Wednesday 30 December 2015

बैठक वृत्तांत – जागृती गट

मुलांनी लिहिलेला बैठक वृतांत

दिवाळीच्या सुटीत मुले गावाला गेलेली असताना आपापल्या जागी जागृती गटातील मुलांनी वेगवेगळे कृतिकार्यक्रम केले व डोमरीला परत आल्यानंतर आपापल्या कृतिकार्यक्रमांचा वृत्तांत लिहिला. गटातील जवळ जवळ सगळ्यांनीच फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली.




दिवाळी सुट्टीनंतर जागृती गटाची ही पहिलीच बैठक. आजच्या बैठकीमध्ये सुरवातीला ऑक्टोबर च्या ‘भरारी’ मासिकातील लेखांचे वाचन केले. आपल्या गटाचे फोटो व वृत्त तसेच इतर गटांच्या कृतिकार्यक्रमांचे वाचन केल्यानंतर खूप आनंद झाला. ‘बोलकी पुस्तके’, ‘अशिक्षित कोण?’ हा लेख खूप आवडला. त्यानंतर विनायक दादांनी गायलेले कुमार गीत सर्वांनी ऐकले.

दिवाळी सुट्ट्यांमध्ये काय कृतिकार्यक्रम करायचे यावर सुट्टीला जाण्यापूर्वी चर्चा झाली होती. फटाकेमुक्त दिवाळी या उपक्रमाला सर्व मुलांनी छान प्रतिसाद दिला. गटाच्या मुलांनी एकूण ४५ जणांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. जागृती ग्रुपमध्ये १५ वेगवेगळ्या गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत. सरासरी १५ गावांत कुमार निर्माणचे काम या माध्यमाने झाले. याचसोबत गटातील मुलांनी खालील कृतिकार्यक्रम केले.

आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. मी गावाकडे गेल्यानंतर घरी आईला व पप्पांना सांगितले की मी या दिवाळीला फटाके नाही फोडणार. हे सांगितल्यानंतर त्या दोघांना खूप आनंद झाला. नंतर मी त्यांना सांगितले की मी माझ्या पाच मित्रांना पण फटाके फोडून नाही देणार. सांगितल्याप्रमाणे मी माझ्या पाच मित्रांना फटाके न फोडण्याबद्दल समजावले आणि त्यांनी पण माझे ऐकले. त्यांच्या आई-वडिलांना पण खूप आनंद झाला. दुसरं म्हणजे आमच्या गावातील ९०% माणसे ऊस तोडायला जातात. तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय नसते म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण एका मुलीच्या शिक्षणाची सोय आपल्या घरी करू शकतो. तर मी माझ्या घरच्यांना तसं विचारलं तर घरच्यांनी पण त्याला होकार दिला. मग मी त्या मुलीच्या घरी गेलो व त्यांना सांगितले की तुमची मुलगी तुम्ही आमच्या घरी ठेऊ शकता. हे ऐकून त्या मुलीच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला व हे सगळं बघून मला पण खूप खूप आनंद झाला   
 - प्रवीण बरगे

दिवाळीच्या सुट्टीतील अनुभव खूप छान होता. दिवाळीच्या सुट्टीत मी एका अनोळखी माणसाला मदत केली. एका व्यक्तीला खूप भूक लागली होती. तो व्यक्ती वडवणीतील होता. मी एका गाड्यावर भेळ खात होतो तेव्हा तो तिथे उभा होता. त्याला मी विचारले की तुम्हाला काय करायचे आहे. तो म्हणाला की मला खूप भूक लागली आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्याला मी खुर्चीवर बसवले व एक भेळ घेऊन दिली. त्यावेळेस त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता व मला ही खूप आनंद वाटला.
दिवाळी म्हटली की फटाके आलेच पण यावर्षी मी गुरुकुलातून निश्चय करून घरी गेलो होतो की यावर्षी फटाके वाजवायचे नाहीत व मित्रांनाही वाजू दयायचे नाहीत. त्यामुळे दिवाळीत एकही फटाका वाजवू दिले नाही.
- विशाल बादाडे

मी गावाकडे गेल्यावर गावातील ६ वीच्या वर्गातील २ मुलांना फटाक्याचे तोटे व परिणाम काय आहेत हे सांगितले. ते म्हणाले की आम्ही पुढच्या वेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू.
माझ्या गावातील शाळेसमोर कागदे टाकून दिले होते. मला ते दिसले तेव्हा गावातील मुले तिथे क्रिकेट खेळत होते. मी त्यांना थोडावेळ समजावून सांगितले की आपण ते साफ करूया तर त्यांनी पहिल्यांदा नकार दिला पण नंतर ते मला म्हणाले की चल आम्ही तुला ही कागदं उचलायला मदत करू लागतो. मग आम्ही ते काम केले.
एक कुत्रा रस्त्याने जात असताना त्याला एका गाडीने उडवले व तो उडून पडला. त्याला पाणी हवे होते. त्याला खूप जखम झाली होती. जवळ एक हौद होता. मी त्या हौदातले पाणी कुत्र्याला पाजले आणि त्याला सोडून दिले. कुत्र्याला छोटीशी मदत करून मला छान वाटले.
अभिजित शिंदे

मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गल्ली स्वच्छ करायचे ठरवले होते. मी जेव्हा हे घरी सांगितले तेव्हा माझ्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला. मित्रांनीपण मला मदत केली नाही, सर्वजण मला हसत होते. पण मग मी ठरवलं की ते काम पूर्णच करायचं. मी सर्वांना त्यांच्या घरात जाऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यातील काही लोकांनी माझे म्हणणे ऐकले नाही तर काही जणांनी लगेच स्वच्छता करण्यास सुरवात केली तर काही जणांनी गल्ली साफ करण्यासही मदत केली. नंतर माझे सर्व मित्रही माझ्या मदतीला आले. आमच्या गल्लीत आत्ता खूप स्वच्छता असते.
मी आमच्या गल्लीतल्या सर्वांना फटाक्याचे दुष्परिणाम सांगितले तर कुणीही ऐकले नाही. मी माझ्या मावशीच्या गावाला गेलो होतो. तेथील सर्वांना फटाक्याचे तोटे सांगितले. त्यातील ७ जणांनी माझे म्हणणे ऐकले. मला या दोन्ही उपक्रमातून खूप आनंद मिळाला. मला यातून वेगवेगळे अनुभव आले.
आकाश रांजवन

मी असं ठरवलं की या वर्षीची दिवाळी फटाके न वाजवता साजरी करायची. घरी गेल्यावर वडिलांनी मला विचारले की, यावर्षी फटाके किती आणायचे परंतु मी म्हटलो की यावर्षी मी फटाके वाजवणार नाही. वडिलांना हे ऐकून चक्क धक्काच बसला व ते मला म्हणाले की गेल्यावर्षी तूच होतास जो फटाके कमी आणले म्हणून रडत होतास. परंतु यावर्षी इतका बदल कसा झाला हा प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा मी त्यांना सांगितले की मी आतापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद घेतला परंतु माझ्यामुळे प्रदूषण वाढतंय याचा मी विचार केला व म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची ठरवली. फटाक्याच्या पैस्यातून मी एक घरची घडयाळ दुरुस्त करून आणली. याचा आनंद मला व माझ्या घरच्यांना झाला.
बाळासाहेब मायकर

सुट्ट्यांत मला फटाके वाजवण्याचा खूप मोह झाला. पण मी मोह टाळला व फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. मी माझ्यासंगे माझ्या बहिणीला आणि आत्यांच्या मुलाला सुद्धा यामध्ये सामील केले.
दुसरं म्हणजे माझी बहिण; आयशा. ती कामामध्ये उरलेले पैसे एका डब्यामध्ये टाकत आहे, हे मला कळताच मी पण कधी आई किंवा वडिलांकडून घेतलेले काही पैसे त्यामध्ये टाकायचो व कधी अडचण आल्यास त्यातील पैसे घ्यायचे. मी पुण्याला चाकण येथे गेलो असताना, मी घरात पाहिले की घडी नाही. नंतर मी आत्याला विचारले तर आत्या म्हणाली की घडी आहे परंतु चालत नाही. नंतर ती हेही म्हणाली की घडी नीट करण्यासाठी नेली होती परंतु ती नीट झाली नाही. मी विचार केला की, आपण या घड्याळीला नीट करू शकतो. तर अशाप्रकारे मी बचतीच्या पैशातून घडयाळ नीट केले. नंतर मी त्याच पैशातून अजून दोन घड्याळी नीट केल्या. नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी डोमरीला असताना अनेकदा माझ्या आजीला व चुलतीला व्यसनाचे काय परीणाम होतात हे सांगितले, परंतु त्यांनी सोडून दिले. नंतर मी त्यांना परत नीट समजावून सांगितले, मग त्यांनी तंबाकू सोडण्याचा बेत केला.
 – जायेद पठाण

