Wednesday 30 December 2015

बोलकी पुस्तके

कल्पक बनूया - डॉ. अशोक निरफराके

एखादी कलाकृती बघितल्यावर आपलं मन अगदी भारावून जातं. मग ती कलाकृती म्हणजे एखादं चित्रं, गाणं, सिनेमा, कादंबरी, कविता, वैज्ञानिक शोध असं काहींही असू शकतं. या कलाकृती बघितल्यानंतर आपल्या मनात नक्कीच प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आपल्याला अशा कल्पना का नाही सुचत? मग आपण या लोकांना कल्पकतेची दैवी देणगी प्राप्त आहे असं म्हणून शांत बसतो.

पण खरं पाहता कल्पकता प्रत्येकातंच असते आणि ही कल्पकता वापरून आपणही नवीन काही तरी निर्माण करू शकतो. पण आपल्यातल्या या कल्पकतेची ना आपल्याला कधी जाणीव झालेली असते ना कल्पकता वाढीस लागावी म्हणून काही प्रयत्न. पण कल्पकता प्रत्येकात असते आणि ती प्रयत्नांनी वाढवता येते हे आता शास्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

आपल्या आतली कल्पकता कशी ओळखायची, कशी वाढवायची आणि ती  कशी वापरायची याचं सखोल संशोधन करून डॉ.अशोक निरफराके यांनी आपल्यासाठी हे सर्व सोप्या शब्दात या पुस्तकात मांडून ठेवलं आहे.

फक्त पुस्तक वाचून कल्पकता वाढेल असे समजणे नक्कीच चुकीचे ठरेल पण लेखकाने त्या दृष्टीनेही सोय करून ठेवली आहे. या पुस्तकात प्रत्येक पाठाखाली काही कृती सोदाहरण दिलेल्या आहेत. या कृतीमधून कल्पकता वाढीस लागण्यास नक्कीच मदत होईल.

ज्ञानप्रबोधिनी मध्ये केलेल्या प्रयोगातून लेखकाने जे निष्कर्ष काढलेत तेही या पुस्तकात आहेत. पुस्तक वाचण्यास सोपं व्हावं म्हणून त्यात छोटे-छोटे पाठ केले आहेत. त्यामुळे पूर्ण पुस्तक हे कल्पकता वाढवण्यासाठीचं पाठ्यपुस्तकच आहे असं आपण म्हणू शकतो.

संवेदनशीलता जागी ठेवली, चौकस निरीक्षण केले, कल्पनाविहार करायला लागलात , आणि बहुदिश विचार करायला शिकलात, तर आपणही कल्पक बनू शकतो ! त्यासाठीचे अनेक कृतीपाठ या पुस्तकात आढळतात.

पुस्तकात कल्पकतेचा लेखकाने प्रत्येक लहान मोठ्या अंगाने विचार केला आहे. कल्पकता वाढीस लागण्यासाठी लहान लहान पायऱ्या दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठ म्हणजे एक पायरी आहे. कल्पकतेच्या दिशेने एक एक पायरी चढल्याचा भास एक-एक पाठ पूर्ण केल्यावर आपल्याला होतो. पाठानंतरच्या कृती पाठाइतक्याच महत्वाच्या आहेत. कृतींमुळे हा कल्पकतेचा अभ्यास फक्त पोपटपंची न राहता खऱ्या अर्थाने अभ्यास होतो.

शिक्षक व पालक यांच्या साठी हे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे. शिक्षक यातील कृती वर्गात घेऊ शकतात, यामुळे मुलांची कल्पकता वाढण्यास नक्कीच मदत होईल. स्वतः मुले देखील पुस्तक वाचून आणि कृती करून यातून खूप काही शिकू शकतात.


तर हे पुस्तक नक्की वाचा आणि कल्पनेच्या जोरावर नवनवीन गोष्टी शोधून काढा !

No comments:

Post a Comment