Monday 29 February 2016

गोष्ट एका बालयोद्ध्याची!

१९८३ साली पाकिस्तान मधील मुर्दिक्त नावाच्या गावी एका गरीब कुटुंबात ‘इकबाल मसिह’ या मुलाचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबात आपल्यासारखेच आई-बाबा होते, त्याच्या बहिण-भावंडांचा गोंधळ चाललेला असायचा. त्याची आई गावातील लोकांकडे घरकाम करून कुटुंब चालवायची. परंतु इतक्या कमी पैशात घर चालवताना तिची खूप दमछाक होत असे. आई कामामुळे बाहेर असल्याने इकबालची मोठी बहिण त्याचा सांभाळ करत असे, त्याची काळजी घेत असे.
इकबाल चार वर्षांचा असतना त्याच्या मोठया दादाचे लग्न ठरले, परंतु लग्न-समारंभ पार पडण्यासाठी त्याच्या घरच्यांकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्यासमोर एकच पर्याय होता तो म्हणजे गावातील स्थानिक सावकार! इकबालच्या गावातील या स्थानिक सावकाराचा स्वतःचा चटया-गालिचे बनवण्याचा कारखाना होता. इकबालच्या दादाच्या लग्नासाठी त्या स्थानिक सावकाराने ६०० रुपये इकबालच्या कुटुंबाला कर्ज म्हणून दिले. पण ते देताना स्थानिक सावकाराने अशी अट घातली की कर्ज संपेपर्यंत त्यांच्या लहान मुलाला म्हणजे इकबालला सावकाराच्या कारखान्यामध्ये कामाला ठेवावे लागेल. नाईलाजाने इकबालच्या कुटुंबाने या गोष्टीला होकार दिला आणि इकबाल त्या सावकाराला अवघ्या ६०० रुपयांत विकल्या गेला. हुंदडण्याच्या - खेळण्याच्या वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी इकबालच्या आयुष्यातील दुष्ट्चक्राला सुरवात झाली.
चार वर्षांचा इकबालचे कोवळे हात कारखान्यातल्या यंत्रांवरून फिरायला लागले. त्याच्यासोबत त्याच्या आधी आलेली बरीच लहान मुले तिथे काम करत होती. पहिलं एक वर्ष इकबालला बिनपगारी काम करावं लागलं आणि या एका वर्षात त्याच्या जेवणाचा सगळा खर्च त्याच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाच्या रकमेत मिळवल्या गेला. व यासोबतच कर्जावरील व्याजाची रक्कमही कर्जात मिळविली जात असे. हे कमी की काय म्हणून या वर्षात काम करताना इकबालकडून झालेल्या चुकांचा दंडही त्याच कर्जात मिळवल्या गेला आणि एकूण कर्ज कमी न होता उलट वाढीला लागलं. पुढील वर्षात इकबालच्या कामावर त्याचं कुटुंबाने सावकाराकडून अजून एकदा कर्ज घेतलं आणि हे दुष्टचक्र संपण्याच्या ऐवजी अधिकच वाढलं.

