Wednesday 1 August 2018

तीन ठिकाणी झाले गेटटुगेदर


देगाव येथील गेटटुगेदर
‘आम्ही नेहमीप्रमाणे प्रगती कुमार निर्माण संघाची बैठक सुरु केली. आम्ही सर्वांनी भरारी वाचले. त्यात गेटटुगेदरची माहिती व गेटटुगेदर करा असं लिहिले होते. मग या बैठकीमध्ये गेटटुगेदर करायचे ठरवले.
त्यानंतर एक दोन दिवसांनी सगळ्या मुलांनी घरातून गेटटुगेदरसाठी म्हणजेच देगावला जाण्यासाठी परवानगी मागितली व आई-वडिलांनी परवानगी दिली. नंतर देगावला जाण्यासाठी एसटीचा वेळ काढण्याची जबाबदारी कुणाल, प्रियांशु, तन्मय यांना सोपवली. सरांनी त्यांच्या मोबाईलवर आलेले निमंत्रण पत्राचे फोटो आम्हाला दाखवले व वाचायला सांगितले. त्यात जोक्स, कोडी, गाणी व ग्रामपंचायत जवळचे गवत काढावे अशी विनंती केली होती. त्या सोबतच भेळ करावी असेही लिहिले होते. आम्ही त्या सर्व विनंती स्वीकार केल्या. भेळीसाठी प्रत्येकाने आपापल्या घरातून एक-एक कांदा आणायचे ठरवले. भेळीसाठी लागणाऱ्या सामानाची दोन यादी केली. बाजारातून भेळीसाठी लागणारे सामान आणायची जबाबदारी मुलांनी घेतली. त्यानंतर कुणाल म्हणाला उन्हवऱ्याला जाणारी एकही एसटी नाही. प्रियांशु म्हणाला, देगावला एक बस जाते. मग सर म्हणाले, आपल्याला ट्रॅक्स, स्कूल बस किंवा मॅजीक सारख्या गाड्या मिळाल्या तरी चालेल. मग सर्व मुलांनी आपापल्या ओळखीच्या गाडीवाल्या दादांना विचारायचं ठरवलं. मग नंतर एकही गाडी मिळाली नाही. मग सरांनी सुद्धा विचारायचे प्रयत्न केले. त्यानंतर मुले बाजारात १२०० रु. घेऊन भेळीचे सामान आणायला गेले व सामान आणले. सामान आणायला सरांनी मुलांना त्यांच्याकडचे ५०० रु. दिले होते. त्यातल्या ५४५ रुपयांची खरेदी झाली. नंतर सरांना त्यांचे ५०० रु. परत केले. त्यानंतर एक टाटा मॅजीक गाडी भेटली. आमच्या सर्वांच्या मनात देगावला जाण्याचा विचार सतत फिरत होता. १५/७/२०१८ ला सकाळी मी तयारी करून साक्षीच्या घरी गेले. तिथून मी आणि साक्षी सरांच्या घरी जायला निघालो. तेव्हा साक्षीला चव्हाण काकींच्या दुकानातून चॉकलेट्स घ्यायचे होते. पण चव्हाण काकींचे दुकान बंद होते. मग आम्ही परत फिरलो आणि दुसऱ्या दुकानातून चॉकलेट्स घेतले. तेव्हा तिथे तन्मय आला. नंतर आम्ही तिघे सरांच्या घरी गेलो. हळूहळू सगळे सरांच्या घरी जमले. नंतर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो व भेळीचे समान देखील गाडीत ठेवले. आम्ही जाताजाता गाण्यांच्या भेंड्या खेळत गेलो. आम्ही देगावला तेव्हा तिथे बाई व इतर मुले आली.
आम्ही एका वर्गातले सगळे बेंच दुसऱ्या वर्गात ठेवले आणि एक वर्ग रिकामा केला. त्या वर्गात आम्ही सगळे जण बसलो. स्पंदन गटाने ओळख करण्यासाठी ओळखीचा गेम सांगितला. आम्ही तो खेळ १० वेळा खेळलो. नंतर स्पंदन गटाने त्यांच्या गटाची स्थापना होण्यापासून ते आजपर्यंत घडलेले सर्व काही सांगितले व त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारले. नंतर प्रगती गटाने त्यांच्या गटात स्थापना होण्यापासूनचे व आजपर्यंतचे घडलेले सर्व काही सांगितले. नंतर स्पंदन गटाने त्याच्यावर प्रश्न विचारले. नंतर आम्ही कोडी विचारली व जोक्स सांगितले. नंतर आम्ही आपापला डब्बा खाल्ला. डबा खाल्ल्यानंतर आम्ही खजिना शोध हा गेम खेळलो. तो खेळ खेळायला खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही भेळीसाठी लागणारे साहित्य कापले व बाईनी मोठ्या पातेल्यात चुरमुऱ्याचा एक पुडा ओतला. त्यात कांदा, मीठ, टॉमेटो, चिंचेचे पाणी टाकले व ते सगळे वाटप केले. सर्व मुलांना बाईंनी रांगेत बसायला सांगितले. एका मुलीने सर्व मुलांना पेपर डिश वाटल्या. एका मुलाने सर्वांना भेळ वाटली. त्या भेळीवर एका मुलाने शेव टाकली. नंतर सर्व मुलांनी भेळ खायला सुरुवात केली. तेव्हा गाडीवाले काका आले. सरांनी गाडीवाल्या काकांना सांगितले की थोडा वेळ लागेल. त्यांना भेळ खायला बोलावले पण ते आले नाही. कारण ते घरातूनच जेवण करून आले होते. आम्ही आनंदात भेळ खाल्ली. भेळ खूप छान झाली होती. आम्ही सगळ्यांनी डब्यात भेळ नेली व दापोलीला जायला गाडीत बसलो. घरी जाता-जाता सेव्हन-अप, मेमरी गेम, भेंड्या खेळलो. आणि मी घरी जे काही केलं ते सगळे सांगितले. मला देगावला जायला खरच खूप मज्जा आली.’

