Wednesday 1 August 2018

निमंत्रकांच्या लेखणीतून


श्रीदेवीचा मृत्यू आणि मुलं
“सर तुम्हाला माहिती आहे का की एक हिरोईन (श्रीदेवी) मरण पावली?” या प्रश्नाने मुलांनी आजच्या बैठकीची सुरुवात केली. ती हार्ट अॅटॅकने दुबई इथे मेली असं टीव्हीवर दाखवत आहेत. “सर हार्ट अॅटॅक म्हणजे काय? तो का येतो?” अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आज आमच्यावर मुलांनी केला.
यावर आम्ही चर्चा करत असताना शरीर यंत्रणा कशी चालते, कुठला अवयव कसे कार्य करतो यासंदर्भात विडीयो बघुन शरीराची कार्य करण्याची पद्धती, तसेच शरीरातील घटक, त्याचे प्रमाण किती इत्यादी समजून घेतलं. सोबतच हार्ट अॅटॅक कसा येतो, कुठल्या कारणांनी येतो, बी.पी. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्यामागची कारणे तसेच मधुमेह इत्यादींच्या बाबतीत चर्चा झाली.
विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान सोबतीला आणखी विषय होता. कालच त्याच्या शेजारच्या वस्तीतील एका मनुष्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुलांनी स्वतः त्यांच्या पालकांसोबत घटनास्थळी जाऊन हे दृश्य बघितले होते त्यामुळे काहींना रात्री भीतीमुळे झोप नाही आली व काहींना अनेक शंका होत्या. यातून त्यांना अनेक प्रश्न पडले. जसे की,
आता त्या माणसाचा आत्मा भटकत राहील का?
त्याच्या मालकाने लक्ष दिलं नाही तर तो त्यांना त्रास देईल का?
त्याचं भूत बनेल का?
त्याच्या आत्म्याला यम घ्यायला आला असेल का?
आत्मा असतो की नसतो?
माणूस का मारतो? मेल्यावर कुठे जातो? यम त्याला नेतो का?
वरती तर आभाळ आहे, माती नाही मग तो वर कसा राहणार, खाली पडून जाणार नाही का?
जाळून टाकले की माती होते मग आपलं शरीर मातीचं बनलेलं असतं का?
आत्मा कसा असतो? तो कोणते कपडे घालतो?
असे अनेक प्रश्न विचारून मुलांनी आम्हाला भंडावून सोडले. मग त्यावर आम्ही त्यांना काही प्रतिप्रश्न केले. जसे की, भूत असतं का?, तुम्ही त्याला बघितलं आहे का? कसं दिसतं?, कुठे राहतो? आम्हाला दाखवाल का?, आपण भुताला भेटायला जायचं का?, इ.

याबाबत चर्चा करत असताना ७ मुले भूत – आत्मा असतात याला सहमती दर्शवित होते तर ५ जण या विरोधात होते. यापैकी विरोधात असणारे अंधश्रद्धा असते म्हणून मोकळे झाले तर सहमती दर्शविणारे वेगवेगळे उदाहरण देऊन विशेष सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
या प्रकारची चर्चा आजच्या बैठकीदरम्यान झाली. आमच्या परीने आम्ही मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
निमंत्रक: नितीन कायरकर, सचिन भोगे,
बाल शिवाजी संघ, नागपूर
 सुषमा व सुलक्षणाची ज्ञानदीप संघाला भेट

 आज (१५ जुलै, २०१८) सुषमा व सुलक्षणा कोलगावहून आमच्या गटाला भेटायला आल्या होत्या. खूप पाऊस असूनही त्या दोघी ठरल्याप्रमाणे आल्या.
मुलांना आधीच सांगितले होते. दोन मुलांनी स्वतःहून दिदींसाठी पुष्पगुच्छ बनवून आणला.
त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. एक प्रार्थना शिकवली. मुलांकडून एक गोष्ट तयार करून घेतली. कोडी घेतली. गाणी, कानगोष्टी खेळ घेतला. मुलांना खाऊ आणला होता - खजूर. मुलांनी एक शाळेतील गाणं त्यांना म्हणून दाखवलं.
Get-together निरामयला - जिथे सुषमा व सुलक्षणा गट घेतात तिथे आहे. त्याविषयी मुलांनी त्यांना प्रश्न विचारले. कुठे आहे, काय आहे इ. त्या दिवशी काय करायचं यावर चर्चा झाली. जेवण काय हेही ठरलं.
मुलांनी खूप मज्जा आणि धमाल केली. कोणीतरी नवीन आपल्या गटाला भेट द्यायला, खास आपल्यासाठी आलंय या भावनेने मुलं खूपच खुश होतात. त्यांचा उत्साह पाहून ते जाणवत होतं.
निमंत्रक: अश्विनी जोशी
ज्ञानदीप संघ, झोळंबे, सिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment