून घेणे व आजच्या शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणे. शिक्षणाचे काही महत्त्वाचे हेतू समजावून सांगणे – ‘चारीत्र्य संवर्धन, मूल्य शिक्षण, सामाजिक कृतीची वृत्ती’

शोभा भागवत यांनी ‘शिक्षण कशासाठी व कसे’ याबद्दल निमंत्रकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवातून व इतरांनी केलेल्या प्रयोगांच्या सहाय्याने त्यांनी निमंत्रकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या भावनांना महत्व दिले गेले पाहिजे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले.
· मुलांच्या भावविश्वात घडणाऱ्या घटनांचे अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
· काही शिक्षण तज्ञांनी आणि शिक्षकांनी केलेले प्रयोग देखील त्यांनी सांगितले.
· त्यांनी स्कुल हा शब्द मुळ ग्रीक शब्द स्कोल या पासून आला आहे असं सांगितलं. याचा अर्थ विश्रांती घेणे किंवा मनाची ग्रहणशील अवस्था अशी आहे आणि त्यामुळे नकळतच शाळांवर खूप मोठी जबाबदारी आहे
· त्यांनी शहरातील मुलींना धरणाच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी नेल्यावर तेथील मुलींना बघून या शहरातील मुलींमध्ये कसे बदल झाले हे त्यांनी सांगितलं
· शिक्षणात कृतिशीलता असली पाहिजे हे त्यांनी सांगितल
· त्यांनी मुलांना अरुण देशपांडे यांच्या संस्थेमध्ये सहलीसाठी नेल्या नंतर आलेले अनुभव देखील सांगितले 
· शेवटी एक कृती घेऊन मुलं तुमचं ऐकून नाही तर तुम्हाला बघून शिकतात हे त्यांनी पटवून दिलं.

सत्र २ : कुमार निर्माण उपक्रमाची ओळख
वक्ते: शैलेश जाधव
उद्देश: कुमार निर्माण  तपशीलात समजून घेणे
पुढील सत्रात कुमार निर्माणची मुलभूत माहिती निमंत्रकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शैलेशने केले. ते सांगताना त्याने कुमार निर्माणची गरज, पार्शवभूमी, संकल्पना, उद्दिष्ट, शैक्षणिकप्रक्रिया आणि कार्यप्रणाली तपशीलवार मांडली. कुमार निर्माणची गरज आणि पार्श्वभूमी सांगताना, आजची सामाजिक परिस्थिती , तरुण त्यातून निर्माण आणि मग कुमार निर्माण असा प्रवास उलगडून दाखवला.
· निळा – लाल समुद्र’ ही संकल्पना वापरून आजच्या तरुणांमधील स्पर्धा समजावून सांगितली.
· कुमार निर्माणची गरज समजावून सांगताना बऱ्याचश्या शाळांत मूल्यशिक्षण तसेच चारित्र्य संवर्धनावर भर दिला जात नसल्याने मुले एकलकोंडी तसेच समाजापासून दुरावत जाण्याची शक्यता वाढत आहे हे पटवून सांगितले.
· कुमार निर्माणचे मूल्य समजावून सांगताना निमंत्रकांचे काही गट केले. त्यांना असे सांगितले की, ‘असे गृहीत धरा की तुम्ही एका या खोलीत पुढचे काही वर्ष राहणार आहात तर अशा वेळी तुम्ही कोणती १० मुल्ये प्रामुख्याने ठरवला त्यांची यादी बनवा.’ याच्या मदतीने त्यांना कुमार निर्माणच्या मुल्यांची ओळख करून दिली.