मी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेलो होतो. एके दिवशी मी शेतात गेलो होतो. आमच्या गेटच्या बाजूच्या शेतात एक गरीब आजीबाई राहत होत्या. त्या आमच्या शेतात पाणी न्यायला आल्या होत्या. त्या आमच्या शेतातच झाडाच्या सावलीला बसल्या व भाकरी खाऊ लागल्या. भर दिवाळीत त्या चटणी व भाकरी खात होत्या. त्यांची सून व मुलगा ऊस तोडायला गेले होते. मला वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगून लाडू, करंज्या, शंकरपाळे, चकली असा फराळ त्यांना नेऊन दिला. त्या आजीबाईंना फार कौतुक वाटले व आनंदही झाला. मलाही दुसऱ्याला मदत केल्याचा आनंद वाटला.
आम्ही सर्व जणांनी फटाके न वाजवण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार मी फटाके वाजवले नाही. मित्रांनी आग्रह केला पण मी पक्का निर्धार केला होता.
मी शेतात गेलो असता मी लावलेली दोन आंब्याची झाडे सुकत असल्याचे दिसले. मी झाडांना आळे करून पाणी टाकले व त्यात थोडे शेणखत टाकून त्याला काट्यांचे कुंपण केले. आठ-दहा दिवसांनी ती झाडे टवटवीत दिसत होते. हे पाहून मला खूप आनंद झाला.
कपिल दत्तात्रय कदम

मी गुरुकुलातून जातानाच फटाके वाजवायचे नाही असे ठरवले होते. मी गावाकडे गेल्यावर एकही फटाका वाजवला नाही. त्या फटाक्याच्या पैशातून मी आईला एक बांगड्याचा जोड घेऊन दिला. त्यातून आईला व मला खूप आनंद झाला. मला त्यातून दोन गोष्टी मिळाल्या; पहिली म्हणजे मला खूप आनंद मिळाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसे ही वाचले. मी फटाके वाजवले नाही व माझ्या मित्राला वाजवू दिले नाही.
मी दुसरा अनुभव घेतला तो म्हणजे असा की, माझ्या गावातील एका घरात आजी एकट्याच होत्या. त्यांचा मुलगा ऊस तोडीला गेला होता. तर त्यांनी दिवाळीला काही बनवले नव्हते. तर मी त्यांच्या घरून त्यांना बोलावून आणले व त्यांना माझ्या घरी जेवायला दिले. यातून त्यांनाही खूप आनंद झाला आणि मलाही खूप खूप आनंद झाला.
महेश कवडे

मी दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गावाकडे जाऊ लागलो होतो. मी बीड या गावातून जात होतो. तेथे खूप माणसे वावरत होती. त्यामधला मी पण एक होतो, मी एका रस्त्याने जात होतो. मी बाजूला पाहिले की त्या रस्त्याच्या कडेने एका गरीब व्यक्ती चालला होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. तर मी त्या गरीब माणसाला माझ्या वडिलांची पॅन्ट दिली. तेव्हा मला खूप छान वाटले.
नारायण तांगडे

सुट्टीत मी फटाके न वाजवण्याचा अनुभव घेण्याचे ठरवले. घरी गेल्यानंतर माझे सर्व मित्र मला फटाके वाजवण्यास प्रेरित करत होते. पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम होतो. घरचे सुद्धा फटाके वाजवण्यास सांगत होते पण मी त्यांना फटाके वाजवण्याचे तोटे समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी मला जास्त आग्रह केला नाही. फटाके न वाजवण्यासाठी मी माझ्या एका मित्रास प्रेरित केले. त्याच्या घरच्यांना सुद्धा बरं वाटलं. फटाक्याच्या उपक्रमासोबतच मी अजून एक गोष्ट केली.
त्यामध्ये एका मुस्लिम घरच्या कुटुंबास दिवाळीच्या जेवणाचे नेऊन दिले. कारण आमच्या गल्लीत तेवढे एकाच मुस्लिम कुटुंब आहे. फक्त ते घर सोडले तर सर्वांच्या घरी सण साजरा होतोय, सर्वजण खाण्यासाठी काहीतरी गोड बनवताय, दिवाळीचा आनंद घेताय तर ते मला काही बरं वाटलं नाही. मग मी घरी सांगून एक ताट केले व त्यांना नेऊन दिले. त्यांना फार बरे वाटले व मलाही त्याचा खूप आनंद झाला.
प्रसाद गोडसे

मी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेलो होतो तेव्हा वडिलांना विचारले की गांडूळ खत तयार करू का? खताचे महत्व त्यांना पटवून सांगितले, वडिलांची परवानगी घेतली. नंतर मी भावाला सांगितले तर तो पण हो म्हणाला. अगोदर माप घेऊन त्या लेवलने मी खंदले. गुड्ग्याइतका खड्डा खदला. नंतर मातीचा खाली लेप दिला आणि त्याच्या कडेने २-२ विटा लाऊन त्याला पक्क बसवलं. नंतर एक कापड खाली टाकलं, त्यात शेण टाकायला सुरवात केली, तेव्हा घरच्यांनी विरोध केला. ते म्हणाले की कसलं खत करतोय ते अगोदरचंच खात आहे पण तरी मी ते काम पूर्ण केले. नंतर गांडूळ विकत आणून त्यात टाकले.
रोहन चव्हाण

No comments:

Post a Comment