Thursday, 31 August 2017

मुलांच्या लेखणीतून

भरारी गट, जळगाव
23 जुलैला गटाची पहिली सभा भरडीला शाळेच्या प्रांगणात घेण्यात आली; यात प्रथम लोकशाही फद्धतीने गट प्रमुख यांची निवड करण्यात आली. नंतर शिक्षकांच्या हातात पेपर होता त्यातल्या डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यात युद्धजन्य परिस्थिती अशी बातमी होती. मुलांनी याच बातमीचा धागा धरून आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला तर असा चर्चेचा विषय समोर आला. सरांनी सांगितले चिनी वस्तूवर बहिष्कार टाकल्याने काय होईल ?
आमच्यात चर्चा सुरू झाली. ‘चिनी वस्तू आपण विकत घेतो

त्यामुळे त्या देशातील उद्योगांना पैसा मिळून त्यांची भरभराट होते. त्यांना आपल्याकडून वस्तूच्या मोबदल्यात पैसा मिळतो आणि त्या पैशाचा उपोयग करून ते आपल्या देशासोबत भांडण करतात जर आपण त्या वस्तू घेतल्या नाहीतर त्यांच्याकडे जास्तीचे पैसे येणार नाहीत आणि त्याची आपल्या सोबत भांडण करणे कमी होईल आणि सर्व भारतीयांनी चीनी वस्तू वस्तू घेणे बंद केले तर ते आपल्या वाट्याला येणार नाही.’ मग सरांनी सांगितले अशा कोणत्या चिनी वस्तूवर बहिष्कार टाकणार? आणि गरज भागविण्यासाठी त्याऐवजी कोणत्या वस्तू वापरणार? असा सरांनी आम्हाला प्रश्न केला. याची पुढील मिटींग पर्यंत यादी करायचे ठरले. सोबतच आम्ही एक घोषवाक्य बनवले; ‘सुनो मेरे भाई, सून मेरी बहना, कभी न लेना मेड इन चाइना!’
मयूर जंजाळ, ७वी

मोहर गट, लांजा

आम्ही जेव्हा पोस्ट ऑफिसला भेट द्यायला गेलो तेव्हा रस्त्याच्या कडेला कचरा साठला आणि पडला होता. पोस्ट ऑफिसला भेट देऊन आल्यानंतर आम्ही ‘कचरा’ या विषयावर चर्चा केली. सरांनी विचारलं, “कचऱ्यात नेमक्या कोणकोणत्या वस्तू येतात?”, मुले म्हणाली, “खाऊचे कागद, पिशव्या, बाटल्या.”
सरांनी आम्हाला कचऱ्याविषयीचा विडीयो दाखवला. त्यामध्ये पशु-प्राण्यांनी कचरा म्हणजेच पिशव्या खाल्ल्या होत्या आणि ते २ ते ३ दिवसांत मरण पावले. तसेच पक्ष्यांनीही पिशव्या खाल्ल्या. तेदेखील मृत्युमुखी पाडले.
या प्रकारच्या कचऱ्याच्या वापरामुळे कोणकोणते फायदे व नुकसान होते यावर आता आम्ही चर्चा करत आहोत.
निमंत्रक: सुहास शिगम
आम्हाला सापडलेल्या चिमणीची गोष्ट – शिवाजी नगर गट, नागपूर
काल आम्ही सगळे खेळत असतांना वैष्णवीला एक चिमणीच पिल्लू दिसलं. त्याला पंख फुटलेले नव्हते आणि डोळे पण उघडायचे होते. तो छोटंसं पिल्लू होतं म्हणून आम्ही त्याला घरी आणलं. भूमीने एक पानाचा घोसला बनवला होत. त्या घोसल्यामध्ये आम्ही पान  टाकलं आणि आम्ही त्या पिल्लाला घोसल्यामध्ये ठेवलं. मग त्या पिल्लाच्या आईने तिच्या तोंडात चारा टाकतांना आम्ही लपून पाहत होतो. मग आम्ही पाणी पाजलं. एक मुलगा मात्र त्याला घेऊन गेला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला ते परत मागितलं आणि पुन्हा घरी आणलं. मग त्याला आम्ही तुळशीच्या झाडावर ठेवलं. आम्ही कामात होतो म्हणून एका मुलीजवळ दिलं. नंतर आम्ही त्याला आमच्या घराच्या बाजूच्या गल्लीत ठेवलं. तेव्हा तिथं चिमण्या आल्या त्या छोट्याश्या पिल्लासमोर ते पिल्लू आलं. तेव्हा चिमणी त्यांच्या जवळ जात होती. तेव्हा त्या चिमण्या पळून जायच्या. मग आम्ही त्या पिल्लाला तिथून उचललं. आम्ही नवीन घोसला बनवला. त्या घोसल्याला तुळशी पाशी ठेवलं. त्या पिल्लाची मम्मी तिथे होती. मग आम्ही त्या पिल्लाच्या मम्मीला हाकलल. त्या पिल्लाची मम्मी येत नव्हती. मग काल आभाळ आलं आणि मग जोरात पाऊस आला. मग त्या पिल्लाला जिथे पाऊस येत नव्हता. तिथं ठेवलं मग दुसऱ्या दिवशी त्या पिल्लाला दिसलं नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी पासून त्या पिल्लाला दिसत होत. मग ते चिमणीच्यासोबत या झाडावरून त्या झाडावर उडत होतं आणि अश्या प्रकारे आम्ही त्या पिल्लाचा जीव वाचवला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सर आल्यावर आम्ही सरांना ती चिमणी दाखवली व चिमणीची गोष्ट सांगितली म्हणून ती गोष्ट सरांनी आम्हाला लिहायला सांगतली व आम्ही ती लिहिली. आम्हाला जीव वाचावल्याचा खुप आनंद झाला.
निमंत्रक: नितीन कायरकर
 विशेष
उबंटू गट, पुणे