अभ्यासवर्ग व सादरीकरण
उद्देश: महत्त्वपूर्ण लेख व पुस्तकांचा परिचय व अभ्यास
वरील सत्रानंतर निमंत्रकांना शिक्षणाशी आणि शिक्षणपद्धतीशी निगडीत काही लेख गटात वाचायला दिले आणि ते लेख अभ्यासून संक्षिप्त स्वरुपात सर्वांसमोर मांडण्याची संधी सर्वाना देण्यात आली. त्याप्रमाणे पाच गटांनी त्यांचे लेख सर्वांसमोर मांडले. 
लेख: शिक्षण विचार—विनोबा, मनोहर—विनोबा, रचनावादी शिक्षण—रमेश पानसे

सत्र ३ : खेळांची मौज
वक्ते: केदार आडकर
उद्देश: विविध खेळ व त्यातून होणारे शिक्षण
केदारने सहभागींचे चार गट करून त्यांचा खेळ घेतला आणि नंतर खेळातून काय शिकायला मिळाले यावर चर्चा घेतली. यातून निमंत्रकांना खेळांचा उपयोग मुलांसोबत चर्चेसाठी कशाप्रकारे करता येईल हे तर कळलेच त्यासोबतच ते स्वतः ही या खेळातून बरेच काही शिकले.
खेळ: दोन गट करून, हातात हात धरून गोलात उभे राहायचे. हात न सोडता सायकलचे टायर एकमेकांमधून पुढे पाठवायचे
या खेळातून विशेष करून सहकार्य यावर जास्त भर देण्यात आला.

सत्र ४ : दैनंदिनी
वक्ते: केदार आडकर
उद्देश: दिवसभरातील घडामोडींवर विचार
रात्रीच्या जेवणानंतर केदारने रोजची रोजनिशी कशी लिहावी व ती लिहिण्याचे महत्व काय आहे हे सर्वांना सांगितले.
· मागे घडलेल्या घटनांचा मागोवा घेता येतो
· स्वतःच मूल्यमापन करता येते
· झालेले शिक्षण नोंदवून ठेवेता येतं जेणेकरून ते पुढे पुन्हा उपयोगी पडेल
त्यानंतर सर्वांनी रोजनिशी लिहिली. सहभागींनी शांतपणे वेळ घेऊन आणि विचार करून रोजनिशी लिहिली. बरेच निमंत्रक पहिल्यांदाच रोजनिशी लिहित होते.

११ डिसेंबर २०१६
दुसऱ्या दिवसाची सुरुवात शैलेश आणि अमोल यांनी ‘तू जिंदा है...’ या गीताने केली. त्यानंतर कालच्या दिवसात झालेले शिक्षण आणि जाणीवा याबद्दल शेअरिंग झाले. यात बहुतेक सहभागींनी शेअरिंग केले.

उजळणी
उद्देश: आदल्या दिवशी झालेल्या शिक्षणाबद्दल शेअरिंग
आदल्या दिवशी झालेल्या सत्रांची उजळणी करून काय शिक्षण झाले याविषयी काही निमंत्रकांनी शेअरिंग केले. त्यासोबतच दिवसभरात भेटलेल्या इतर निमंत्रकांकडूनही शिकायला मिळाल्याचे काही निमंत्रकांनी शेअर केले. त्यातून इतरानाही त्या गोष्टी शिकायला मिळाल्या 

सत्र १ : आपली  मुलभूत मुल्ये
वक्ते: प्रफुल्ल शशिकांत
उद्देश: कुमार निर्माणअंतर्गत मुलभूत मुल्ये, त्यांचे महत्त्व व अर्थ समजून घेणे
कुमार निर्माणच्या उद्दिष्टांमध्ये असलेल्या मूल्यांचे महत्व आणि त्यांची निवड करण्याची प्रक्रिया प्रफुल्लने मांडली. त्याने त्याच्या सत्रात विविध शास्त्रीय उदाहरणे घेऊन सहभागींना विचार करण्यास प्रवृत्त केले. विविध नैतिक कोड्यांतून त्याने सहभागींना डोकं लावायला भाग पाडले. आपले विचार कसे आपल्या मुल्यांवर आधारित असतात आणि म्हणूनच मूल्य व्यवस्था चांगली असणे कसे गरजेचे आहे हे त्याने सांगितले.
· रेल्वे रुळावर उभी असलेली पाच माणसे आणि कमी वापरल्या जाणाऱ्या रुळावर उभा असलेला एक माणूस या नैतिक कोड्याचा उपयोग त्याने केला
· या कोड्यात विविध बदल करून मग सह्भांगीचा प्रतिसाद नोंदवला
· कोड्यातील बदलांसोबत बदलणाऱ्या मतांमागे मुल्ये कशी महत्वाची भूमिका बजावतात हे पटवून दिले.
· त्या नंतर रिचर्ड पार्करची केस सांगून त्यावर दोन गटांमध्ये वादविवाद घेतला
· या सर्व निर्णयांमध्ये मुल्ये कशी महत्वाची भूमिका बजावतात हे त्याने सांगितले
· कुमार निर्माणची मुल्ये, ती मुल्ये निवडण्यामागची कारणमीमांसा त्याने समजावून सांगितली
हे सांगताना त्याने ‘विचारांमधली नैतिकता’ तर महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर कुमार निर्माणच्या दृष्टीने ‘कृतीतील नैतिकता’ जास्त महत्त्वाची आहे यावर भर दिला.