या काळात इकबाल १० वर्षांचा झाला आणि कर्जाची रक्कम वाढून १३,००० रुपये झाली. इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक मुलांना खूप भयानक परिस्थितीत काम करावं लागत होतं. त्यांना दिवसभर एका लाकडी फळीवर पायाच्या तळव्यांवर बसून, पुढे वाकून चटयांमध्ये लाखो गाठी माराव्या लागत असत. प्रत्येक धागा निवडून त्याची काळजीपूर्वक गाठ बांधण्यासाठी या मुलांना दिवसभर अशाच पद्धतीने बसून राहावे लागत असे. त्यांना एकमेकांशी बोलायची परवानगी नसायची. जर चुकून एखाद्या मुलाने दिवसा स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केलाच तर तिथला शिपाई यंत्राच्या समोर बसलेल्या मुलाला मारायचा आणि बऱ्याचदा अवाढव्य यंत्रात धागा कापल्या जाण्याच्या ऐवजी मुलांची बोटे अडकून तुटत असत.
इकबालने इतक्या भयानक वातावरणात दररोज १४ तास आणि आठवडयातले ६ दिवस काम केले. तो ज्या खोलीत काम करत असे ती खोली प्रचंड तापलेली असायची आणि धाग्याची गुणवत्ता घसरू नये म्हणून त्या खोलीच्या खिडक्याही उघडल्या जायच्या नाहीत. आणि दिवसभर या मुलांच्या डोक्यावर दिवे लोंबकळत असायचे.
या सगळ्यात जर मुलांना घरची आठवण आली, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, ते आजारी पडले तर त्यांना शिक्षा दिली जायची. खूप निर्दयी अशा शिक्षा असायच्या ज्यात प्रचंड शारीरिक मारझोड, बांधून ठेवणे, एकट्या मुलाला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवणे, दोरीला उलटं टांगणे अशा गोष्टींचा समावेश होता. इकबालला बऱ्याचदा वरील काही कारणांमुळे अशा शिक्षा झाल्या होत्या. आणि या सगळ्या कामासाठी त्याला खूप कमी पैसे देण्यात आले.
सहा वर्ष गालिचे-चटया बनवण्याचे काम केल्यानंतर इकबालला एके दिवशी Bonded Labor Liberation Front (BLLF) (असा गट जो इक़बालसारख्या लहान मुलांची वेठबिगारीतूसुटका करण्यासाठी काम करतो) विषयी कळलं. इकबाल त्याचं काम संपवून कसातरी त्या गटाच्या  बैठकीत जाऊन बसला. त्या बैठकीत त्याला कळलं की पाकिस्तान सरकारने १९९२ मध्येच पेशगी बंद केली आणि सरकारने या स्थानिक सावकारांचं लोकांवरचं कर्जही रद्द केलंय.
तेव्हा इकबालला लक्षात आलं की त्याची आत्तापर्यंत तिथून सुटका व्हायला हवी होती. मग तो बी.एल.एल.एफ चे अध्यक्ष ईशान उल्लाह खान यांना भेटला आणि त्याची कहाणी त्यांना सांगितली. अध्यक्षांनी इकबालला कागदपत्रांची पूर्तता करायला मदत केली आणि त्याच्या कारखानदाराच्या लक्षात आणून दिले की आत्तापर्यंत त्याची सुटका व्हायला हवी होती. आणि इकबालने फक्त त्याच्याच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मुलांच्याही सुटकेची मागणी केली.
शेवटी इकबालची सुटका झाली आणि तो बी.एल.एल.एफ च्या शाळेत शिकू लागला. त्याला शिकण्याची खूप आवड होती. चार वर्षांचा अभ्यासक्रम त्याने अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केला. आणि तिथून त्याने बी.एल.एल.एफ च्या चळवळीत भाग घेऊन वेठबिगारीत अडकलेल्या मुलांच्या बाजूने लढण्यास सुरवात केली. खरंतर ही मोहीम बरीच धोकादायक होती परंतु तरीही इकबालने तो काम करत असलेल्या कारखान्यातून अशी माहिती गोळा केली की तो कारखाना बंद पाडल्या गेला आणि हजारो लहान मुलांची त्यातून सुटका झाली.
हळूहळू इकबालने बी.एल.एल.एफ च्या बैठकींत तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणी या विषयावर बोलण्याची सुरवात केली. तो त्याच्या अनुभवांविषयी बोलायचा. त्याला एक वेठबिगारी कामगार म्हणून झालेल्या त्रासाविषयी तो बोलायचा. या ६ वर्षांच्या कामामुळे लहानग्या इकबालचे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर प्रचंड नुकसान झाले होते. या सर्व गोष्टी तो त्याच्या भाषणांतून प्रकर्षाने मांडायचा. अशी त्याची बालमजुरांचे प्रश्न मांडणारी भाषणे जगभर झाली.
१० वर्षांचा असूनही त्यांची उंची आणि वजन खूप कमी होतं. या कारणामुळे लहानश्या इकबालला बऱ्याच व्याधींनी ग्रासलं. त्याला मूत्राशयाचा त्रास, संधिवात, पाठदुखी यासोबतच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या सगळ्या कामात इकबालचं बालपण संपूर्णपणे हरवल्या गेलं. मात्र त्याचं तरुणपण त्याला हरवू द्यायचं नव्हत. त्याच्या बी.एल.एल.एफ मधील कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतल्या गेली आणि १९९४ मध्ये त्याला अमेरिका सरकारकडून Reebok Human Rights Award मिळाले.
एवढं जोखमीचं काम करत असल्याने इकबालला बऱ्याचदा धमकीची पत्र देखील यायची परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
१६ एप्रिल १९९५ रोजी, रविवारी इकबाल आपल्या कुटुंबासोबत इस्टर साजरा करण्यासाठी त्याच्या गावी आलेला होता. त्या दिवशी त्याने त्याच्या कुटुंबासोबत खूप मजा केली. आणि जरा वेळाने त्याच्या दोन भावंडासोबत तो त्याच्या काकांना भेटायला घराबाहेर पडला. अचानक समोरून कुणीतरी इसम गाडीवर आला आणि त्याने इकबालवर गोळ्या झाडल्या. यातच इकबालचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःला जे सहन करावं लागलं ते इतर मुलांना सहन करावं लागू नये, इतर मुलाचं लहानपण हरवू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या या बालयोध्याचा वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी खून करण्यात आला.

इकबाल अजरामर झाला. परंतु आजही वेठबिगारी करणाऱ्या मुलांच्या समस्या कमी झाल्या नाहीयेत. खासकरून पाकिस्तान आणि भारतातील लाखो मुले कारखान्यांत काम करतात. जिथे गालिचे, चटया, विटा, बिड्या, फटाके आणि कपडे बनवले जातात. इकबालच्या जाण्यानंतर त्याच्या नावाने बऱ्याचश्या सकारात्मक गोष्टींची सुरवात झाली.  इकबाल बऱ्याच संस्था सुरु करण्यामागील प्रेरणा ठरला. कॅनडा युथ मुव्हमेंटने सुरु केलेली ‘फ्री द चिल्ड्रन’ नावाची संस्था, ‘इकबाल मसिह शहीद चिल्ड्रन फौंडेशन’ ज्यांनी पाकिस्तानात २० शाळा सुरु केल्या. १९९४ मध्ये इकबालने ब्रॉड मिडोज मिडल स्कूलला भेट देऊन ७ वीच्या मुलांसोबत संवाद साधला होता. ज्यावेळी त्या मुलांनी इकबालच्या खुनाबद्दल ऐकलं तेव्हा त्यांनी त्याच्या स्मरणार्थ पाकिस्तानमध्ये शाळा बांधण्यासाठी पैसे जमवले. सन २००० मध्ये इकबालच्या नावाने ‘द वर्ल्डज चिल्ड्रन्स प्राईज फॉर द राईटस ऑफ द चाइल्ड’ चे उद्घाटन जिनेवामध्ये झाले. २००९ मध्ये युनायटेड स्टेटस् कॉंग्रेसने वार्षिक ‘इकबाल मसिह अवार्ड फॉर द एलीमीनेशन ऑफ चाइल्ड लेबर’ ची स्थापना केली. २०१४ साली कैलाश सत्यार्थीनी त्यांना मिळालेला नोबेल सन्मान इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक योद्ध्यांना समर्पित केला आहे.





  

No comments:

Post a Comment