उबंटू गटाला निमंत्रकाने चर्चायुक्त अभ्यास दिला होता. ‘तुमच्यासाठी आता नवीन वर्ग तयार होत आहेत, त्यात तुम्हाला भिंतींवर काय हवे ते लिहून द्या.’ त्यावर गटातील मुलांनी वेगवेगळी मते दिली. बहुतांश मुलांनी आम्हाला वर्गात देवी- देवतांचे फोटो हवेत, म्हणजे परीक्षेच्यावेळी आशिर्वाद घेता येतील. सोबतच थोर व्यक्तींचे फोटो लावा असेही काहींचे मत आले. मग गटात खुली चर्चा व तोंडी मतेही मागितली गेली. तेव्हा एक मुलगा म्हटला की शिवाजी महाराजांचा फोटो लावा, लगेच दुसरा म्हटला आंबेडकरांचा लावा, तिसरा अजून काहीतरी म्हटला... आणि असे चालूच राहिले. मग गटातील वाद टाळण्यासाठी कृती ठरली की, काय लावायचे व का लावायचे याचे कारण लिहिणे. ज्याचे योग्य वाटेल ते ठरवू. त्यातील काही निवडक प्रतिसाद इथे देत आहोत.




महत्त्वाचे


भरारी’ व ‘उडान’ गटाने कौतुकास्पद कृतिकार्यक्रम केलेत. या कृतिकार्यक्रमाला अजून पुढे नेण्याच्या दृष्टीने थोडंस सुचवत आहोत.
चिनी वस्तूंचा वापर बंद करताना खालील मुद्द्यांवरही अभ्यास होणे गरजेचे आहे –
. चिनी वस्तू नेमक्या का बंद करायच्या?
. आपल्या दैनंदिन जीवनात कुठल्या चिनी वस्तू वापरल्या जातात? त्यांना पर्यायी वस्तू काय असू शकतात?
. आपण चिनी वस्तू बंद करण्याने नेमकं काय साधल्या जाईल आणि आपल्याला काय साधायचे आहे?
. जागतिकीकरणाच्या युगात असं एका विशिष्ठ देशातल्या वस्तूंवर बहिष्कार टाकणं व्यवहार्य/ शक्य आहे का? जागतिकीकरण म्हणजे काय?
. चिनी वस्तू बंद करताना स्वदेशी वस्तूंचा वापर का करावा यावरही अभ्यास होऊ शकतो.
. खादीचा वापर करावा’ असे गांधीजी का म्हणत यावरही अभ्यास होऊ शकतो.
. सोबतच तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती कशी वेगळी आहे आणि त्यामुळे काय शक्य आणि काय अशक्य यावर चर्चा होऊ शकेल.
. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकात चालणारी चर्चा किंवा गावात वाटल्या जाणारे पोस्टर्स यावरच भरवसा न ठेवता या विषयामागची नेमकी सत्यता पडताळून बघता येईल.


क्षणचित्रे


नेचर ग्रुप, एरंडोलचे मुलं-मुली परिसरातील झाडांची काळजी घेताना


क्षणचित्रे



कुमार निर्माणच्या निमंत्रकांसाठी आम्ही पुणे आणि जळगाव येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती, त्याचे क्षणचित्रे


चित्र चर्चा



हे चित्र बघून काय वाटतं ? या विषयी काही वाचलं आहे का? एका शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचं हे चित्र हे. तर हा शास्त्रज्ञ कोण, त्याने कुठला प्रयोग केला या विषयी चर्चा करा आणि हे शोधून काढा. शोधल्या नंतर हे गटात सांगायला विसरू नका. या शास्त्रज्ञाच्या इतर शोधांविषयी देखील माहिती मिळवा


Friday, 30 June 2017

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका




संपादकीय मंडळ





अमृत बंग
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव

संपर्क
प्रफुल्ल ९४२०६५०४८४
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल : contact.knirman@gmail.com


अंक तिसरा | जून २०१७
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)