सत्र २ : शालेय वयोगटातील मुलांची विकासप्रक्रिया
वक्ते: शुभदा जोशी (कार्यकर्त्या – खेळघर प्रकल्प, पुणे)
उद्देश: शालेय वयोगटातील मुलांच्या वाढीची प्रक्रिया व त्याचे गुणधर्म समजून घेणे
· मेंदूचे विभाग, त्यांचे कार्य, मुलांमध्ये वयानुसार मेंदूमध्ये होणारे बदल, आणि त्यानुसार मुलांचे बदलणारे स्वभाव समजावून सांगितले
· मुलांची काही स्वभाव वैशिष्ट्ये सांगितली
· मुलांशी बोलताना काय लक्षात घेतले पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे हे निमंत्रकांकडून चर्चेच्या माध्यमातून काढून घेतले.
· यावर आधारित एक रोल प्ले प्रणाली आणि शोभा ताईंनी सादर केला त्यातून मुलांशी संवाद कसा साधावा हे सांगितलं

सत्र ३ : कुमार निर्माणअंतर्गत मुलांचे कृतीकार्यक्रम – भाग १
वक्ते: शुभदा जोशी (कार्यकर्त्या – खेळघर प्रकल्प, पुणे)
उद्देश: मुलांमध्ये कृतीकार्यक्रमाची बीजे कशी रोवावीत 

गटासोबत काम करताना मुलांशी चांगले संबंध कसे प्रस्थापित करावे आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा कशी घडवून आणावी याविषयी त्यांनी प्रात्यक्षिके घेऊन समजावून सांगितले. मुलांसोबत काम करताना उपयोगी पडतील असे अनेक खेळ त्यांनी शिकवले.
· सुरुवातीला मुलांची ओळख घेण्यासाठी स्वतःचे नाव व आपला चांगला गुण सांगायला लावावा असं त्यांनी सुचवलं, पुढे स्वतःचं नाव आणि त्यांच्या बाजूला उभा असलेल्या व्यक्तीचा चांगला गुण सांगायला लावावा म्हणजे इतरांबद्दल आदर निर्माण होतो असं त्यांनी सुचवलं
· मुलांना गटात टोपण नावाने बोलावणे, समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ओळखणे अशाही काही कृती गटात घेण्यासाठी त्यांनी सुचवल्या.
· संवाद गट कसा घ्यावा यासाठी त्यांनी खेळघराच्या संवाद गटाचे काही विडीयो दाखवले

सत्र ५ : कृतीतून शिक्षण
वक्ते: अमोल शैला सुरेश
उद्देश: कृतीतून शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे
कुमार निर्माणच्या शिक्षण पद्धतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या ‘कृतीतून शिक्षण’ याविषयी अमोलने मांडणी केली. कृती शिक्षणाची गरज, उपयोगिता, आणि त्यातील तांत्रिक बाबींचे स्पष्टीकरण त्याने दिले. हे सांगताना त्याने कृती शिक्षणाची प्रथम मांडणी करणाऱ्या ‘रेग रेवन’  पासून सुरवात करून सर्व सखोल माहिती पुरवली. त्यासाठी त्याने एका खेळाची देखील मदत घेतली.
कृतीतून शिक्षणाचे असे काही सिद्धांत अमोलने सर्वांसमोर मांडले

