Monday, 29 February 2016

संपादकीय

नमस्कार बालमित्रांनो,

एव्हाना तुमची परीक्षेची तयारी जोरात सुरु झाली असेल. दहावीची तर परीक्षाही सुरु झाली आहे. अभ्यास करताना आता तुम्हाला बाकी गोष्टींसाठी वेळही कमी पडत असेल. तुमच्या शालेय परीक्षेसाठी कुमार निर्माण तर्फे ऑल द बेस्ट! तुम्हा सर्वांना परीक्षेत अपेक्षित यश मिळावे यासाठी खूप शुभेच्छा!
शाळेतील परीक्षेसोबतच तुम्ही समाजातील आणि जीवनातील प्रश्नपत्रिकाही कुमार निर्माणच्या माध्यमातून सोडवू लागला आहात त्याबद्दल तुमचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. मोठ्यानाही जमणार नाही आणि सुचनारही नाहीत अशा विलक्षण कृती तुम्ही मुलं करतायत. तुमच्या या कृतींकडे आणि तुम्ही केलेल्या चांगल्या बदलांकडे बघून आम्हा मोठ्यानाही चांगलं काम करण्यासाठी हुरूप येतो.
मात्र समाजातील विविध प्रश्न बघण्याची आणि त्यावर आपल्या परीने उत्तरं शोधून त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची जी सुरवात तुम्ही केलीय तिच्यात या परीक्षेनंतर येणाऱ्या सुट्टीत खंड पडता कामा नये.
शाळेत असताना किंवा शाळा सुरु असताना तुमच्या गटानी मिळून खूप सारे कृती कार्यक्रम केले आहेत. पण आता सुट्ट्यात तुम्ही मामाच्या किंवा स्वतःच्या गावाकडे सुट्ट्यांत जाल, तेव्हा तुमचा गट कदाचित तुमच्या सोबत नसेल. पण तुमच्या पैकी बहुतेक मुलांनी जसे दिवाळीत छोटे छोटे उपक्रम आपल्या घरी व आजूबाजूला केले तसेच उपक्रम तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करू शकता. हे उपक्रम तुम्ही एकट्याने तर करूच शकतात पण मामाच्या गावातील व आपल्या गावातील आपल्या इतर मित्रांना  सोबत घेऊनही असे उपक्रम तुम्ही करू शकता. मग ते मित्र आपल्या कुमार निर्माणच्या गटातील नसले तरी चालेल.
प्रत्येक नवीन प्रश्न आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो. तर मग अशाच नवीन समस्या, प्रश्न आणि नवीन संधी या सुट्ट्यांमध्ये शोधूया. त्या प्रश्नांवर आपापल्या परीने उपाय शोधून परिसरात चांगला बदल घडवून आणून आपण या सुट्ट्यांचा सदुपयोग करूया. सुट्ट्या लागून तुम्ही सर्व गावी जाण्याआधी आपल्या गटाची एक बैठक नक्की घ्या व त्यामध्ये सर्वांनी मिळून सुट्टीचा कार्यक्रम ठरवा.

तुमच्या माहिती साठी कुमार निर्माणच्या गटातील काही मुलांनी सुट्टीत एकेकट्याने केलेले काही उपक्रम खाली देत आहोत. अशा प्रकारचे उपक्रम तुम्हीदेखील करू शकता.
· पाण्यासाठी तडफडणाऱ्या चिमणीला देविसाठीचा नारळ फोडून पाणी पाजले. – किशोर ढाळे.
· अनोळखी माणसाला खायला दिले. – विशाल बादाडे.
· मी आणि मित्रांनी मिळून गल्ली साफ केली. – आकाश रांजवन.
· एका गरीब नग्न व्यक्तीला वडिलांची पॅन्ट दिली. – नारायण तांगडे.
· जवळपास सगळ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. इतरांनाही  फटाके फोडू नका असे सांगितले.
· परिसरातील आजी आजोबांशी संवाद साधला व त्यांना पाठ असलेली लोकगीते, गोष्टी, अनुभव याचे संकलन करून हस्तलिखित काढले.
· परिसरातील रुग्णालय, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, बाजार यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

असे अनेक उपक्रम तुम्ही मुलांनीच दिवाळीच्या सुट्टीत केले आहेत. हे उपक्रम आपण वेळोवेळी भरारी मधून वाचतोच. हे व यापेक्षा वेगळे अनेक उपक्रम तुम्हाला सुचू शकतात. उदा. उन्हाळा म्हटलं की सगळीकडेच पाणी टंचाई असणार, मग तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतात, स्वतः पाणी जपून वापरू शकता आणि इतरांनाही  पाणी जपून वापरण्याचे महत्व पटवून देऊ शकतात. आजूबाजूच्या लहान मुलांना छान छान गोष्टी सांगू शकतात. तुम्हाला माहित असलेले नवीन खेळ त्यांना शिकवू  शकतात. एखादा विज्ञानाचा प्रयोग करून बघू शकतात. गावातील इतर समस्या शोधून त्यावर काही उपाय म्हणून कृती कार्यक्रम करू शकतात ई.
इथे दिलेल्या कृती आम्ही फक्त उदाहरण म्हणून दिल्या आहेत. शक्यतो नेहमी प्रमाणे तुमच्या डोक्यातून एखादी वेगळीच सुपीक आयडिया तुम्ही काढालच!

बाकी या सुट्ट्यांमध्ये भरपूर खेळ खेळा, मस्ती करा, नवीन मित्र बनवा, नव-नवीन गोष्टी शिका, निरीक्षण करा आणि परिसरातील छोटमोठ्या प्रश्नरूपी आव्हानांनाही सामोरे जा. ही आव्हानच तुमच्या समोरील संधी आहेत. आणि शेवटी तुम्ही सुट्टीत काय काय मज्जा केली त्याचे अनुभव आम्हाला लिहून पाठवा किंवा फोन करून नक्की कळवा.

सुट्ट्यानंतर परत शाळा सुरु झाल्या की पूर्ण वर्षभरातील व सुट्ट्यामधील तुमचे कृती कार्यक्रम समजून घेण्यासाठी आपण सर्व विभागीय स्तरावरील गटांच्या एकत्र सादरीकरण कार्यशाळा घेऊ, तेव्हा भेटूच!
— टिम कुमार निर्माण

No comments:

Post a Comment