संवादकीय

नमस्कार दोस्तहो !!!
सर्वजण मजेत आहात ना? आम्हीही इकडे मजेत आहोत.
सर्वप्रथम वरच्या वर्गांत गेल्याबद्दल कुमार निर्माण टीम कडून तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला खात्री आहे की सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनीच खुप धम्माल केली असेल, खुप खेळला असाल आणि आपापल्या आवडीच्या गोष्टी केल्या असतील. तुमच्यापैकी काही जण मामाच्या गावी गेला असाल, काही इतर नातेवाईकांकडे, काही कौटुंबिक सहलीसाठी गेला असाल तर काहींनी घरीच राहून मजा केली असेल.
अर्थातच मोठ्ठ्या सुट्टीमुळे कदाचित आपला गट थोडा विस्कळीत झाला असेल, पण बरेच गट नेहमीप्रमाणे भेटत असतील. एव्हाना तुमच्या शाळा सुरु झाल्या असतील. नवीन वह्या, पुस्तकं यांच्या एका विशिष्ट सुगंधाचा घमघमाट सुटला असेल आणि सुट्टी संपून पुन्हा शाळा, शिकवण्यांमध्ये तुम्ही लवकरच व्यस्त व्हाल.
मित्रांनो, परंतु या व्यस्त वेळापत्रकात आपल्याला सुट्टीत विस्कळीत झालेला कुमार निर्माणचा गट पुन्हा त्याच उत्साहाने, उर्जेने सुरु करायचा आहे. तुम्हीही सुट्टीत केलेली धमाल आपल्या मित्रांना सांगायला उत्सुक असलाच. तुमच्या परीक्षा सुरु होण्याआधी म्हणजेच एप्रिलमध्ये सुट्टीतही तुम्हाला कुमार निर्माणशी जोडून ठेवेल असा धागा म्हणजेच ‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवले होते. यासोबतच ‘न्याया’वर आधारित भरारीही आम्ही तुम्हाला पाठवलं होतं. काही गटांना भरारी उशिरा मिळाल्याने तुम्हा मुलांपर्यंत ते पोचू शकले नाही याबद्दल Sorry!

अर्थात तुम्ही शाळेत परत आल्यावर ते भरारी वाचू शकतात. याशिवाय ज्या गटांना वेळेत भरारी व उपक्रम मिळाले आहेत त्यांनी यातील जास्तीत जास्त उपक्रम करण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. तुम्ही केलेल्या सुट्टीतील उपक्रमांचे तुमचे अनुभव नक्की आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल.
‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव नक्कीच आले असतील. घरात कोण जास्त काम करतं याचं कदाचित उत्तरही निरीक्षणातून मिळालं असेल, प्राण्यांचे वेगवेगळ्या वेळी निरीक्षण करताना कदाचित एखाद्या प्राण्याने तुमच्याशी संवादही साधला असेल, आपल्या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेताना तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या असतील तसंच कुणालातरी मदत करून तुम्ही शाबासकीही मिळवली असेल. तर हे सगळे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा, आमच्यापर्यंत पोचवा. ज्या गटांना भरारी उशिरा मिळाले ते गट सुट्टीत करायला दिलेले उपक्रम आत्ताही करू शकता. याव्यतिरिक्त जरी कुणी काही उपक्रम आपापल्या ठिकाणी केले असतील तर तेही जरूर आमच्याशी शेअर करा. आम्हीही तुमचे भन्नाट अनुभव वाचायला आतुर आहोत.
आधीच्या भरारीचे वाचन करून त्यातील गोष्टीवर, चित्रावर गटात चर्चा घडवून आणा, कोड्याचे उत्तर शोधा यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘न्याया’शी संबंधित दिलेले उपक्रम गटात कसे करता येतील यावरही चर्चा करा. या भारारीचेही वाचन करून त्यावर चर्चा करा.
आता उन्हाळ्यानंतर लवकरच पावसाला सुरुवात होईल. सगळीकडे मातीचा सुगंध दरवळेल. परिसर हिरवागार होईल. शेतांमध्ये पेरणीला सुरुवात होईल. पावसाळा ऋतूशी संबंधित तुम्ही काय उपक्रम करू शकतात यावर गटात नक्की चर्चा करा. कदाचित तुम्ही आपल्या गावातल्या किंवा गावाबाहेरील शेतकऱ्याला पेरणीच्या कामात मदत करू शकाल, त्यात तुम्हाला मजाही येईल, शिकायलाही मिळेल आणि शेतकऱ्यांनाही मदत होईल. यासोबतच तुम्ही गट मिळून आपापल्या परिसरात उपयुक्त अशी फळा-फुलांची, भाज्यांची रोपेही लावू शकता.
तर मित्रांनो, या मोठ्ठ्या सुट्टीनंतर गटाला पुन्हा रिचार्ज करूया आणि तेवढ्याच जोमाने पुन्हा मिटींग्स, विविध कृतिकार्यक्रम यांना सुरुवात करूया.
आणि लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत...