Wednesday 1 August 2018

संवादकीय


नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
तुम्ही सर्व कसे आहात? आम्ही इकडे मजेत आहोत.
महाराष्ट्रात समाधानकारक नसला तरी थोड्या फार प्रमाणात का होईना सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरण कसं हिरवं-हिरवं झालं आहे! सगळीकडे पसरलेली हिरवळ मनाला ताजं-तवानं करते. सगळीकडे काळ्या शेतातून चिमुकली चिमुकली हिरवी पाती डोकावताना दिसतायेत. शेतकरी शेतातील मशागतीच्या कामात मग्न झालेले दिसतायेत. आभाळातले काळे ढग फक्त पाण्याचीच नाही तर त्यासोबत आनंदाची आणि उत्साहाची देखील बरसात करतायेत असं वाटतं. सगळीकडे लगबग आणि उत्साहाचे वातावरण आहे.
आमची सुद्धा लगबग सुरु आहे बरं! काय म्हणता कशासाठी ??? तर ज्या संघांना आम्ही अजूनपर्यंत भेट देऊ शकलेलो नाही त्या संघाना भेट देण्यासाठीच आमची लगबग सुरु आहे. या वर्षी संघांची संख्या बरीच वाढल्याने सर्व संघाना भेट देणं अजून शक्य नाही झालेलं नाही आणि त्यासाठीच आमची बरीच फिरफिर सुरु आहे. तुम्ही देखील शाळा, अभ्यास, खेळ यात बरेच बिझी (व्यस्त) झाला असाल, नाही?
अशा व्यस्त वेळापत्रकात बरेचदा आपल्या आजू बाजूला काय घडतंय याची माहिती घ्यायला आपल्याला वेळच नसतो. तर काय असं सुरु आहे बरं आपल्या आजू बाजूला. राईनपाडा नावाच्या एका लहानशा गावात काय घडलं? सगळ्या गावाने मिळून पाच अनोळखी लोकांना इतकं मारलं की त्यांचे जीव गेले. ते लोक कोण आहेत हे देखील त्यांना विचारलं नाही की ते कशासाठी आले ते देखील विचारलं नाही. का मारलं असेल बर लोकांनी त्या पाच जणांना? तर ‘मुलं पळवणारी टोळी आली आहे’ या अफवेमुळे. या एका अफवेमुळे मागील दोन महिन्यांत भारत भरात जवळपास २० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय आणि दुर्दैव म्हणजे त्यातील सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रात मारल्या गेलेत. ज्या अनोळखी व्यक्तीला आपण मरेपर्यंत मारत असतो तो कोण आहे? कुठून आला आहे ? त्याचा गुन्हा काय ? आणि असलाच गुन्हा तर त्याला शिक्षा देणारे आपण कोण ? मरेपर्यंत मारणे ही कुठली शिक्षा ? याचा आपण आत्ताच विचार करून ठेवायला हवा. म्हणजे पुढे आपल्या समोर अशी घटना घडत असताना आपण कसे वागणार हे आपल्याला ठरवता येईल.
गर्दीचे शहाणपण असा एक शब्द प्रयोग आहे. त्याचा थोडक्यात अर्थ, अनेक सामान्य लोक मिळून जेव्हा एक समस्या सोडवतात तेव्हा ते एका विद्वान व्यक्तीपेक्षा अधिक सरस उपाय शोधू शकतात असा होतो. पण मागच्या काही महिन्यांमधील या आणि अशा काही घटना बघून गर्दीला खरच शहाणपण असतं का हा प्रश्न निर्माण झालाय.

आपल्याला या गर्दीचा भाग व्हायचंय का? याचा मात्र पक्का विचार आपल्याला आत्ताच करून ठेवायला हवा. गर्दीत असताना ऐनवेळी आपण कदाचित चुकीचा निर्णय घेऊ याची भीती वाटते!
भरारी वाचून तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत नक्की पोहचवा. तुम्हाला काय आवडलं काय आवडलं नाही हे देखील बिनदिक्कत कळवा.
तुमचे
प्रणाली, शैलेश

No comments:

Post a Comment