सत्र ६ : कथाकथनाची कला
वक्ते: हरीश कुलकर्णी
उद्देश: कथाकथनाची कला व गुणधर्म समजून घेणे, कुमार निर्माणअंतर्गत त्याचे विविध उपयोग
यानंतर हरीश कुलकर्णी यांनी निमंत्रकांना कथा-कथनाची कला यावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी खेळ आणि गोष्टींचा भरपूर उपयोग करून सहभागींना गुंतवून ठेवले. आपल्या किंवा मुलांच्या अनुभवातून गोष्ट कशी निर्माण करावी/बनवावी हे त्यांनी उदाहरणांसकट समजावून सांगितले.
· त्यांनी सर्वांना गोलात उभं करून एक चेंडू कुठेही कसाही एकमेकांकडे फेकायला लावला. पहिले फेकणाऱ्याने एक वाक्य म्हणायचं आणि तो ज्याच्याकडे चेंडू फेकेल त्याने त्या पुढे एक वाक्य जोडायचं असा गोष्ट बनवायचा खेळ त्यांनी घेतला
· स्पष्ट बोलण्यासाठी एक व्यायाम देखील त्यांनी सुचवला
· स्वतःच्या अनुभवाची प्रभावी गोष्ट कशी बनवायची हे देखील त्यांनी प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले
· एखाद्या गोष्टीचा आपले सगळे ज्ञानेंद्रिये उघडे ठेऊन आस्वाद घ्यावा हेही त्यांनी सांगितले
  
सत्र ७ : चित्रपटाचा उपयोग – कृती
वक्ते: केदार आडकर व प्रफुल्ल शशिकांत
उद्देश: चित्रपट बघताना चर्चा सुरु करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करावा
केदारने चित्रपट कसा बघावा आणि चित्रपटाच्या माध्यमातून चर्चेला कशाप्रकारे सुरवात करता याविषयी निमंत्रकांशी संवाद साधला. त्याने Gods must be crazy – भाग २ हा सिनेमा दाखवून त्यानंतर त्यावर चर्चा घेतली.
त्या सिनेमातील वाळवंटात पाण्याची टंचाई असते तर त्यावरून पाण्यावर चर्चा सुरु करता येऊ शकते असे त्यांने सांगितले इतरही अनेक मुद्दे चर्चेतून पुढे आले.
रात्री सर्वांनी रोजनिशी लिहली आणि त्यानंतर उरलेला सिनेमा पाहिला.

१२ डिसेंबर २०१६
उजळणी
उद्देश: आदल्या दिवशी झालेल्या शिक्षणाबद्दल शेअरिंग

सत्र १ : कुमार निर्माणअंतर्गत तांत्रिक मुद्दे
उद्देश: कुमार निर्माणचे काही उर्वरित मुद्दे
वक्ते: प्रणाली
या सत्रामध्ये प्रणालीने कुमार निर्माण मधील महत्वाच्या अशा काही तांत्रीक बाबींकडे लक्ष वेधलं व त्यावर चर्चा केली
· बैठक
· नोंदवही
· भरारी
· कुमार निर्माण कृती समितीशी करायचा संपर्क
अशा विषयांबद्दल प्रणाली ने चर्चा केली आणि त्यांचे महत्व समजावून सांगितले.

