Monday 29 February 2016

दोन दगडांची गोष्ट

काही वर्षांपूर्वी एका लहानशा गावात एक शेतकरी ‘सखा’ आणि त्याची मुलगी ‘माला’ राहत होते. सखा बिचारा गरीब होता. त्यांच्या लहानशा शेतात कष्ट करून ते दोघे आपला उदरनिर्वाह करीत होते.
पण सलग दोन वर्ष दुष्काळ पडला होता आणि सखा जवळील पैसे आता संपले होते. पावसाला नुकतीच सुरवात झाली होती आणि या वर्षी चांगला पाउस पडेल अशी अपेक्षा होती. सखाकडे आता पेरणी करायला पैसे नव्हते म्हणून तो गावातील सावकार सेठ धनीराम कडे गेला आणि त्याच्या कडून काही पैसे व्याजाने कर्ज म्हणून आणले. सेठ धनीराम पैशाचा अतिशय लालची माणूस होता. गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन त्याने हडप केलेली होती.
तर सेठ धनीराम कडून कर्ज काढून सखाने आणि त्याची मुलगी मलाने मिळून त्यांच्या शेतात पेरणी केली. सुरवातीला पाउस चांगला पडला पण नंतर पावसाने दडी मारली तो परत आलाच नाही. सखा आणि मालाकडे आता जेमतेम पोट भरण्यापुरतेच धान्य शिल्लक राहिले होते त्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हते.
सावकाराचे कर्ज फेडायला आता सखाकडे पैसे नव्हते. तो सावकाराकडे जायचं टाळू लागला. पण सावकार महा धूर्त होता. तो सखाकडे आला आणि पैसे मागू लागला. पैसे दे किंवा मग तुझी जमिन मी जप्त करतो असे म्हणू लागला. सखा त्याच्यापुढे गयावया करू लागला  तरी तो काही तैयार होईना. त्याने सखाला एक महिन्याची मुदत दिली आणि त्या आत पैसे परत दे किंवा मी तुझी जमीन जप्त करतो नाहीतर माझं तुझ्या मुलीशी लग्न लावून दे असं सांगून तो निघून गेला. खरं तर सावकाराला मालाशी लग्न करायचं होतं.
सावकाराचं बोलनं ऐकून सखा आणि माला घाबरून गेले. आता आपली जमीन तरी जाणार नाहीतर आपल्याला आपल्या लाडक्या लेकीचं लग्न म्हाताऱ्या सावाकाराबरोबर लावून द्यावं लागणार या चिंतेत सखा बुडून गेला. त्याची मुलगी माला हुशार आणि धीट होती. तरीही ही धमकी ऐकून ती थोडी घाबरली.
एका महिन्याने सावकार परत आला आणि त्याने सखाला पैसे मागितले. सखाकडे पैसे नव्हते. मग सेठ धनीराम, मालाशी लग्न लावून दे मग मी तुझी जमीन आणि कर्ज दोन्ही माफ करतो असं म्हणू लागला. जेव्हा सखा दोन्ही गोष्टींसाठी नाही म्हणू लागला तेव्हा सावकाराने सगळ्या गावातील लोकांना जमा केलं. त्यांना सांगितलं की हा सखा माझे पैसेही देत नाही, जमीनही द्यायला नाही म्हणतोय आणि त्याच्या मुलीशी माझं लग्नही लावून देत नाहीये. मग सावकार सखाला एक अजून संधी देतो. आता त्याचं नशिबच ठरवेल की काय करायचं.
तो सगळ्या गावकऱ्यांसमोर सखाला म्हणतो की मी तुला अजून एक संधी देतो. हातात एक कापडी पिशवी घेऊन तो म्हणतो की, “मी या पिशवीत एक पांढरा खडा टाकतो आणि एक काळा खडा टाकतो. माला यातून एक खडा न पाहता उचलेलं. जर तिने पांढरा खडा उचलला तर तुझे कर्ज माफ आणि जमीनही तुलाच राहील पण जर तिने उचललेला खडा काळा निघाला तरीही तुझे कर्ज माफ पण मग मी तुझ्या मुलीशी लग्न करीन.”
मग तो तिथून दोन खडे उचलून पिशवीमध्ये टाकतो. मालाच्या हे लक्षात येतं की धनीरामने दोन्ही काळेच खडे पिशवीमध्ये टाकले आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या परीस्थितीत मालाच्या ठिकाणी तुम्ही असता तर काय केलं असतं?
खडा तर उचलायचा आहे. लोकांना जरी आपण धनीरामने काय केलंय हे सांगितलं तरी मग सखावरील कर्ज तसंच राहील. या परीस्थितीत मालाने काय करायला हवं? आपल्या गटात चर्चा करा. मालाने काय केलं ते जाणून घेण्यासाठी आपल्या गट निमंत्रकांना किंवा आम्हाला विचारा.

No comments:

Post a Comment