Wednesday 1 August 2018

दोघांचा बळी


त्या देशात नुकतीच राज्यक्रांती झाली होती. नवीन राजा गादीवर आला होता. तो राजा तरुण होता, उदार होता. आपला देश भरभराटीला यावा, सुखी व्हावा असे त्याला वाटत होते. इतर देशांचे कारभार कसे आहेत, त्या त्या देशांतून काय काय विशेष गोष्टी आहेत, ते पाहावे म्हणून तो तरुण राजा प्रवासासाठी निघून गेला. त्याने राज्याची सर्व जबाबदारी त्याच्या दोन प्रधानांवर सोपवली होती.
राज्यक्रांतीच्या वेळेस या दोन प्रधानांना लोक देवाप्रमाणे मानीत. त्यांच्या नावाचा जयजयकार केल्या जाई. किती त्यागी, किती थोर त्यांची देशभक्ती, असे सारे म्हणत; परंतु आता पूर्वीप्रमाणे लोकांची श्रद्धा त्यांच्यावर राहिली नाही. समाजात काही मत्सरी लोक असतातच. अशा मत्सरी लोकांनी त्या दोन प्रधानांच्या विरुद्ध सारखी मोहीम सुरु केली. हे प्रधान स्वार्थी आहेत, मानासाठी हपापलेले आहेत, राजाला ह्यांनीच प्रवासासाठी पाठवले, ह्यांना सर्व सत्ता स्वतःच्या हाती घ्यावयाची आहे, कसली देशभक्ती नि कसले काय, अशाप्रकारचा विषारी प्रचार त्यांनी सुरु केला. सभांतून, वर्तमानपत्रांतून, खाजगी बैठकींतून एकच सूर ऐकू येऊ लागला.
लोक चंचल असतात.. ते आज एखाद्याची पूजा करतील, उद्या त्याचीच कुतरओढ करतील. ते आज जयजयकार करतील, उद्या शिव्याशाप देतील. आज उंचावर चढवतील, उद्या खाली ओढतील, आज फुलांचे हार घालतील, उद्या दगड मारतील. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये. लोकांना जसे वळवावे तसे ते वळतात. अग्नीने सुंदर स्वयंपाक करता येतो, आगही लावता येते. लोकांना शांत ठेवता येते, त्यांना प्रक्षुब्धही करता येते. पाणी शांत असते, परंतु जोराचा वारा सुटला तर तेच पाणी प्रचंड लाटांचे रूप धारण करते. मोठमोठ्या बोटीही मग त्या लाटांसमोर टिकू शकत नाहीत. त्या प्रमाणे शांत राहणारी जनता कोणी एखाद्या गोष्टीचा तुफानी प्रचार केला तर खवळते. ती मग आवरता येत नाही.
राजधानीतील लोक त्या दोन प्रधानांविरुद्ध फारच बिथरले. एके दिवशी सायंकाळी विराट सभा झाली. द्वेषाची आग पाखडणारी भाषणे झाली. प्रधानांच्या घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. ‘मारून टाका हे प्रधान; स्वार्थी बेटे; देशभक्त म्हणून मिरवतात; तुकडेतुकडे करा. आगा लावा त्यांच्या बंगल्यांना...’ असे ओरडत प्रक्षुब्ध जनता निघाली.
एक प्रधान घरात सापडला. दुसरा कोठे आहे? परंतु आहे त्याची तरी उडवा चटणी जो प्रधान सापडला त्याला लोकांनी फराफरा ओढीत आणले. कोणी दगड मारले. कोणी ढिपळे मारली. कोणी हात तोडला. हाल हाल करून त्या प्रधानाला मारण्यात आले. त्याचे डोके भाल्यावर रोवून ते मिरवण्यात आले. ‘देशद्रोह्यांना असे शासन हवे. स्वार्थी लोकांना हे बक्षीस मिळते...’ असे गर्जत लोक गेले.

परंतु तो दुसरा प्रधान कोठे आहे ? राजधानीतील काही विचारी माणसांनी एक पत्रक काढले. ‘एका प्रधानाचा लोकांनी सोक्षमोक्ष लावला. आता दुसऱ्याचा सूड घेण्यास ते अधीर झाले आहेत; परंतु हा खरा मार्ग नव्हे. प्रधानांची न्यायासनासमोर चौकशी होऊ दे. जर ते दोषी ठरले, त्यांच्यावर काही आरोप सिद्ध झाले, तर त्यांना होऊ दे शिक्षा. आता दुसऱ्या प्रधानास तरी न्यायासनासमोर उभे करा.’
‘होय, हे बरोबर आहे. ह्या दुसऱ्याची चौकशी करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहेत हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल.’ असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नये म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायाधीशांनी त्यांची लवकर चौकशी करावी अशाही मागण्या लोकांनी सभांतून केल्या. 
त्या दुसऱ्या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा ? राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळनार तर नाही ना ? खवळली तर या प्रधानास कसे वाचविता येणार ?
तो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु होता. न्यायाधीशांना सुद्धा भीती वाटत होती की जर आपण या प्रधानाला निर्दोष म्हटले तर ही जनता आपल्याला देखील मारायला कमी करणार नाही. लवकर या खटल्याचा निकाल लागावा म्हणून जनता जोर करू लागली. राजा लवकर आला तर बरे होईल असे तो न्यायाधीशाला वाटू लागले.
राजापर्यंत या बातम्या पोहचल्या आणि राजा आपल्या प्रधानाला वाचवण्यासाठी परतीच्या प्रवासावर निघाला. ही बातमी प्रधानाच्या शत्रूंना समजली. राजा परत आला तर प्रधान वाचेल अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी देशद्रोही प्रधानाने तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी अफवा पसरवायला सुरुवात केली. वणव्यासारखी ही अफवा संपूर्ण देशात पसरली. आधीच चिडलेली जनता अजूनच चिडली. मोठा जमाव प्रधानाच्या विरुद्ध घोषणा देत तुरुंगावर चालून गेला. त्यांनी तुरुंग अधिकाऱ्याचे ऐकले नाही की सैनिकांचे ऐकले नाही. एवढ्यामोठ्या जमावासमोर सैनिकांचे तरी काय चालणार. जमावाने तुरुंगातून प्रधानाला बाहेर काढले. त्याला हाल-हाल करून मारण्यात आले. प्रत्येकाला सूड घेण्याची इच्छा होती. लोकांची माणुसकी मेली होती. क्रोधाने सूडबुद्धीने माणसाचा पशु होतो.
राजा परत आला. उदार, प्रेमळ राजा परत आल्याने लोक शांत झाले. राजाने न्यायाधीशांना अभ्यास करून अहवाल द्यायला सांगितला. न्यायाधीशांनी अभ्यास करून अहवाल दिला की ते दोन्ही प्रधान देशद्रोही नसून देशप्रेमी होते. राज्यक्रांती मधील त्यांचे योगदान मोठे होते आणि नंतर देखील ते देशाच्या भल्यासाठी काम करत होते. हा निकाल ऐकून प्रजा हळहळली, लोक शोक करू लागले, प्रधानांच्या नावाचा जयजयकार करू लागले. राज दरबाराच्या प्रदर्शनी भागात त्या दोन्ही प्रधानांचे पुतळे बसवले गेले. लोक तिथे नियमित फुले वाहत. पण हाय! ते दोन प्रधान गेले ते गेलेच.

साने गुरुजींच्या ‘फुलाचा प्रयोग’ या गोष्टीवर आधारित
पुस्तक – साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी : भाग

No comments:

Post a Comment