Saturday, 31 December 2016

कुमार निर्माणची गट बैठक

मित्रांनो आता कुमार निर्माण म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात कळाले आहे. कुमार निर्माणचे उपक्रम तुम्ही चर्चा करून विचार करून आणि गटात ठरवायचे आहे हे तुम्हाला कळाले असेलच. पण मग त्यासाठी सर्वांनी एकत्र जमलं पाहिजे. म्हणून कुमार निर्माण मध्ये तुम्ही मुलांनी दर आठवड्याला कमीत कमी एकदा तरी एकत्र भेटून बैठक (मिटिंग) करणे गरजेचे आहे.
आठवड्याची बैठक कधी घ्यायची, कुठे घ्यायची हे सर्वस्वी तुम्ही मुलांनी आणि तुमच्या सोबत काम करणाऱ्या निमंत्रकांनी मिळून ठरवायचे आहे. बैठक नेहमी एकाच ठिकाणी घेणे गरजेचे नाही तुम्ही दर वेळी बैठकीचे ठिकाण बदलू शकता.
या बैठकीत तुम्ही तुम्हाला आवडेल ते करू शकता. खेळ खेळू शकता, गाणी (समूह गीत) म्हणू शकता, एकमेकांना गोष्टी सांगू शकता, विनोद सांगू शकता, कोडी सांगू शकता. हे सर्व करतानाच त्या सोबत विविध विषयांवर चर्चा, विचार आणि अभ्यासही तुम्ही या बैठकींमध्ये करणे अपेक्षित आहे. परिसरातील विविध घटकांचे निरीक्षण करणे, तुमची निरीक्षणे गटात मांडणे, त्यावर चर्चा करणे, सर्वांनी मिळून त्याचा अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष कृतीकार्यक्रम ठरवणे हे सर्व देखील तुम्ही बैठकीत करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठरवताना तो कधी करायचा, त्यासाठी साहित्य काय-काय लागेल, इतर कुणाची मदत किंवा परवानगी लागेल का ?, जबाबदारीची कामे असतील तर ती कोण करणार, प्रत्येक छोट्या छोट्या कामची जबाबदारी वाटून घेणे हे सर्व तुम्ही बैठकीमध्ये करू शकता.
आपण बैठकीमध्ये काय केलं याची माहिती नोंदवून ठेवण्यासाठी म्हणून कुमार निर्माणची एक स्वतंत्र वही तुम्ही बनवा. या नोंदवही मध्ये बैठकीची तारीख, वार, बैठकीस कोण कोण उपस्थित होतं, कशावर चर्चा झाली, कोणी काय ठळक मतं मांडली, काय निर्णय झाला, काय कृती कार्यक्रम ठरला, त्याची कोणती जबाबदारी कोणाकडे देण्यात आली याची सविस्तर नोंद ठेवा. बैठक संपताना, पुढील बैठक कधी होणार, त्यात चर्चेचा काय विषय असेल आणि दोन बैठकींच्या दरम्यान काय करणे अपेक्षित आहे याची देखील चर्चा करवी ते नोंदवहीमध्ये लिहून ठेवावे.
कृती कार्यक्रम केल्यानंतर किंवा करताना तुम्हाला काय अनुभव आले, काय नवीन शिकायला मिळाले आणि हा कृती कार्यक्रम तुम्हाला कसा सुचला याविषयी देखील तुम्ही नोंदवही मध्ये लिहून ठेवा. तुमचे निवडक अनुभव आपण भरारी मध्ये प्रकाशित करू.
पण समजा तुमची बैठक ठरलेली आहे आणि नेमकं तुमच्या सोबत काम करणाऱ्या निमंत्रकांना कुठेतरी बाहेर जावं लागतंय आणि त्यांना बैठकीला येणे शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही काय कराल?
कुमार निर्माणच्या बैठकीत निमंत्रकांनी उपस्थित असणं खरं तर गरजेचं आहे पण समजा त्यांना नसेल जमत तरी तुम्ही मुलं-मुली मिळून बैठक पार पाडू शकता. बैठकीची सविस्तर माहिती तुम्ही नोंद वहीत लिहालच, ती नोंद वही निमंत्रक आले की त्यांना दाखवा. म्हणजे त्यांनाही कळेल तुम्ही बैठकीत काय केलं ते.
आता ही नोंदवही कोणाकडे ठेवायची? बैठकीला सर्वांना कोणी बोलवायचं? वाटून घेतलेल्या जबाबदारी प्रमाणे सर्व कामं होतायेत का? हे कोणी बघायचं? तर या साठी कुमार निर्माणच्या गटाला एक गटप्रमुख असला पाहिजे. हा गटप्रमुख तुम्ही सर्वांनी मिळून निवडावा. तुम्ही एकच गटप्रमुख वर्षभर ठेवू शकता किंवा महिन्याला, दोन महिन्याला बदलू शकतातयाबाबतीतही तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे.
अशा बैठका तुम्ही वर्षभर घ्या, त्यात चर्चा करा, नवनवीन कल्पना शोधून काढा, त्या प्रत्यक्षात आणा आणि धमाल करा!


No comments:

Post a Comment