Saturday, 31 December 2016

संपादकीय

नमस्कार मित्रांनो,

खूप दिवसांनी आपली भेट होत आहे. विभागीय सादरीकरण आणि कौतुक सोहळ्यानंतर पुन्हा एकदा भरारीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत.
या दरम्यान बरंच काही घडून गेलं असेल. तुम्ही शाळेतील पुढच्या वर्गात गेला असाल. नव्याने शाळा पुन्हा सुरु होऊन आता सहामाही परीक्षा देखील झाली असेल. कदाचित तुम्ही भरारीची वाटही बघितली असेल. काही जणांची शाळा बदलली असेल. त्यांनी आत्तापर्यंत नवीन शाळेत नवीन मित्र बनवले असतील आणि बरंच काही घडलं असेल.
आम्हीही यादरम्यान खूप काही केलं आहे. तुमच्यासाठी या वर्षी नवीन काय काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. यासाठी आम्ही आपले मार्गदर्शक डॉ. अभय बंग आणि श्री. विवेक सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली.
कुमार निर्माणच्या चौथ्या सत्रात अनेक नवीन गट आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील अनेक नवीन मित्र मिळणार आहेत. या नवीन मित्रांचं आपण कुमार निर्माण मध्ये स्वागत करूया. 
कुमार निर्माणच्या निमंत्रकांसाठी आम्ही नुकतीच पुणे येथे एक कार्यशाळा (कॅम्प) आयोजित केली होती. तिथे महाराष्ट्रभरातून कुमार निर्माणचे निमंत्रक एकत्र आले, आम्ही सर्वांनी मिळून खूप धमाल केली आणि खूप काही शिकलो देखील. तिथे आम्ही खेळ खेळलो, गाणी म्हटली, विविध विषयांवर चर्चा केली इ.
तर यावर्षी कुमार निर्माण मध्ये तुमच्यासाठी आम्ही खूप काही नवीन घेऊन आलोय याबद्दल खात्री बाळगा.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही अनेक भन्नाट उपक्रम कराल या बद्दल आम्हाला खात्री आहे. काही गटांनी तर सुरुवात देखील केली असेल. इतक्या दिवसांत तुम्ही काय काय केलं किंवा आजूबाजूला काय काय घडलं याविषयी आम्हाला नक्की लिहून पाठवा. एखादा नवीन उपक्रम तुम्हाला सुचला असेल किंवा केला असेल तर त्याबद्दलही कळवा.
चला तर मग कुमार निर्माण च्या नवीन सत्रात नवीन उपक्रम करण्यासाठी सज्ज होऊया. 

आणि हो आम्ही लवकरच येतोय तुमच्या भेटीला तुमच्या गावी… :)
पुढील प्रवासासाठी टीम कुमार निर्माणच्या  तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

- कुमार निर्माण टीम


No comments:

Post a Comment