सत्र २ : कुमार निर्माणअंतर्गत मुलांचे कृतीकार्यक्रम – भाग २
उद्देश: मुलांमध्ये कृतीकार्यक्रमाची बीजे कशी रोवावीत, त्यासाठी नाट्यकलेचे विविध उपयोग व सराव
वक्ते: हरीश कुलकर्णी
कालचे कथाकथनाचे सत्र पुढे चालवत नाटकाचा उपयोग कसा करून घेता येईल हे सांगितले. यासाठी निरीक्षण कसे महत्त्वाचे असते हे त्यांनी मजेशीर उदाहरणाद्वारे दाखवून दिले. त्यांच्या या सत्रातही त्यांनी अनेक खेळ आणि प्रात्यक्षिकांचा उपयोग केला.
· सर्वप्रथम त्यांनी वार्मअप घेतला. त्यात त्यांनी विविध गतीने कक्षात चालायला सांगितले वेग मध्ये मध्ये कमी जास्त करून शेवटी सर्वांना शांत उभे रून आजूबाजूचे आवाज ऐकायला सांगितले. त्यावर चर्चा घेतली.
· त्यांनी सर्वांना बाहेर पाठवून एकाला आत थांबवले आणि त्याला छोटीशी कृती करायला सांगितली. आणि मग एक एकाला बोलावून तीच कृती जशीच्या तशी करायला सांगितली.
· यातून त्यांनी आपण कसे निरीक्षणात कमी पडतो आणि मग शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोचेस्तोवर त्या कृती मध्ये किती बदल होतात ते दाखवून दिले.
· त्या नंतर एक विषय देऊन त्यावर रोल प्ले उपस्थितांना करायला लावला.
· अशा विविध कृतींमधून त्यांनी नाटक कसं प्रभावीपणे वापरता येऊ शकतं ते सांगितलं

सत्र २ : कुमार निर्माणअंतर्गत मुलांचे कृतीकार्यक्रम – भाग ३
उद्देश: मुलांमध्ये कृतीकार्यक्रमाची बीजे कशी रोवावीत, त्यासाठीचे विविध मार्ग समजून घेणे
वक्ते: प्रफुल्ल शशिकांत
या सत्रात प्रफुल्लने एखादे मूल्य मुलांमध्ये रुजवायचे असेल तर त्यासाठीची कृती कशाप्रकारे सुरु करता येईल या विषयी चर्चा केली. यात त्याने अनेक उदाहरण घेतले. काही आता पर्यंत झालेल्या कृती सांगून त्या कशाप्रकारे मुलांना सुचल्या हे सांगितले व त्यातून कोणती मुल्ये मुलांमध्ये रुजायला मदत झाली हे सांगितलं. निमंत्रकांनी सांगितलेल्या मूल्यांनुसार कशाप्रकारे कृती कार्यक्रम मुलांना सुचू शकतो, त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं आणि त्यासाठी निमंत्रकांनी काय केले पाहिजे हे सविस्तर सांगितले.
पुढील ३ महिन्यांचे नियोजन
उद्देश: पुढील ३ महिन्यांचे व्यक्तिगत व सामुहिक ढोबळ नियोजन करणे
प्रफुल्ल ने घेतलेल्या सत्रातून कृती कार्यक्रम कशा प्रकारचे असावे आणि ते कसे सुरु करावे या बाबत निमंत्रकांना स्पष्टता आली. पुढील तीन महिन्यात ढोबळमानाने कोणते कृती कार्यक्रम घडले पाहिजे हे प्रत्येक निमंत्रकाने या सत्रात कार्डशीट वर लिहले यातून त्यांना अधिक स्पष्टता येण्यास मदत झाली जिथे-जिथे निमंत्रकांना अडचण येत होती तिथे कुमार निर्माण कृती समिती ने मदत केली व अशाप्रकारे सर्व निमंत्रकांनी पुढील तीन महिन्यात करायच्या कृती कार्यक्रमांचा आराखडा तयार केला.
मुल्यांकन, अभिप्राय व प्रश्नोत्तरे
कार्यशाळेतील सत्रांचे व एकूणच कार्यशाळेचे मूल्यमापन करण्यासाठीचा मुल्यांकन अर्ज भरून घेण्यात आला. त्यासोबतच कार्यशाळेतील व्यवस्था व आयोजन या बाबत अभिप्राय घेण्यात आला. त्यासोबतच निमंत्रकांना पडलेल्या प्रश्नांवर चर्चा देखील घेण्यात आली.

समारोप
‘हम होंगे कामयाब...’ या गीताद्वारे कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
No comments:

Post a Comment