दीक्षा
प्रगती संघ, जालगाव, दापोली
 पुण्यातील गेटटुगेदर
पुण्यातील तीन संघ Warriors of truth, Adventure group आणि सृष्टी संघ यांचे गेटटुगेदर शिवाजी हौसिंग सोसायटीतील एका बागेमध्ये करायचे ठरले. दिनांक २९ जुलै संध्याकाळी ४ ते ६ सर्वांनी एकत्र यायचे ठरले. सृष्टी संघाचे प्रसन्न दादा आपल्या टीमला घेऊन वेळेत आले. माझेही दोन्ही गट वेळेत आले. कुणी चालत तर कुणी सायकलवर मजलदरमजल करत मुले बागेत पोचले. जेव्हापासून गेटटुगेदर करायचे ठरले त्या दिवसापासून सर्वजण खूपच उत्सुक होते. त्या दिवशी पण सारखे माझ्या घराची बेल वाजवून, फोन करून करून मला विचारत होती; ताई जमायचे ना एकत्र? झाले आम्ही सारे जण एकत्र आलो. ‘हीच अमुची प्रार्थना ...’ या छानश्या प्रार्थनेने सुरुवात केली. एकमेकांची ओळख करून घेतली. मग मी कुमार निर्माण म्हणजे काय? याची सविस्तर माहिती सांगितली. डॉ. अभय बंग व विवेक सावंत यांचे फोटो दाखविले व त्यांची यामागची कल्पना सांगितली.
नंतर आम्ही सर्वजण ‘वादळ सुटलं, वारा सुटला’ हा खेळ खेळलो. मुलांना खूप आनंद झाला. कुणीतरी हरलं म्हणून आपण जिंकलो हे मुलांना पटलं. नंतर Warriors of truth मधल्या भूमी, भव्या, साना या तिघींनी गाणं म्हटलं.
मग मी एक पप्रेरणादायी अशी लिझीची गोष्ट सांगितली. त्यांनतर सर्व संघातील काही मुलांनी जोक्स सांगितले. मुलांना खूपच हसायला येत होते. मग मी काही कोडी विचारले. तर मुलांनी उत्साहाने ताबडतोब उत्तरे दिली.
खेळ गाणी, गोष्टी झाल्यावर प्रत्येक संघाने समोर येऊन आतापर्यंत काय काय कृतिकार्यक्रम केले याविषयी सांगितले. प्लास्टिक वापरू नका, कागदी पिशव्या वापरा हा छान संदेशही दिला. घोषणा देखील दिल्या. ‘कुमार निर्माण कुणाचे, आमच्या छोट्या दोस्तांचे’ असे ओरडत ओरडत मुले बागेमध्ये फिरली. मग माही सर्वांनी मिळून छान खाऊ खाल्ला. काही मुलांनी खाऊ आणला नव्हता, पण सर्व मुलांनी आपापले डबे शेअर केले. मी व प्रसन्न दादाने सर्व मुलांसाठी खाऊ आणला होता, तोही शेअर केला. प्रसन्न दादानेही एक खेळ घेतला. खूप मज्जा आली. या दिवसाची आठवण म्हणून सर्व मुलांनी वृक्षारोपण केलं. आश्चर्य म्हणजे जेव्हा मुलं राष्ट्रगीत म्हणत होती तेव्हा संपूर्ण बागेतील जेवढे लोक होते ते सर्वजण उभे राहिले. हम होंगे कामयाब हे गाणं मुलांनी अगदी उत्साहाने म्हटले. कार्यक्रम संपला असे सांगितले तरीही कुणाचाही पाय निघत नव्हता. मुलं पुन्हा पुन्हा एकत्र येऊन एकमेकांशी अजून ओळख करून घेत होती. सृष्टी गटातील मुले प्रसन्न दादाला विचारत होती दादा आपण कधी होस्ट व्हायचे? या मुलांना आपण कधी आपल्याकडे बोलवायचे ? पुन्हा लवकरच सर्वजण भेटूयात असे एकमेकांना आश्वासन देऊन सर्वजण निघाले. एक चांगला विचार घेऊन आपापल्या घरी.
