Wednesday, 30 December 2015

मुलांच्या लेखणीतून - छत्रछाया गट


बुलढाणा येथील छत्रछायाच्या आश्रमात राहत असताना, आम्हाला इथे मच्छरांचा खूप त्रास होत होता. आम्ही मछरांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आमच्या आजूबाजूचा परिसर तसा स्वच्छ होताच पण मच्छर होऊ नये म्हणून आम्ही परिसर जास्तीत जास्त कसा स्वच्छ ठेवता येईल यासाठी प्रयत्न करू लागलो. त्यामुळे थोडेफार मच्छर कमी झाले. तरी सुद्धा मच्छरांचा सुळसुळाट होताच, त्यामुळे आम्ही मच्छरांच्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी एक बैठक घेतली. आम्ही घेतलेल्या बैठकीतून एक चांगला उपाय निघाला. तो उपाय होता लिंबाच्या पानांचा धूर करणे.
मग आम्ही मोठ्या उत्साहाने कडुलिंबाची पाने तोडून त्यांचा धूर करून पहिला. त्यामुळे मच्छरांची संख्या थोडी कमी झाली. मग आम्ही हा उपक्रम दर दोन-तीन दिवसांतून एकदा करू लागलो. आता वसतिगृहात मच्छरांचा काहीही त्रास नाही. तसेच कडुलिंबाच्या डांगा तोडल्यामुळे त्याची पाने तोडून मग त्या फांद्याच्या कड्या तशाच बेकामी पडत. मच्छर चावल्यामुळे आमच्या पूर्ण अंगाला खाज सुटायची. त्यामुळे आम्ही त्या उरलेल्या काड्या पाण्यात टाकून उकळल्या व त्या उकळलेल्या पाण्याने नंतर अंघोळ करायचो. त्यामुळे आमच्या अंगावर पुळण व अंगाला जी खाज सुटायची ती बरी झाली. अशाप्रकारे त्या वृक्षामुळे आमचे प्रश्न कायमचे सुटले, आमच्या शारीरिक स्थितीला जो धोका होता तो टळला. त्यामुळे शेवटी एवढेच बोलावेसे वाटते. झाडे लावा, झाडे जगवा!
आकाश, छत्रछाया गट, बुलढाणा

गट निमंत्रक: कन्हैय्या मातोळे (८२७५९४४९९५)

No comments:

Post a Comment