Monday, 29 February 2016

भेट वृत्तांत

कुमार निर्माण टीमतर्फे प्रणाली व शैलेश यांनी कुमार निर्माणच्या काही गटांना भेटी दिल्या. सर्व गटांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दलचा हा वृत्तांत.
पवनी, भंडारा
गडचिरोलीला येथून निर्माणचे शिबीर करून आम्ही पवनीच्या गटाला भेट द्यायला गेलो. हा एका शाळेतील गट आहे. परिपाठाच्या वेळी आम्ही शाळेत पोचलो आणि परिपाठ झाल्यानंतर मुलांसोबत संवाद साधायला सुरवात केली. २० मुलांच्या या गटात मुले-मुली समप्रमाणात आहेत. सुरवातीला आम्ही छानश्या खेळाच्या मदतीने मुलांशी ओळख करून घेतली. आम्ही येणार म्हणून या गटाने आमच्यासाठी दोन नाटुकले बसवले होते. आमची ओळख झाल्यानंतर मुलांनी दोन्ही नाटुकले सादर केले. खूप संवेदनशील असे विषय मुलांनी निवडले होते. त्यात एका गटाचा विषय होता स्त्री-भ्रूणहत्यातर दुसऱ्या गटाचा स्वच्छतेचं महत्व’. खूप साध्या आणि सोप्या संवादातून मुलांनी हे विषय हाताळले. सादरीकरणाच्या वेळी मुलांमधला आत्मविश्वास खूप प्रकर्षाने जाणवला. यानंतर मग आम्ही पुन्हा गटात चर्चा करायला बसलो आणि मुलांनीच विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करता करता मुलांनी कुमार निर्माण पुन्हा एकदा नीट समजून घेतले. नंतर मग मुलांनी आत्तापर्यंत केलेल्या कृतिकार्यक्रमांबद्दल सांगितले. मुलांनी गटात एक सुई-दोऱ्याची बरणी ठेवलीये आणि त्यात नेलकटर पण ठेवलंय. लहान मुलांच्या शर्टला बटने लावणे आणि त्यांची नखे कापणे या उद्देशाने ती बरणी मुलांनी ठेवलीये. स्नेहसंमेलनासाठी मुलांनी प्लास्टिकचा नवीन फलक न बनवता परिसरातील प्लास्टिक वेचून त्यापासून सुंदर असे शाळेचे नाव बनवून कापडावर लावले होते.
यापुढे कुठले कृतिकार्यक्रम करावे यावर मुलांनी आमच्याशी चर्चा केली आणि ठरवले देखील. त्यानंतर एक मजेदार गेम घेऊन पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून आम्ही तेथून निघालो.

मी माणूसगट आणि मैत्रगट नाशिक
मी माणूसगट आणि मैत्रगटाला भेटायला आम्ही नाशिकच्या महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या प्रयोगशाळेत पोहचलो. तेथील मुलांचे प्रयोग आणि त्यावरील चर्चा प्रथम आम्ही ऐकली. मुले खेळाच्या माध्यमातून विज्ञान शिकत होते. अजित टक्के सरांसोबत गप्पा मारून मग आम्ही मुलांशी गप्पा मारायला खाली मैदानात आलो. मुलांसोबत गटातील काही मुलांचे पालक पण उपस्थित होते. मग आम्ही गटात बसून सगळ्यांशी खेळाच्या माध्यमातून ओळख करून घेतली. गटातील मुलांशी, कुमार निर्माण आणि त्यात मुलांनी केलेले कृती कार्यक्रम या विषयी चर्चा झाली.
मुलांनी त्यांनी केलेले उपक्रम आम्हाला सविस्तर सांगितले. गटातील मुलांनी प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम परिसरातील दुकानांमध्ये जाऊन समजावून सांगितले. जीवनशैली मेळाव्यात जावून तेथील स्टॉलवर जाऊन माहीती घेतली आणि त्यांना मदत केली. मुलांनी कंपोस्ट खत बनवले. असे अजूनही अनेक उपक्रम आणि त्या दरम्यान त्यांना आलेले अनुभव मुलांनी सांगितले. ही चर्चा सुरु असतानाच धीरज दादा आणि नशिकच्याच मैत्रगटातील तेजस हे दोघेही तेथे आले. आम्ही त्या दोघांचं स्वागत केलं आणि मग तेही चर्चेत सहभागी झाले.
दोन्ही गटातील मुलं अतिशय उत्साही आहेत. या गटातील मुलांना कब्बडी खेळायची होती पण वेळ कमी पडल्याने आम्ही त्याऐवजी दुसरा एक खेळ खेळलो.
मी माणूसगटातील मुलांनी त्यांच्या गटाचे नाव मी माणूसअसं का निवडलं आहे हे देखील सांगितलं. आपली ओळख संगतानी आपण आपले नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय हे सगळं सांगतो पण आपण सगळ्यात पहिले माणूस आहोत हे मात्र विसरतो म्हणून आम्ही आमच्या गटाचं नाव मी माणूसअसं ठेवलंय असं ही मुलं म्हणाली’. नंतर अजित सरांशी आणि धीरज दादाशी गप्पा मारून आम्ही पुढे निघालो.

