Sunday, 1 January 2017

चॉकलेट पार्सल


आपल्या कार्यशाळेत आपण बघितलंच होतं की वर्षभर येणाऱ्या विविध सण आणि राष्ट्रीय सणांचादेखील उपयोग आपण विविध कृती कार्यक्रमांची सुरुवात करण्यासाठी करू शकतो.
त्या प्रमाणे या महिन्यात भारताचा प्रजासत्ताक दिन येत आहे. त्याचा उपयोग आपण कृती कार्यक्रम सुरु करण्यासाठी आणि कुमार निर्माणच्या मुल्यांची रुजवणूक मुलांमध्ये करण्यासाठी कसा करू शकतो याबद्दल कल्पना येण्यासाठी खालील संवाद काळजीपूर्वक वाचा..


किरण: प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा!
तुम्ही: तुलादेखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! पण प्रजासत्ताक दिन म्हणजे काय रे किरण?
किरण: सोप आहे दादा, हा आपला राष्ट्रीय सन आहे.
तुम्ही: ते आहे खरं. पण तो का आहे? काय झालं होतं आजच्या दिवशी?
किरण: ते काही माहित नाही बुवा मला.
तुम्ही: मग तर आपल्या शुभेच्छांमध्ये काही मजा नाही गडे. तू जरा माहिती काढ बरं की काय आहे प्रजासत्ताक दिन?
(पुढच्या भेटीत)
किरण: दादा! मिळालं उत्तर. मी बाबांना विचारलं. आजच्या दिवशी भारताने आपलं संविधान स्वत:ला अर्पण केलं होतं, त्यानिमित्त आज आपला राष्ट्रीय सन प्रजासत्ताक दिन आहे.
तुम्ही: अजून कुठले बरं असतात राष्ट्रीय सण? आणि संविधान म्हणजे तरी काय?
किरण: स्वातंत्र्य दिन१५ ऑगस्ट हा पण एक राष्ट्रीय सण आहे!
तुम्ही: स्वातंत्र्य दिन तर समजला बुवा मला पण प्रजासत्ताक दिनाचं का बरं इतकं विशेष महत्व? आणि स्वातंत्र्य दिन जास्त महत्त्वाचा की प्रजासत्ताक दिन?
किरण: मला तर काही माहित नाही गडे.
तुम्ही: हम्म ! मला वाटतं तू अजून थोडी नीट माहिती घे बरं..
(पुढच्या भेटीत)
किरण: दादा मी आमच्या इतिहासाच्या आणि नागरिकशास्त्राच्या शिक्षकांना विचारून आलो. आता मात्र सगळी माहिती काढलीये नीट.
तुम्ही: सांग बरं!
किरण१५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला पण नागरिकांना त्यांचे अधिकार २६ जानेवारीला संविधान अंमलात आल्यापासून मिळालेत्याआधी आपल्या नागरिकांच्या अधिकारात स्पष्टता नव्हती.
तुम्ही: अच्छा ! म्हणजे नागरिकांना काही अधिकार असतात तर. कुठले बरं अधिकार असतात नागरिकांना?
किरण: दादा, खूप सारे अधिकार असतात., म्हणून तर आपण स्वतंत्र आहोत. पण आता मी विसरलो..

 तुम्ही: जसा आपला भारत देश आणि त्याचे आपण नागरिक म्हणून आपल्याला काही अधिकार असतात. तसे आपण आपल्या कुटुंबाचे सदस्य, आपल्याला कुटुंबात काही अधिकार असतील का रे?
किरण: अरेच्चा ! हो की.
तुम्ही: चल बरं जरा यादी करुया त्या अधिकारांची
(यादी काढल्यानंतर)
तुम्ही: किरण, गटातील तुझ्यासारख्या सर्वांच्या यादीवर आपण चर्चा करू आणि मग काही अधिकार फायनल ठरवू.
 (मुलांची चर्चा झाली आणि यादी ठरली)
तुम्ही: यादी तर झकास झाली. पण मला एक शंका आहे. आपल्या घरात आपल्यासारखेच इतर पण सदस्य आहेत. किरण तुझी मोठी बहिण पण आहे ना रे आणि तुझी आईपण. त्यांना पण काही अधिकार असतील ना?
किरण: हो की. असणारच..
तुम्ही: आपण एक मजा करू, आपण त्यांच्यासाठी पण एक यादी बनवू. आणि पाहू काय होतं ते.
(यादी झाल्यावर)
किरण/तुम्ही: अरेच्चा ही यादी पाहून असं वाटतं की आईचे अधिकार तिला मिळायचे असतील तर मला पण काही काम करावे लागतील. जसं माझे अधिकार मिळवताना आईला काही काम करावे लागणार होते.
तुम्ही: याचा अर्थ अधिकारासोबतच आपले काही कर्तव्य सुद्धा असतात. आणि घरात असतात तसे नागरिक म्हणून पण असतीलच.
किरण: हो दादा, आमच्या नागरिक शास्त्राचे सर सांगत होते असं काहीतरी..
तुम्ही: चला तर मग आपल्या कर्तव्याची पण एक यादी बनवूया आपआपल्या घरासाठी. आणि परत त्यावर चर्चा करून ठरवू की आपण आपली कर्तव्ये पार पडतो की नाही!
(यादी झाल्यावर)
किरण: झाली बुवा ही यादी. आपले अधिकार आणि कर्तव्ये!
तुम्ही: खूप छान! तर मुलांनो संविधान म्हणजे देखील आपण सर्व नागरिकांच्या अधिकार आणि कर्तव्यांचं एकत्रित मोठं पुस्तक.
किरण: दादा! मला एक कल्पना सुचली. मी आमच्या घरासाठी किंवा आपल्या गटासाठी एक संविधान बनवू का?
तुम्ही: अरे वा! मस्त कल्पना आहे. पण त्याआधी एक काम करू. आपल्या भारताचं संविधान कुणी आणि कसं तयार केलं ते शोधू बरं. मग ठरवू काय करायचं ते.
(पुढच्या बैठकीत)
किरण: दादा. आपल्या भारताचं संविधान खूप साऱ्या लोकांनी, प्रतिनिधींनी मिळून बनवलं आहे.
तुम्ही: यातून तुझ्या काय लक्षात आलं?
किरण: मला वाटतं माझ्या घरासाठीचं संविधान मी एकटा नाही बनवू शकत, ते योग्य होणार नाही. त्यात घरच्या सर्वांचा सहभाग हवा.
तुम्ही: एकदम बरोबर! चला तर मग लागू कामाला.

No comments:

Post a Comment