संजना शहा, पुणे
बोदवड येथील गेटटुगेदर
आमच्या गटाचा ‘गेट टुगेदर’हा कार्यक्रम झाला. उडान व संस्कृती गटाचा. आम्ही बोदवड येथे या कार्यक्रमासाठी गेलो. तेथे तर माझ्या खूप मैत्रिणी झाल्या. स्वाती, अश्विनी, पायल, लक्ष्मी, रितीका मयुरी, मयुरी ही त्यांची नावे. आणखीही खूप आहेत. पण नावं आठवत नाही हो! तेथे आम्हाला म्हणजे मला खूप मजा आली.
आधी आमचा असा खेळ झाला की ज्याने आमचा परिचय होईल. एक होता ‘परदेके पीछे क्या हे?’ आणि एकाचं नावं ठाऊक नाही मले. ठाऊक म्हणजे काय माहिती आहे का? ‘ठाऊक’ म्हणजे ‘माहिती’ बरं का ! आमची भाषा कळणार नाही तुम्हाला. पण आमची भाषा खूप चांगली आहे.
बोदवडला झालेले दोन्ही खेळ पण छानच होते. दोन्हीही मले खूप आवडले. त्यानंतर आमचा नाश्ता तयार झालं होता. मग नाश्ता झाल्यावर एक कृती गीत घेतले. त्याचे नाव ‘चाळणी मला गाळ ग नीट’ असंच काहीतरी होतं. पण मी सांगितलं तसं नाही बरं का! काय होते गड्या ?  हा! आठवलं आठवलं ‘चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट’ हे होते. त्या कुरती गीताचे नाव. स्वारी स्वारी कृतीगीत म्हणतात त्याला ! स्वारी अं गलती झाली. माफ करा मला. केलंना मला माफ ?
जाऊ द्या मग आपण पुढे जाऊ. मग आम्हाला एक ‘जॉय’ नावाचा विडीयो दाखवला. खूप छान विडीयो होता. तो विडीयो पाहिल्यावर एक चित्रपट दाखवले. त्याचे नावं ‘द गुड डायनासोर’ हे होते. इतके छान चित्रपट होते की सांगूच काय? मला तर तीन वेळा रडू आलं तो चित्रपट बघताना. मग तो चित्रपट पाहून झाल्यावर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिट फिरलो. मग पुन्हा दोन-तीन कृतीगीतं घेतली. परत गुरुपोर्णिमेचाही कार्यक्रम झाला. अध्यक्ष बाऱ्हे सर व प्रमुख पाहुणे ढेंगे सर म्हणजे आमचे दादा होते. मग उडान गटाने कविता कृतीसह करून दाखवली आणि एक नाटिका केली. ती नाटिका ‘भारुड’ स्वरूपातली होती. तिचे नाव ‘मला दादला नको गं बाई’ दादला म्हणजे नवरा. हे सर्व झालं की आम्ही चहा पिलो.
योगेश जवंजाळ सरांना व संस्कृती गटाला ग्रीटिंग दिलं आणि आम्ही वृक्षारोपण केलं. दोन शिसमचे झाडं लावली. त्यांना सांगितलं की ही झाडे आमची आठवण म्हणून जगवा. मग आम्ही त्यांना बाय-बाय म्हणून गाणे म्हणत घरी परतलो.
दिक्षा जगदेव इंगळे.
‘उडान संघ’, भोटा, जळगाव.
  


No comments:

Post a Comment