Saturday 31 December 2016

गोष्ट


खूप वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर मानवाचा जन्म झालेला नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. सगळ्या पृथ्वीवर जंगल पसरलेलं होतं. नदी नाले स्वच्छ पाण्याने भरून वाहत. काही ठिकाणी वाळवंट पसरलेलं होतं, तर काही ठिकाणी बर्फाच्छादित उंच शिखरं होती. जंगलांमध्ये प्राणी आणि पक्षी एकमेकांना मदत करत मजेत राहत होते.
पण एक दिवस कुठल्याशा कारणावरून प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये भांडण सुरु झालं. बघता बघता भांडणाने उग्र रूप धारण केलं. वाद-विवादापासून सुरु झालेलं भांडण लवकरच मारामारी पर्यंत पोहचलं. दोन्ही बाजूंनी युद्धाची तयारी जोरात सुरु झाली. सगळे आपापल्या शस्र-अस्त्रांची जमवाजमव करू लागले. प्राण्यांनी वाघाला आपला राजा निवडलं तर पक्ष्यांचा राजा म्हणून गरुडाची निवड करण्यात आली.
युद्धाचा सराव जोरात सुरु झाला. प्राण्यांकडून हत्तीला चांगला खाऊ पिऊ घातलं जाऊ लागलं. घोड्यांच्या पायांना नाल ठोकून घेतले गेले. माकडांना झाडावर चढून पक्ष्यांची घरटी पडण्याचं काम देण्यात आलं. पक्षांनी आपापल्या चोचींना धार करून घेतल्या, नखं तीक्ष्ण करून घेतली. अशाप्रकारे सगळीकडे धामधुमीचा माहोल निर्माण झाला.

या सगळ्यात वटवाघूळ मात्र कुठेही नव्हते. वटवाघूळाने कुणाचीही बाजू घेता तटस्थ राहायचं ठरवलं होतं हे कळताच प्राणी आणि पक्षांकडून वटवाघूळाला आपल्या बाजूनी घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. प्राणांच्या वतीने वाघ वटवाघूळाला भेटायला गेला. वाघाने वटवाघूळाला समजावले की तू अंडी देता पिल्लांना जन्म देतोस म्हणजे तू प्राणी आहेस म्हणून तू आमच्याकडून लढायला ये. पण वटवाघूळाने त्याला नकार दिला. मग पक्षांच्या वतीने गरुड वटवाघूळाच्या भेटीसाठी गेला. त्याने गरुडाला समजावलं की तू पक्षी आहेस. तुला पक्षांप्रमाणे उडता येतं म्हणून तू आमच्या बाजूने लढायला ये. पण वटवाघूळाने त्याला पण नकार दिला.
शेवटी प्राणांमध्ये आणि पक्षांमध्ये मोठं युद्ध झालं. दोन्ही बाजूंनी खूप सैनिक धारातीर्थी पडले. खूप दिवस युद्ध चालल्यानंतरही उद्धाचा निकाल काही लागेना. कोण जिंकेल किंवा कोण हरेल याविषयी पुसटसा अंदाज देखील येत नव्हता. शेवटी खूप दिवस युद्ध चालल्याने सगळे  अगदी दमून गेले. दोन्ही बाजूंचा अन्नसाठा देखील संपत आला. शेवटी प्राणी वाघाकडे गेले आणि म्हणाले कीमहाराज अजून किती दिवस असं युद्ध चालणार कोणीही जिंकत नाहीये आपला अन्नसाठा देखील आता संपत आलाय, सगळ्यांचेच हालहाल होतायत’. तसेच सगळे पक्षी देखील मिळून गरुडाकडे गेले आणि हे युद्ध थांबवूया असं म्हणाले.
शेवटी वाघ आणि गरुडाने एकत्र बसून चर्चा केली आणि ठरवलं की या युद्धातून काहीही निष्पन्न होतं नाहीये तरी आपण हे युद्ध थांबवूया आणि पुन्हा एकदा शांततेने एकमेकांसोबत राहूया.
अशा प्रकारे प्राणी आणि पक्षी यांच्यातील भांडण संपलं आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. जंगलांत पुन्हा एकदा शांतता नांदू लागली. प्राणी आणि पक्षांमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले.
पण या युद्धामध्ये वटवाघूळाने कोणाचीच बाजू घेतल्याने त्याला प्रण्यांनीही नाकारलं आणि पक्ष्यांनीही नाकारलं. वटवाघूळाला कोणीच आपल्यात घेईना आणि शेवटी धड प्राणी पक्षी अशी त्याची गत झाली आणि ते झाडावर लटकत बसलं.

No comments:

Post a Comment