नगाव, धुळे.
नगाव च्या गटाला भेट द्यायला पोहचायला आम्हाला खरं तर उशीर झाला होता पण तरीही मुलं आमची वाट बघत होती. आम्ही या मुलांसोबत रात्री अंधारात मोकळ्या गच्चीवर मस्त गार हवेत बसून गप्पा मारल्या. मुलांशी ओळख झाल्यानंतर गटाने केलेल्या कृती कार्यक्रमांची माहिती आम्ही घेतली.
कुमार निर्माणच्या या गटाने विविध विषयांवर माहिती मिळवून त्यावर बैठकीत चर्चा केली. एकाने माहिती मिळवून ती गटाला सांगायची असं त्यांनी ठरवले होते. या अंतर्गत त्यांनी बर्मुडा ट्रेंगल, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीविसर्जनानंतर काय होतं अशा अनेक विषयांवर माहिती मिळवली. ही माहिती मुलांनी पुस्तकं, वर्तमानपत्र, T.V., शिक्षक किंवा ताई-दादाकडून मिळवली होती. गटातील मुले नियमित बैठक घेऊन त्यामध्ये ही माहिती एकमेकांना सांगत असतात.
मुलांनी पुन्हा एकदा कुमार निर्माण आणि त्याअंतर्गत करायचे उपक्रम या विषयी चर्चेतून समजून घेतले. नंतर आम्ही गटासोबत गावातील समस्या आणि त्यावर काय चांगले उपक्रम करता येतील या विषयी चर्चा केली. मुलांनी अनेक करता येण्याजोगे उपक्रम सुचवले. गटातील मुलांना आम्ही एक कोडे विचारले आणि कोड्यावर विचार करयला मुलांना वेळ मिळावा म्हणून मुलांसोबत खेळ खेळलो. बराच वेळ विचार केल्यानंतर मग मुलांना कोड्याचं योग्य उत्तर सापडलं आणि गटातल्या एकाने त्यासाठी बक्षीसही मिळवलं.

चाळीसगाव गट
चाळीसगावला कुमार निर्माणचे दोन गट आहेत, ‘हिरवळ सृष्टीगट आणि ज्योतिबा गट’. दोन्ही गटातील मुलं एकत्रच बैठका घेतात त्यामुळे आम्ही दोन्ही गटातील मुलांना एकत्रच भेटलो. शाळा करून आल्यानंतरही मुलं अगदी टवटवीत होती. पाखले सर आणि नानकर मॅडम यांच्या घरी आम्ही मुलांशी बोलायला जमलो होतो. गटाशी ओळख करून मग आम्ही त्यांचे कृती कार्यक्रम आणि अनुभव ऐकले.
या गटाने निवडणूक घेऊन गट प्रमुख ठरवलाय. हे गट नातू काकांच्या शेतात भेट द्यायला गेले होते. तिथे त्यांनी नातू काकांकडून शेतीविषयीची माहितीही घेतली. विशेष म्हणजे या भेटीची जाण्या-येण्याची पूर्ण व्यवस्था मुलांनीच बघितली. गटाने शाडू मातीचे गणपती बनवले आणि आपापल्या घरी बसवले. गटातील बहुतांश मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. मुलांनी गरजू व्यक्तींना मदत केली. अजूनही अनेक उपक्रम गटातील मुलांनी केले. मुले सेवादलाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेले होते तिथे त्यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कट्यारे सर भेटले होते. त्यांनी या मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग दाखवले. यातून मुलांमधील अंधश्रद्धा कमी व्हायला मदत झाली.
चाळीसगावला या मोठ्या मुलांच्या गटासोबतच एक लहान मुलांचा गट देखील आहे. या लहानग्यांच्या गांधीजी गटासोबत देखील आम्ही खूप दंगा केला. या गटाने दिवाळी मध्ये साधनामासिकाचा दिवाळी बालकुमार अंक घरोघरी जावून विकला. हा उपक्रम कसा सुचला हे संगताना श्रुष्टी म्हणते, “मी एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा बघितला. मग मला वाटलं की आपणही बांगड्या विकूया पण मग आई म्हणाली, तुम्ही बांगड्या नको पुस्तकं विका म्हणून मग आम्ही पुस्तकं विकली”. शाळेत त्यांना कागद्याच्या लगद्यापासून टोकरी बनवायला शिकवलं होतं. तोही प्रयोग त्यांनी घरी केला आणि इतरांनाही शिकवला. या मुलांचे अनुभव त्यांच्या शब्दात ऐकून खूपच छान वाटलं. या लहानग्यांच्या कृती आणि उत्साह बघून आम्हालाही उत्साही वाटलं.

कळमडु गट
कळमडुला गेल्यानंतर शाळेच्या मैदानात कोवळ्या उन्हात बसून आम्ही मुलांशी संवाद साधला. या गावात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम असे दोन गट आहेत. दोन्ही गटांतील मुले सोबतच कृती करतात. आम्ही या गटांशी एकत्रच गप्पा मारल्या. सकाळी मुलं अगदी उत्साहात होती. मुलं बोलकी होती आणि मोकळेपणाने बोलत होती. सुरवातीला आम्ही गटाशी मेमरी गेमच्या माध्यमातून ओळख करून घेतली.
कुमार निर्माण म्हणजे काय याबद्दल आम्ही मुलांशी चर्चा केली. कुमार निर्माण, कुमार निर्माण मधील उपक्रम, इतर गट करीत असलेले उपक्रम या बद्दल मुलांशी गप्पा मारल्या. गावात मुलांना दिसणारे प्रश्न किंवा सुचणारे कृती कार्यक्रम या विषयी मुलांशी चर्चा केली. मुलांनी अनेक कृती कायक्रम सुचवले. गावातील पाण्याची समस्या, कचरा, झाडे नाहीत अशा अनेक समस्या आणि त्यावरील उपायही मुलांनीच आम्हाला सुचवले. या मुद्द्यांवर चर्चा करून लवकरच कृती करणार असल्याचे मुलांनी आम्हाला सांगितले. नियमित बैठका कशा घ्यायच्या, बैठकीत काय काय करायचे आणि बैठक झाल्यावर बैठकीचा वृतांत कसा लिहायचा हेही मुलांनी चर्चेतून समजून घेतले. गटातील मुलींनी त्यांच्या स्नेहसंमेलनात गायलेले स्वागत गीत आम्हाला म्हणून दाखवले. मुलांनीही एक विनोदी गीत म्हणून दाखवलं.
लवकरच पुन्हा भेटू असं सांगून आम्ही गटाचा निरोप घेतला.

एरंडोल गट
सकाळी साधारण ९.३० च्या सुमारास आम्ही नेचर गटाला भेटलो. तिथे गेल्यावर निमंत्रकाकडून आम्हाला कळले की आठवड्याभरापासून गटातील सर्व मुले आमची खूप वाट पाहत होते. वेळ न दवडता आम्ही मुलांसोबत गप्पा करायला बसलो. नेहमीप्रमाणे सुरवातीला आम्ही एका खेळाच्या मदतीने एकमेकांची ओळख करून घेतली. मुलांसोबत निमंत्रकानेही या खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर मुलांनी आत्तापर्यंत केलेल्या कृतीकार्यक्रमांचं शेअरिंग केलं. त्यांनी केलेली सगळी कामं मुलं अगदी उत्साहाने आणि आनंदाने आम्हाला सांगत होती. त्यात मुलांनी डोअर स्टेप स्कूल या गटाकडून प्रेरणा घेऊन स्वतःच्या गटासाठी एक कुमार निर्माण बॉक्सबनवला असून त्यात प्रश्न टाकले आहेत. लवकरच मुले त्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा करणार आहेत. याआधी मुलांनी एरंडोलपासून जवळच सहल काढली होती. गटातील मेहुलने अंगणात आलेल्या चिमणीला तांदळाचे दाणे खायला दिले व त्या चिमणीविषयी खूप छान निरीक्षण लिहिले. गटातील ओमचा हात मोडला होता आणि त्यामुळे तो बैठकीला येत नव्हता, म्हणून त्याला भेटायला गटातील सर्व  मुले ओमच्या घरी भेटायला गेली, त्याच्याशी खेळली. हे सांगतांना ओमला खूप आनंद होत होता. यासोबतच गटातील काही मुलांनी स्वतः फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली आणि इतरानाही समजावले. हे करताना सर्वच मुलांना खूप वेगवेगळे अनुभव आले होते.
गटातील तीन मुले दररोज रोजनिशी लिहितात. त्यात दिवसभरात काय घडलं, त्याविषयी मला काय वाटलं अशा बऱ्याच गोष्टी ते लिहितात. यासोबतच मुलांनी आपापल्या घरचा मासिक खर्च काढून त्त्याला आवश्यक आणि अनावश्यक यात विभागून शक्य तेवढा अनावश्यक खर्च कमी करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. गटासोबत गप्पा करताना एखादी व्यक्ती गरीब आहे हे कसे ठरवायचेयावर खूप चर्चा झाली. यावर मुलांनी खूप विचार करून मुद्दे मांडले. यावरून गटाची संवेदनशीलता दिसून आली. शेवटी एक छानसा खेळ घेऊन पुन्हा लवकर भेटण्याचे ठरवून आम्ही गटाची रजा घेतली.

सोनाळे
सोनाळे गावातील कुमार निर्माण च्या गटाला भेट द्यायला आम्ही सकाळी पोहचलो तेव्हा नुकतीच मुले जमू लागली होती म्हणून आम्ही गटाने लावलेला भाजीपाला बघत सुरवात केली. मुलांनी शाळेमागच्या परिसरात वांगे, गिलके, भेंडी असा भाजीपाला लावलाय आणि त्याची वाढ ते सेंद्रिय पद्धतीने करीत आहेत. मुले खूप उत्साहाने आम्हाला प्रत्येक भाजीपाल्याच्या झाडाविषयी सांगत होती. मुलांनी त्यासाठी खूप कष्ट घेतलेत हे ती बाग पाहिल्यावर दिसून आलं.
मुले जमल्यावर आम्ही वर्गात बसून मुलांसोबत गप्पा मारल्या. मुलांशी ओळख करून घेतली आणि मग मुलांनी त्यांनी केलेल्या कामाविषयी आम्हाला सविस्तर सांगितलं. भाजीपाला लावताना काम कसे वाटून घेतले, भाजीपाला शिक्षकांना व बाजारात कसा विकला, एक भाजी आल्यानंतर मग ती विकून तिच्या पैशातून दुसऱ्या भाजीसाठीचे बियाणे आणले, नंतर आणखी भाजीपाला विकून त्यांनी त्या पैशातून शाळेतील त्यांच्याच गरजू मित्र-मैत्रिणींना पेन, पेन्सिल इ. वस्तू भेट म्हणून दिल्या, . तसेच मुलांनी होळी मध्ये गावातील कचरा जमा करून जाळला आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. हे सगळं करताना काय अनुभव आले, गावातील इतर लोक काय म्हणाले, पालक काय म्हणाले हे मुलांनी सांगितलं. या सोबतच पुढे काय कृती करणार याविषयीही चर्चा झाली.
आमची भेट झाल्यानंतर गटातील मुले लगेच अजिंठा येथील लेणी बघायला जाणार होते म्हणून मग आम्ही भेट आवरती घेतली. मुलांसोबत एक खेळ खेळून आम्ही निघालो.

 वर्धिष्णू  गट, जळगाव.
वर्धिष्णू गटाला भेटायला आम्ही संध्याकाळी सेंटर वर गेलो तिथे गटातील मुले लगेच जमा झाली. या गटासोबत पाहिलेही एकदा धावती भेट झाल्याने थोडी ओळख होतीच, तरीही पुन्हा एकदा मुलांशी ओळख करून घेतली.
या मुलांशी गप्पा मारत त्यांनी केलेल्या कृतीकार्यक्रमांविषयी माहिती घेतली. ही मुलं औरंगाबादला फिरायला गेली होती तेव्हा बीबी का मकबरापरिसरात त्यांना काही लोक कचरा करताना दिसले. या मुलांनी तो कचरा उचलला. तेथील सुरक्षा रक्षकांना वाटलं की या मुलांनीच हा कचरा केला म्हणून ते या मुलांना रागवायला लागले. पण अद्वैत दादाने त्यांना झाला प्रकार सांगितल्यावर ते त्या कचरा करणाऱ्यांना ओरडले. मुलांनी औरंगाबादला असताना स्वतः खिचडी बनवली आणि गटातल्या सगळ्यांनी खाल्ली. गटातील मुलं अतिशय उत्साही आहेत. ही मुलं स्वतः काहिही कचरा करत नाहीत. सेंटरवर प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा हे मुलांनीच ठरवलेलं असल्याने हा गुण आपोआपच मुलांमध्ये रुजला आहे. गटातील मुलांच्या सोबतच तेथील इतर लहान मुलेही तेथे होती त्यांच्या सोबतही आम्ही धमाल गप्पा मारल्या आणि मज्जा केली.. 
अद्वैत दादा कामानिमित्त मुंबईला गेला असल्याने त्याच्याशी भेट होवू शकली नाही. सेंटरवर गटासोबत शैलेश दादा आणि अक्षय दादा होते. त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही तिथून निघालो.

बुलढाणा
बुलढाणा येथील गटाला भेटायला म्हणून आम्ही छत्रछाया फौंडेशनच्या सेंटर वर गेलो तेव्हा गटातील मुले जेवण करण्यासाठी बाहेर गेलेली होती. त्यांच्याच खोली मध्ये बसून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. ह्या गटाची छान गोष्ट म्हणजे ही सगळी मुले एकाच घरात एक कुटुंब म्हणून खूप प्रेमाने राहतात. मोठा ऋषी लहानांची छान काळजी घेतो.
आम्ही या गटाला भेटायला गेलो त्या दिवशी शिव जयंती होती. गटातील मुलांना अद्वैत आणि प्रणाली यांनी मागे गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. मग आम्ही या पुस्तकाविषयी चर्चा घेतली. साधारण वर्षभरापूर्वी वाचलेल्या पुस्तकातील आशय अजूनही मुलांना व्यवस्थित आठवत होता. आणि मुलांनी आम्हाला सांगितले की आज साजरा होत असलेल्या शिव जयंतीची पद्धत आम्हाला पटत नाहीये. हे ऐकून मुलांची विचार करण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवली. गटातील मुलांनी त्यांच्या राहत्या घरात मध्ये मच्छरांचा त्रास होत होता म्हणून पहिले घर आणि आजूबाजूचा परिसर साफ केला. पण तरीही हा त्रास कमी झाला नाही म्हणून मग त्यांनी नवीन युक्ती शोधून काढली. लिंबाचा पाला जाळून त्याचा धूर करून त्यांनी मच्छर पळवले. त्या विषयी आणि अजूनही बरीच चर्चा या मुलांसोबत झाली.
कुमार निर्माण म्हणजे काय आणि त्यात आपण कोणत्या कृती करू शकतो याबद्दल मुलांनी चर्चेतून समजून घेतले. आपल्या आसपासच्या परिसरात अजून काय काय चांगलं आपल्याला करता येईल या विषयी मुलांनी बरेच मुद्दे मांडले. त्यांच्या घरासमोर रस्त्यावरील आणि इतरत्र जाणवणाऱ्या अनेक समस्या मुलांनी मांडल्या. त्यावर लवकरच ही मुलं उपाय शोधून कृती करणार आहेत. या मुलांनी अभ्यासात एकमेकांना मदत करायची ठरवली आहे. या मुलांना आम्ही आणि मुलांनी आम्हाला अनेक कोडी घातली आणि विनोदही सांगितले. एकूणच मुलांशी गप्पा मारायला खूप मज्जा आली.

सेवाग्राम
सेवाग्राम मधील नयी तालीम परिसरातील हा गट आहे. या गटाला भेटायला आम्ही गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये मध्ये गेलो. सेवाग्राम मध्ये आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. मुले जमेपर्यंत आम्ही नयी तालीमचे अध्यक्ष बरंठ काकांसोबत गप्पा मारल्या. नयी तालीम आणि सेवाग्राम मधील सगळ्याच कार्यकर्त्यांना कुमार निर्माण बद्दल खूपच उत्सुकता होती.
मुले जमल्यावर आम्ही रिंगण करून मुलांशी गप्पा मारायला बसलो. या मुलांमध्ये घट्ट मैत्री आहे. गटातील मुले नियमित एकत्र येतात. या गटासोबत चर्चा करताना गटातील मुलांसोबतच इतरही कार्यकते उपस्थित होते. आनंद निकेतनच्या मुख्याध्यापिका सुषमा ताई देखील तेथे उपस्थित होत्या. या सगळ्यांसोबत आम्ही सेवाग्रामच्या परिसरात बसून गप्पा मारल्या. गटातील मुलांनी कुमार निर्माणची संकल्पना पुन्हा एकदा चर्चेतून समजून घेतली. इतर गटांनी केलेले कृती कार्यक्रम मुलांना सांगितले. या मुलांनी परिसरातील अनेक समस्या आणि त्यावर आपल्याला काय करता येईल या विषयी अनेक कल्पक उपाय सुचवले. गटातील मुले ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने त्यांचे वेगवेगळे असे अनेक प्रश्न होते त्यावर एकत्रितपने कृती करायला मुले खूपच उत्सुक होती. यासाठी त्यांना सहकार्य करण्याची तयारी सुषमा ताईंनी दाखवली आणि अनेक सूचनाही त्यांनी केल्या. गटातील मुलांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. या मुलांसोबत आम्ही श्रमदान केले आणि श्रमदान करतानी गाणे देखील म्हटली. या भेटी दरम्यान आम्हालाही खूप काही शिकायला मिळाले.
मन्याळी
सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेपर्यंत आम्ही गाडीवरून मन्याळीला पोहचलो. मुलांची प्रार्थनेची तयारी सुरु होती. मुलांनी प्रार्थना, गोष्ट, सुविचार इत्यादी सगळं म्हटलं. शैलेशने मुलांना एक छानशी गोष्ट तेथे सांगितली.
मुलांचा परिपाठ संपल्यानंतर आम्ही गटातील मुलांशी गप्पा मारण्यासाठी एका वर्गात बसलो. प्रणालीने गटातील मुलांसोबत एक गाणे घेतले. नंतर आम्ही गटाच्या मुलांसोबत गप्पा मारल्या. इथे दोन गट आहेत. एक गट गावातील आहे आणि दुसरा गट गावा जवळील तांड्यावरून येणाऱ्या मुलांचा आहे. गटात मुले आणि मुली दोन्ही आहेत. मुलांनी त्यांनी केलेल्या कृतींविषयी आम्हाला सांगितलं. मुलांनी केलेल्या कृती आणि त्यांना आलेले अनुभव ऐकून खूपच छान वाटलं. मुलांनी गावातील दुकानांसमोर कचरा पेट्या ठेवल्या आहेत. त्या मध्येच कचरा टाकावा असे मुलांनी गावात सगळ्यांना सांगितलंय. मुलांनी उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी ठेवलंय. गटातील एका मुलीच्या घराकडे जाताना रस्त्यात असलेला खड्डा या मुलांनी बुजवला. असे इतरही अनेक उपक्रम मुलांनी केलेत. ही मुले नुकतीच गावाजवळील यात्रेला जाऊन आलीत तिथे त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी केलेली मज्जा गटातील मुलांनी आम्हाला सांगितली.
गटातील मुले नियमित बैठका घेतात आणि काय कृती करायची यावर चर्चा करतात. बैठकीचा वृत्तांतही मुलांनी सविस्तर लिहून ठेवलंय. या मुलांसोबत एक मस्त खेळ आम्ही खेळलो आणि गटाची रजा घेतली.

एकूण आमची संपूर्ण ट्रीप खूप मस्त झाली. प्रत्येक गटभेटीतून आम्हाला काही ना काही शिकायला मिळाले. मुलांचा उत्साह आणि प्रश्न विचारणं कधीकधी थक्क करणारं होतं. मुलांसोबत खूप दंगा करून पुन्हा नवीन गटांना भेटी देण्याचा उत्साह या मुलांकडून घेऊन आम्ही परतीला निघालो.No comments:

Post a Comment